आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जग बदलणारा नेता फिडेल कॅस्ट्रो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२० वे शतक हे अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांचे शतक होते महात्मा गांधी, लेनिन, माओ, हो-ची-मिन्ह, जवाहरलाल नेहरू, चर्चिल, नासेर, नेल्सन मंडेला, स्टॅलिन, इंदिरा गांधी, सुकार्णो अशी अनेक नावे घेता येतील. यातील बहुतेक २० वे शतक संपण्याआधीच जग सोडून गेले. अपवाद फक्त नेल्सन मंडेला यांचा. या यादीतील बहुतेक नावे मोठ्या देशांतील नेत्यांची आहेत. परंतु फक्त १ कोटी १० लाख लोकांची वस्ती असलेल्या छोट्या क्युबाचा हा माजी राष्ट्राध्यक्ष जगाचा महान पुढारी होता. त्याच्या जाण्याने एका महान पर्वाचा अंत झाला असेच म्हणावे लागेल.

अमेरिकन साम्राज्याचे अंगण समजल्या गेलेल्या दक्षिण अमेरिकन उपखंडात सर्व स्वतंत्र व समतावादी चळवळींना आधार देण्याचे महत्त्वाचे काम फिडेल यांच्या क्युबाने व जनतेने केले आहे. विशेषत: बोिलव्हिया, निकारागुवा, पेरू, व्हेनेझुएला, कोलंिबयासारख्या देशांना क्युबाने सातत्याने आपली क्षमता नसतानाही मदत केली. विशेषत: शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात तसेच अमेरिकन साम्राज्याविरुद्ध टक्कर देण्यात कॉ. फिडेल यांच्या नेतृत्वाखाली छोट्या क्युबाने आरोग्याच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची सर्व जगाने दखल घेतली आहे. श्रीमंत अमेरिकेपेक्षाही चांगली आरोग्यसेवा व शिक्षणसेवा आपल्या नागरिकांना देण्यात क्युबा यशस्वी झाला आहे. क्रांती झाल्यावर एका वर्षात संपूर्ण देशाला साक्षर करण्याचे महान काम फिडेल यांनी महाविद्यालय एक वर्ष बंद ठेवून विद्यार्थ्यांना आवाहन करून केले. फिडेल यांचे अमोघ, प्रभावशाली वक्तृत्व म्हणजे एक पर्वणीच होती. अगदी सहजपणे चार तास भाषण करून लोकांना खिळवून ठेवणे, प्रोत्साहित करणे यात त्यांचा हातखंडा होता. १९६८ मध्ये त्यांनी सलग १२ तास भाषण करून हजारो लोकांना खिळवून ठेवल्याची घटना म्हणजे एक ऐतिहासिक आश्चर्यच होय. छोट्या देशाला घडवणे विशेषत: हा देश एका बलाढ्य राष्ट्राच्या विरोधात उभा करणे हे अवघड काम होते. परंतु आपल्या त्यागाने, प्रभावी व्यक्तिमत्त्वाने हुशारीने व विचारसरणीने त्यांनी ते केले. जगभर वलय व आकर्षण असलेला विसाव्या शतकातील हा अखेरचा नेता होता, असे वर्णन केल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

अमेरिकेन गुप्तहेर संघटनेने ५० वर्षांत किमान ८४ वेळा फिडेल यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. १९६१ मध्ये क्युबन निर्वासितांना मदत करून क्युबावर हल्ला करून तेथील राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न केला. तटस्थ राष्ट्रांचे नेतृत्व करणाऱ्या इंदिरा गांधी व फिडेल यांचे अत्यंत चांगले संबंध होते व या दोघांनीही जागतिक शांतता व साम्राज्यवादविरोधी चळवळ मजबूत करण्यात पुढाकार घेतला होता. सातत्याने सर्व विषयांवर व महत्त्वाच्या घटनांवर लेखन करून आपले मत मांडणे हे फिडेल यांचे वैशिष्ट्य. ग्रेनमा या क्युबन वर्तमानपत्रातून ते यापुढे लिहिणार नाहीत व त्यांचे विचार यापुढे वाचता येणार नाहीत. हा मोठा धक्का त्यांच्या सर्व चाहत्यांना व जाणकारांना जाणवणार आहे. आमच्या व नंतरच्या पिढीच्या तरुणांना समाजवादी विचारांचे धडे देणारा, आकर्षण निर्माण करणारा आदर्श नेता आज आम्ही गमावला आहे. विसाव्या शतकातील या अखेरच्या महान नेत्याला आमचा अखेरचा लाल सलाम.
डॉ. भालचंद्र कांगो
सचिव, भाकप, महाराष्ट्र
बातम्या आणखी आहेत...