आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एशियाटिक’चा व्हिजनदाता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेची सर जेम्स मॅकिन्टॉश यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर १८०४ रोजी स्थापना केली. प्रचंड ग्रंथभांडार आणि एेतिहासिक दस्तऐवजांचा संग्रह हे या संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. संशोधकांच्या अनेक पिढ्यांनी या ग्रंथसंपदेचा गाढा अभ्यास करून मौलिक ग्रंथ लिहिले आहेत. ही परंपरा जपणाऱ्या मान्यवर अध्यक्षातील अग्रगण्य नाव म्हणजे डॉ. अरुण टिकेकर.
महाराष्ट्र व मुंबईच्या इतिहासावर डॉ. टिकेकरांचे मनापासून प्रेम होते. त्यांचे इतिहासप्रेम, संशोधकाचा पिंड या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक फायदा ते मुंबईच्या एशियाटिक सोसायटीला त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत झाला. ऑगस्ट २००७ ते ऑगस्ट २०१३ अशी सहा वर्षे ते या संस्थेचे अध्यक्ष होते. एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाचे सदस्य म्हणून त्यांचे येणे-जाणे संस्थेत होतेच. द्विशताब्दीनिमित्त एशियाटिक सोसायटीचा इतिहास लिहिण्याच्या प्रकल्पामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. डॉ. अरुण टिकेकर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत एशियाटिक सोसायटीमध्ये त्यांनी अनेक वेगळे प्रकल्प हाती घेतले. एशियािटक सोसायटीवर असलेला आर्थिक ताण दूर करून संस्थेला अधिक रचनात्मक कार्य कसे करता येईल याकडे त्यांनी सर्वप्रथम लक्ष केंद्रित केले. ते अध्यक्ष झाल्यापासून एशियाटिक सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी नेमके काय करता येईल याचे पुढील दहा वर्षांचे एक व्हिजन डॉक्युमेंट त्यांनी तयार केले होते. त्यामध्ये सोसायटीतील ग्रंथसंपदा, एेतिहासिक दस्तऐवजांचे योग्य प्रकारे जतन होऊन हा ठेवा संशोधक, वाचकांना कसा जास्तीत जास्त उपलब्ध करून देता येईल याच्यावर भर देण्यात आला होता. तसेच मुंबईचा इतिहास व महाराष्ट्र, देशातील गतकालीन तसेच वर्तमानकालीन घडामोडींविषयी उत्तमोत्तम व्याख्याने आयोजित करणे, युवा पिढी सोसायटीच्या ग्रंथालयात येईल यावर लक्ष केंद्रित करणे यावर त्यांनी विशेष भर दिलेला होता. मुंबईच्या विकासाची एशियाटिक सोसायटी ही मोठी साक्षीदार आहे. त्यामुळे अरुण टिकेकरांनी मुंबईच्या इतिहासाबद्दल सखोल संशोधन भविष्यकाळातही व्हावे ही दृष्टी ठेवून त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सोसायटीमध्ये मुंबई रिसर्च सेंटरची स्थापना २००९ साली केली.
टिकेकरांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत हाती घेतलेल्या उपक्रमांची अनेक चांगली फळे एशियाटिक सोसायटीला चाखायला मिळाली. एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेत व विकासात अनेक ब्रिटिश व एतद्देशीय लोकांचा सहभाग होता. त्यापैकी २५ नामवंतांवर मोनोग्राफ प्रसिद्ध करण्याच्या योजनेस गेल्या तीन वर्षांपासून प्रारंभ झाला होता. या मालिकेतील १० मोनोग्राफ प्रकाशित झाले असून २०१६ साली अजून पाच मोनोग्राफ प्रसिद्ध होणार आहेत. या प्रकल्पाचे संपादक म्हणून डॉ. अरुण टिकेकर काम पाहत होते. त्यांच्याकडे असलेला वैयक्तिक ग्रंथसंग्रह त्यांनी काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाला सुपूर्द केला होता. पुस्तके, ऐतिहासिक दस्तऐवज यांचे विश्व अधिक व्यापक करणाऱ्या डॉ. अरुण टिकेकरांची एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदाची कारकीर्द संस्मरणीय अशीच आहे. न्या. रानडे यांच्या परंपरेतील एका महान विद्वज्जन असलेले डॉ. अरुण टिकेकर यांचे यापुढेही सर्वांना सदैव स्मरण होत राहील.