शरीरातील विशेषत: ओटीपोटाभोवतालच्या आणि आतील स्नायूंना कोअर मसल्स अर्थात मुख्य स्नायू म्हणतात. पाठीच्या कण्याला स्थिर राखण्यात तसेच इतर स्नायू बळकट करण्यात या मुख्य स्नायूंची मदत होते. योग्य पोषक घटक न मिळाल्यास, चुकीच्या पद्धतीने चालणे-फिरणे झाल्यास किंवा वयोमानानुसार मुख्य स्नायू कमकुवत होत जातात. हे स्नायू बळकट ठेवण्यासाठी पुढील व्यायाम प्रकार करता येतील.
* चटईवर झोपा. दोन्ही पाय दुमडून त्यात थोडे अंतर ठेवा. मांड्या व पोट-यांचे स्नायू हळूहळू वर उचला. दोन्ही पायांचा सराव झाल्यावर एका पायानेही असा व्यायाम करा. या वेळी दुसरा पाय पूर्णपणे जमिनीवर असावा. प्रत्येक स्थिती 30 ते 60 सेकंद ठेवा व कमीत कमी तीन वेळा करा.
* चटईवर पालथे झोपा. मनगटाच्या साहाय्याने पुढच्या भागाचे शरीर वर उचला. मनगटे खांद्याच्या समान रेषेत जमिनीवर टेकलेली असावीत. या स्थितीत पायाचे पंजे जमिनीवर टेकवावेत आणि पुढील भागातील शरीर जमिनीपासून वर उचलावे. 30 सेकंद एका स्थितीत राहून ही प्रक्रिया 3 ते 5 वेळा करा.
* व्यायामाच्या चटईवर बसा. गुडघे दुमडून खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा. गुडघ्यांखाली फुटबॉल किंवा बास्केटबॉल ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा व पाय हळूहळू जमिनीपासून वर उचला. शरीर स्थिर राखण्यासाठी आपले स्नायू कार्यरत आहेत, कंबरही बळकट आहे, असा विचार करा.
* जमिनीवर सरळ उभे राहा. डाव्या पायावर तोल सांभाळत उजवा पाय वर उचला. श्वास घ्या,सोडा. पाठीचा कणा सरळ ठेवा. श्वास घ्या व सोडा. पुन्हा पहिल्या स्थितीत या. हीच कृती उजव्या पायावर उभे राहून करा. प्रत्येक पायासाठी 6 वेळा ही कृती करा.