आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Hatkanangale By Divya Marathi Web Team

मखमलीची लव, कंटकशल्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझा जन्म आणी प्राथमिक मराठी चौथीपर्यंतचे शिक्षण हातकणंगले या खेडेगावात झाले. तिथे वाचनालय नव्हते, पण ग्रामपंचायतीत काही जुनी पुस्तके होती. काही गृहस्थांकडेही पुस्तके होती ती आम्ही पाहिली नव्हती, ऐकले होते. माझ्या वडिलांकडेही कपाटात थोडी पुस्तके होती, पण त्यातली सर्व धार्मिक वा रामकृष्ण, स्वामी विवेकानंद, गीतारहस्य अशी होती. माझा भाऊ मात्र कथा-कादंबऱ्या, इंग्रजी मासिके वाचत असे. त्याचे मित्र शि. अ. स्वामी हे कोल्हापुरात शिकत असताना ना. सी. फडके यांचे लेखनिक होते. ते माझेही स्नेही होते. पुढे ते किर्लोस्कर मासिकात काम करू लागले. हातकणंगल्यात घराजवळच त्यांच्या खोल्या होत्या. तिथे ते लेखनासाठी बसत. मित्रमंडळींच्या गप्पाही तिथेच होत. तिथे भावाची पुस्तके आणणे-नेणे, निरोप सांगण्यासाठी जात असे. तिथे मग अनेक उत्तम इंग्रजी मासिके, पुस्तके, सुंदर चित्रे मी पाहिली. स्वामी ना. सी. फडक्यांच्या नव्या कादंबरीची ताजी प्रत माझ्या भावाकडे पाठवत. तिथेच मी ‘काश्मिरी गुलाब’ या कादंबरीवर बाबूराव पेंटरांचे अति देखणे चित्र मी पाहिले होते. भावाचे व माझेही झालेले स्नेही स्वामी आपलेही बरेचसे लेखन त्या बंगल्यातच (दोन खोल्या) करत असत. त्या वेळी त्यांच्या अनेक मुलाखती किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. अंजेला त्रिन्दाद, हरिंद्रनाथ चटोपाध्याय या मुलाखती मला आठवतात. ते माझ्या भावाला सुंदर पत्रे लिहीत. ती मी वाचत असे. त्या वेळेपासून साहित्याचा प्रांत हा अद्भुत व आनंददायी प्रदेश आहे, असा संस्कार माझ्या मनात रुजला असावा. ही गोष्ट इतक्या वर्षांनंतर आज माझ्या ध्यानात येते.

साहित्याचा एक वेगळाच अनुभव मी लहान वयात घेतला होता. पुढे कॉलेजात गेल्यावर माझी पहिली अनुवादित कथा शेवटचा प्रयत्न ही किर्लोस्करने स्वीकारली तेव्हा मला अत्यानंद झाला होता. लहानपणी शालेय वयात ‘शालापत्रक’ नावाचे मासिक वाचण्यासाठी आम्ही बरीच धडपड केल्याचे स्मरते. ती वाचताना एकदा जर्मन परिकथा मला आवडली. तसे आपणही लिहावे, असे मला वाटले. घरी आल्यावर कंदिलाच्या उजेडात दोन पानांची कथा लिहून काढली. दादांना (वडिलांना) वाचायला दिली. ते छान आहे, असे म्हणाले. मी म्हटले, ‘शालापत्रका’कडे पाठवू का? म्हणाले, पाठव. कशी पाठवायची ते तुम्ही बघा. मला काही माहीत नाही. ते माझे पहिले लेखन. त्यांनी ती कथा पाठवली. किती तरी दविस मी वाट पाहत होतो. काहीच घडले नाही. मन खट्टू झाले. माझी लेखनाची ऊर्मी मात्र कमी झाली नाही. त्यानंतर मी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, कोल्हापूर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पुढील शिक्षणासाठी गेलो. तिथे प्रत्येक वर्गासाठी एक छोटे पुस्तकाचे कपाट होते. त्यातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला देण्याची प्रथा होती. त्यामुळे माझे वाचन क्षेत्र वाढत गेले. तिथे एकदा भारतीय स्वातंत्र्यवीरांबद्दल निबंध लिहिण्यास सांगितला. मी बराच मोठा निबंध लिहिला. त्याला उत्तम शेरा मिळाला. त्यांनी तो वर्गात वाचून दाखवला.

