आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई महानगरपालिका सिव्हिक जर्नल प्रसिद्ध करते. १९७०-८०च्या दशकात या जर्नलचे स्वरूप अतिशय अभ्यासू असायचे. या सिव्हिक जर्नलमध्ये डॉ. अरुण टिकेकर मुंबईशी संबंधित सामाजिक, ऐतिहासिक घडामोडींबद्दल प्रसंगोपात लिहायचे. याच जर्नलमध्ये पुढे टिकेकरांचे "बॉम्बेयाना' नावाचे सदर सुरू झाले. त्या सदरामध्ये मुंबईच्या इतिहास व वर्तमानाविषयी ते जे लेख लिहीत असत त्यांनी मला मोहिनी घातली. मुंबईच्या इतिहासाची मलाही पहिल्यापासून गोडी होती. त्यामुळे "बॉम्बेयाना' लिहिणाऱ्या डॉ. टिकेकरांकडे मी आकर्षित होणे साहजिकच होते. टिकेकर सर्वप्रथम ज्या मराठी वर्तमानपत्रात कार्यरत होते तिथे ते दर शनिवारी इतिहासाबद्दल एक स्तंभ टोपणनावाने लिहीत असत. त्या लेखांना पूरक अशी माहिती माझ्याकडे असेल तर ती मी त्या वर्तमानपत्राला पत्र लिहून कळवत असे. अशी चार-पाच पत्रे छापून आल्यानंतर टिकेकरांनी एकदा मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले व ओळख करून घेतली; त्यानंतर त्यांच्याकडे असलेला प्रचंड वैयक्तिक संग्रह तसेच ग्रंथवाचनातून मिळविलेले अफाट ज्ञान यांच्याशी माझी ओळख होत गेली. टिकेकर माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनले हे कळलेच नाही. अरुण टिकेकरांचे काका व ख्यातनाम संशोधक श्री. रा. टिकेकर हे डॉ. आंबेडकरांचे मित्र. त्यामुळे टिकेकर आडनावाविषयी मला प्रथमपासूनच आदर व कुतूहल. डॉ. अरुण टिकेकर हे सच्चे मुंबईप्रेमी होते. मुंबईत विद्वत्ता, सामाजिक प्रगती यांची जी वैभवशाली परंपरा होती तिचा त्यांना विलक्षण अभिमान होता. त्यातूनच त्यांनी कालांतराने काही पुस्तके व अनेक शोधनिबंधही लिहिले. मुंबईतील एका वर्तमानपत्रातून दुसऱ्या वर्तमानपत्रात ते जेव्हा गेले व संपादक झाले त्या वेळी ते वर्तमानपत्र प्रसिद्ध करणाऱ्या समूहाने जे मराठी सायंदैनिक सुरू केले होते तिथे टिकेकर हे मुंबईच्या इतिहासावर एक स्तंभ चालवत होते; पण कार्यबाहुल्यामुळे त्यांना पुढे हा स्तंभ चालविण्यासाठी पुरेसा वेळ देता येईना. तेव्हा त्यांनी ही जबाबदारी संबंधित संपादकांना सांगून माझ्यावर मोठ्या विश्वासाने सोपविली. त्यामुळे मी या सायंदैनिकात तेव्हा आणि आता, मुंबई...मुंबई अशी सदरे सलग दोन वर्षे लिहिली. मुंबईवर मी इंग्रजीतून लिखाण करावे असा टिकेकरांचा आग्रह असे. त्यामुळे टाइम्स ऑफ इंडियातही माझे या विषयावरचे लेख प्रसिद्ध होऊ लागले होते. कोणीही मुंबई किंवा महाराष्ट्राच्या इतिहासावर वा अन्य कोणत्याही विषयावर लेख लिहिला तर त्यात सगळे संदर्भ अचूक आले पाहिजेत, यावर टिकेकरांचा कटाक्ष असे. एक उदाहरण सांगतो की, मुंबईजवळील घोडबंदर या ठिकाणाबद्दल मी लेख लिहिला; पण त्या ठिकाणाला घोडबंदर का नाव पडले याचे विश्लेषण मी लेखात केले नव्हते. हा लेख छापायला जाण्यापूर्वी टिकेकरांनी वाचून काढला व त्यांनी सांगितले की, मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांचा घोड्यांचा व्यापार होता. विदेश व देशाच्या इतर भागांतून जहाजातून आणलेले घोडे उतरविण्यासाठी शंकरशेट यांनी जे बंदर बांधले होते ते म्हणजे घोडबंदर. ही माहिती देताच त्या लेखाला पूर्णत्व आले. इतिहासावर विलक्षण प्रेम करणाऱ्या टिकेकरांचे आयुष्य अत्यंत पारदर्शी व शिस्तप्रिय होते. हेच गुण त्यांच्या संशोधनात, लेखनातही आले. आमच्यासारख्या मुंबईप्रेमींना मार्गदर्शनासाठी टिकेकरांसारखा दीपस्तंभ लाभला हे आमचे सुदैव.