डॉ. अरुण टिकेकर यांच्या घरात तीन पिढ्यांपासून पत्रकारिता चालत आलेली. पण रूढार्थाने ते पत्रकार नव्हते. मूळचे ते इंग्रजी वाङ्मयाचे अभ्यासक होते. इंग्रजी भाषेतले साहित्य आणि इतिहास हा त्यांच्या पीएचडीचा विषय होता. इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय होता.
इतिहासप्रेमी असले तरी शक-सनावळ्यांच्या तपशिलात अडकणारे पठडीबद्ध इतिहासकार ते नव्हते. इतिहासातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय बदलांचा वेध घेत ते वर्तमानात यायचे. खरे म्हणजे इतिहासात रमणारा माणूस दैनिकाचा संपादक व्हावा, हा तसा विरोधाभासच. मात्र, घडणारा वर्तमान हे इतिहासाचेच फलित असते, ही इतिहासदृष्टीच त्यांच्या अभ्यासाची प्रेरण होती. टिकेकर मूळचे संशोधक असल्याने बातमीदारीपेक्षाही संशोधकीय बाज डोकवायचा. पत्रकारिता हे समाज वाचण्याचे आणि भाष्य करून समजावण्याचे माध्यम आहे, असे त्यांचे मत होते. एकोणिसाव्या शतकात कराचीपासून बेळगावपर्यंत पसरलेल्या मुंबई इलाख्यातील व्यक्ती, प्रवृत्ती, चळवळी, संस्था, जीवनपद्धती याकडे ते आस्थेने पाहायचे. मराठी लेखकांनी किंवा भारतीयांनी लिहून ठेवलेल्या साधनांच्या आधारे प्रामुख्याने आपल्याकडचे इतिहास लेखन होते. डॉ. िटकेकर परकीय अभ्यासकारांनी, लेखकांनी जे लिहिले त्याचा आधार घेत. त्यामुळे भारतात प्रस्थािपत झालेल्या ब्रिटिश राजवटीबद्दलचेही त्यांचे आकलन निराळे होते. सगळेच ब्रिटिश वाईट, जुलमी, पिळवणूक करणारे होते, असे त्यांचे मत नव्हते. उदारमतवादावर त्यांचे प्रेम होते. ब्रिटिशांनी रुजवलेल्या मूल्यात्मक चौकटीबद्दल त्यांना आदर होता. ‘स्थानीय इतिहास’ हा डॉ. टिकेकरांची आवडीची इतिहास शाखा होती. ‘स्थानिक’ नव्हे. स्थानीय इतिहास म्हणजे त्या परिसरातील संपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक बदल टिपणे. यातूनच ‘शहर पुणे-एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा’ हे दोन खंड तयार झाले.
पुढे आलेले ‘स्थलकाल’ हा याच प्रक्रियेचा भाग होता. गेली ३० वर्षे मी डॉ. टिकेकर यांच्यासोबत काम केले. या काळात त्यांचा मला जाणवलेला स्वभावविशेष म्हणजे विकेंद्रीकरणावर त्यांचा भर होता. एखाद्यावर एखादी गोष्ट सोपविली की ती पूर्ण होईपर्यंत ते त्यात ढवळाढवळ करायचे नाहीत. डॉ. टिकेकरांची भाषा अनेकांना बोजड वाटायची. याबाबत ते म्हणायचे की, लेखन ही जशी कष्टसाध्य कला असल्याचे आपण मान्य करतो. त्याच पद्धतीने वाचन हीदेखील कष्टसाध्य कला आहे. त्यांची भाषा भारदस्त, प्रगल्भ होती. ग्रंथ हा त्यांचा जीव की प्राण होता. हे पुस्तकप्रेम त्यांना वारशाने मिळाले होते. त्यांच्या आजोबांचीच घरात दहा हजार पुस्तके होती. त्यात त्यांच्या वडिलांनी आणि पुढे स्वत: टिकेकरांनी भर टाकली. आधुनिक काळातील बदलांवर भाष्य करणारा संशोधक पत्रकार डॉ. टिकेकर यांच्या रूपाने काळाच्या पडद्याआड गेला आहे.
लेखक पुणे येथील अर्थपत्रिकेचे संपादक आहेत.