आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मोठा गाजावाजा करत शिवसेना, भाजप, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या पाच भिन्न प्रवृत्तीच्या पक्षांच्या महायुतीची महासभा इचलकरंजीत पार पडली. सर्वांनीच दणक्यात भाषणे केली. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यातील लोकसभेच्या सहा जागांसाठी तेवढे ताकदवान उमेदवार महायुतीकडे नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अपवाद फक्त हातकणंगले या राजू शेट्टी यांच्या मतदारसंघाचा.
इचलकरंजीची सभा ही महायुतीची महाराष्ट्रातील पहिली सभा असल्याने राज्यात या सभेबाबत उत्साह होता. परंपरेप्रमाणे पवार काका-पुतण्यांची धुलाई या सभेमध्ये करण्यात आली. दुसरीकडे पवार नरेंद्र मोदींची भेट झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकल्याने राजू शेट्टीही अस्वस्थ दिसले. म्हणूनच त्यांनी जाहीर भाषणातच पवारांचं पाप तेवढं पदरात घेऊ, अशी जाहीर विनंती करून टाकली. या सभेच्या माध्यमातून एकप्रकारे महायुतीने लोकसभेच्या प्रचाराचा नारळच फोडला आहे. या सभेमध्ये गोपीनाथ मुंढे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतले. कोल्हापूर टोलचा संदर्भ देत हे राज्यच टोलमुक्त करण्याचे धोरण आम्ही सत्तेवर येताच घेऊ असे ते म्हणाले. मात्र साखर कारखानदारीबाबत बोलताना कारखान्यांच्या अंतराची अट काढून टाकण्याची त्यांनी केलेली घोषणा ही सहकारातील तज्ज्ञांना पटलेली नाही हे नंतरच्या प्रतिक्रियांवरून जाणवले. मुंढे यांनी 1995 च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शरद पवार यांना टार्गेट करून प्रचाराची राळ उडवून दिली होती. यंदाही त्यांचे हेच धोरण दिसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आघाडीच्या कारभाराचा पंचनामा करताना सडकून टीका केली.
पवारांवर टीका करतानाच त्यांनी राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कोण मुश्रीफ, दादागिरी चालणार नाही अशा भाषेत दम भरून स्थानिकांच्या टाळ्या घेतल्या. राजू शेट्टी यांनी आसुडाने फोडून काढण्याची भाषा करत सहकारातील घोटाळ्यांची जंत्रीच या सभेत मांडून दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांचे वस्त्रहरण केले. तुलनेत रामदार आठवले यांचे भाषण मात्र कवितेत आणि राज्यसभेच्या कौतुकातच अडकलेले दिसले. दलितांची अवस्था, त्यासाठीची भूमिका याबाबत बोलण्यापेक्षा ते आपण दिल्लीत पवारांना भेटू आणि आता खासदार झालो मंत्रीही होऊ हेच सांगत राहिले. थोडक्यात महायुतीची सुरुवात तर दणकेबाज झाली आहे. परंतु याबरोबरच त्यांना दक्षिण महाराष्ट्रात तेवढे तुल्यबळ उमेदवार मिळणार का यावर यश अवलंबून आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.