आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाजवादी समाजनिर्मितीचे प्रवर्तक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृदयात डॉलरचे चिन्ह कोरून समाजवादी जाणिवा रुजत नाहीत. आपला देश, इतिहास, निसर्ग, लोक, लोकमानस, संस्कृती विचारात घेऊन सर्वांसाठी विकासाचा सर्जनशीलपणे शोध घेत नवसमाजनिर्मितीच्या वाटा धुंडाळल्या तरच समाज प्रगती करू शकतो. देशातील कानाकोपऱ्यांतील लोक क्रांतीच्या बाजूने भक्कमपणे उभे राहतात. कष्टाने आणि संघर्षाने चांगले जीवन मिळवता येते. मात्र, आज भारतासारखे जगातले बहुसंख्य देश अमेरिकेच्या हुकमतीखाली आंधळेपणाने अनुकरण करत आहेत. येथील नेते पैसा, स्वार्थ हे सर्वस्व मानून श्रमिक जनतेची ससेहोलपट करीत आहेत. त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती लादत आहेत व देश खड्ड्यात लोटत आहेत. अशा परिस्थितीत फिडेल कॅस्ट्रोसारखा शुक्रतारा नवसमाजनिर्मितीचा मार्ग धुंडाळत जगभरच्या श्रमिक जनतेपुढे आजही आदर्श उभा करत आहे.

फिडेल कॅस्ट्रोचे वैशिष्ट्य म्हणजे, नवसमाजनिर्मितीची सर्जनशील दृष्टी, द्रष्टेपणा व संघटन कौशल्य, लोकविलक्षण धडाडी, असीम त्याग आणि त्याला झगड्याची जोड देऊन सारे जीवन क्रांतीसाठी झोकून देण्याची साहसी वृत्ती. कॅस्ट्रोचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, जनतेच्या नाडीवर बोट ठेवून, जनतेशी संवाद साधत जनतेच्या कलाने समाजपरिवर्तनामध्ये धीमेपणे पावले टाकण्याची कल्पकता व कौशल्ये. क्यूबा नेस्तनाबूत करण्यासाठी १९५९पासून अमेरिका सतत हल्ले करून होता. आजच्या घडीला अमेरिका हा देश जागतिकीकरणाचा बुलडोझर सर्व जगावर फिरवत आहेत. देशातील राज्यकर्त्यांच्या अमेरिकेबरोबरच्या संगनमतामुळे सारी जनता भरडली जात आहे. तरी क्यूबन जनतेने मात्र समाजवादाची वाट सोडलेली नाही. फिडेल कॅस्ट्रो यांनी साकारलेल्या समाजवादी समाजनिर्मितीचाच हा परिपाक आहे.
सुलभा ब्रह्मे - सामाजिक-अर्थविषयक अभ्यासक
लेखिका "क्युबाचा झुंजार क्रांतीलढा’ या लोकायत प्रकाशित पुस्तकाच्या लेखिका आहेत.
बातम्या आणखी आहेत...