@ईशिता मालवीय : व्यावसायिक सर्फर
@वय : 25 वर्षे, जन्म : मुंबई
@शिक्षण : मणिपाल इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी
चर्चेत का : आंतरराष्ट्रीय वुमन सर्फ ब्रँड ‘रॉक्सी’ ची पहिली भारतीय ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड
ईशिता 7 वर्षांपूर्वी पत्रकारितेचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईहून मणिपाल येथे गेली. येथे तिच्या जीवनाला कलाटणी मिळेल याची पुसटशी जाणीवही तिला नव्हती. मणिपालला गेल्यानंतर काही दिवसांनी येथे राहत असणा-या कॅलिफोर्नियाच्या काही सर्फर्सशी तिची ओळख झाली. भारतात सर्फिंगला वाव असल्याची जाणीव ईशिताला झाली. यातील एका सर्फ रला तिने सर्फिंग शिकवण्याची विनंती केली. लाटांच्या संपर्कात आल्यावर, हेच आयुष्याचे ध्येय बनवायचे, असे तिने ठरवले. मात्र सर्फिंगची साधने नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. पालक आपल्या 3-4 वर्षांच्या पाल्याला लाटांचा सामना करण्यासाठी समुद्रात ढकलून देतील, अशी समाज मानसिकता घडवण्याचे ईशिताचे स्वप्न आहे. तिची 7,515 किलोमीटर लांब कोस्टलाइनपर्यंत सर्फिंग करण्याची महत्त्वाकांक्षा आहे.भारताचे नाव जागतिक सर्फिंगच्या विश्वात झळकावण्याचा तिचा मानस आहे. तिचे वडील मूळचे बांगलादेशी व आई पाकिस्तानची आहे. तिने सर्फिंगची सुरुवात केली तेव्हा पालकांना ते अजिबात रुचले नाही. ईशिताने काही काळ सर्फिंग केल्यावर जास्तीत जास्त लोकांना सर्फिंग शिकवण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी तिने तिचा मित्र तुषारच्या सहकार्याने शाका सर्फ क्लब सुरू केला. ईशिताने ‘बियाँड दी सरफेस’ या माहितीपटात काम केले आहे. भारतातील हा पहिलाच महिला सर्फिंगविषयक चित्रपट आहे. तिला सर्फिंगसाठी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सर्फिंगशिवाय तिला योगा, मित्रपरिवारासह वेळ घालवणे व तिचा पाळीव कुत्रा मार्लेसोबत खेळण्याची आवड आहे. फिटनेसच्या बाबतीत ती जागृत असून सर्फिंगला उत्कृष्ट वर्कआऊट मानते.
पुढे वाचा प्रसिध्द मायलेकींविषयी....