त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी लिहिता येते, असा माझा समज झाला.पुढील शिक्षणासाठी मी सांगलीला आलो. तिथे प्रताप मॉडेल हायस्कुलात गोखले या शिक्षकांनी मराठी-इंग्रजीचे दोन्ही भाषांतील साहित्य वाचण्याची मला गोडी लावली व ती लागली. श. गो. गोखले यांच्या कथा किर्लोस्करमध्ये प्रसिद्ध होत असत. त्याचा आम्हा विद्यार्थ्यांना अभिमान वाटत असे. याच काळात मी टॉलस्टॉयची कादंबरी ‘अना करेनिना’ वाचण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्या वेळी आपण पुढे इंग्रजी साहित्याचा पाठपुरावा करायचा असे मी मनात ठरवले असावे. त्यानंतर कॉलेजचे दविस सुरू झाले. भव्या ग्रंथालयात पुस्तकांची अद््भुत गुहा होती. आम्हाला इंग्रजी, मराठी, संस्कृत शिकवायला उत्तम प्राध्यापक होते. कोलरिजची ‘ख्रिस्ताबेल’ ही नव्या छंदातली कविता इंग्रजीचे प्रा. व्ही. व्ही. यार्दी शिकवायचे. त्यांच्या प्रेरणेनेच पुढे कॉलेजच्या मासिकात मी इंग्रजीत लघुनिबंध लिहिला. तो अनेकांनी वाखाणला. पुढे मुगळी सरांच्या प्रोत्साहनाने मी ‘स्वप्नवासवदत्ता’चे रसग्रहण मी इंग्रजीत लिहून सरांना दाखवले. त्यावर ते खुश झाले आणि त्यांनी मला समीक्षा, रसग्रहणात्मक लेखन करायला उत्तेजन दिले. पुढे मराठीचे प्रा. गिरीश यार्दी सरांमुळे प्रसिद्ध रविकिरण मंडळातील आणि अन्यही अनेक साहित्यिकांची आमची दृष्टभेट झाली. त्याचाही प्रेरक परिणाम माझ्या साहित्यनिर्मितीच्या आकांक्षेवर झाला असावा. या काळात एक इंग्रजी अंक माझ्या हाती लागला. त्यात ‘लास्ट अटेम्प्ट’ ही हृदयकथा होती. तिचे मराठी भाषांतर करून ती मी ‘किर्लोस्कर’कडे पाठवली. ती स्वीकारल्याचे पत्र मला मिळाले तेव्हा मी हर्षभरित झालो. मानधनही आले आणि मला लेखनाची पायवाट सापडली.

पुढे अनेक इंग्रजी कथांचे अनुवाद मी महाद्वार, वसंत, सत्यकथा, हंस या मासिकातून प्रसिद्ध केले. ‘हंस’ने माझ्या अनुवादित कथेला पारितोषिक दिले. एकदा गो. नी. दांडेकर माझ्या सांगलीच्या घरी आले. त्यांना अमेरिकेत जावयाचे असल्याने त्यांच्या एका म्हणजे ‘माचीवरचा बुधा’ या कादंबरिकेचा मी इंग्रजी अनुवाद करून दिला. तो प्रा. प्रधान, प्रा. शहा यांना आवडला. मात्र तो त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही. तो प्रसिद्धही झाला नाही. नंतर तो मी परत मागितला तर मिळालाच नाही. एकदा माझ्या कॉलेजच्या खोलीत संस्कृतचा ‘काव्यतीर्थ’ असा एक अफलातून मनुष्य राहत होता. त्यालाही बीएला बसायचे होते. त्याने माझी ‘एकच प्याला’ची प्रत पाहिली आणि अभिप्राय नोंदवला. ‘तुम्ही पुढे जाऊन चांगले समीक्षक बनाल’ असे त्याने म्हटल्याने मी सुखावलो होतो. पाऊणशे वयमान झाल्यानंतर मागे वळून आपल्या तुटपुंज्या साहित्यसेवेकडे पाहताना त्या प्रवासातील मखमलीची लव आता वठलेली आहे आणी कंटकशल्येही बोथटली आहेत, असे वाटते.
(तरुण भारत - बेळगाव,
दिवाळी २००१ मधून साभार)