आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Local Politics In Khandesh By Trimbak Kapade, Divya Marathi

‘उडाले तर गरुड अन् बुडाले तर बेडूक!’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्याच्या राजकारणात ज्यांची हयात गेली, जे स्वत:सोबत दुस-या चार जागा निवडून आणण्याची ताकद ठेवून होते, आपला मतदारसंघ आणि जिल्हा ज्यांचा बालेकिल्ला होता, त्या खान्देशातील माजी मंत्र्यांवर आता स्वत:च्या अस्तित्वासाठी लढण्याची वेळ आली आहे. पक्ष कोणताही असो, जळगावची निवडणूक जिंकण्यासाठी सुरेश जैन हे नाव पुरेसे होते.
ज्यांनी पक्ष बदलला नाही; पण त्यांना वगळून खान्देशात गेल्या पंचवीस वर्षांत राजकारण करता आले नाही, त्यात धुळे जिल्ह्याचे रोहिदास पाटील, नंदुरबारचे सुरूपसिंग नाईक व त्यानंतर विजयकुमार गावित यांची नावे घेता येतील. मात्र, प्रचंड गतिमान झालेला मीडिया आणि कायद्याचा धाक वाढत गेल्यामुळे विविध कारणांनी त्यांच्या एकछत्री कारभाराला सुरुंग लागत गेला. यापैकी दोघांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, तर दोघांना कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागले. देशात सरकार बदलले आणि आता राज्यात बदलाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सुरेश जैन, रोहिदास पाटील आणि विजयकुमार गावित यांना सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या तिघांसाठी ही निवडणूक म्हणजे ‘उडाले तर गरुड अन् बुडाले तर बेडूक’ अशीच असणार आहे.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक घडामोडी घडून गेल्या. त्यात सर्वाधिक फटका सुरेश जैन यांना बसला. एकेकाळी वाघासारख्या जगणा-या या माणसाला एकदम झुकावे लागले. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक जिल्ह्यात ताकदवान झाले असले तरी जैनांना जळगाव शहरात अजूनही आशा लागून आहे. महापालिकेत खान्देश विकास आघाडीच्या नावाखाली सुरेश जैन यांचे बंधू रमेश जैन यांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व राखता आले असले तरी ते फारसे लाभदायक नाही. कारण नियोजनशून्य कारभारामुळे महापालिका कर्जबाजारी झाली आहे. त्यामुळे त्यांना शहरात विकासकामे करणे शक्य नाही. विकासकामेच नसल्याने निवडणुकीत लोकांसमोर काय घेऊन जाणार, हा प्रश्न आहे. जैनांना शिवसेना पक्षप्रमुखांनी आशा लावल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवलेल्यांनी ते पुन्हा खुंटीला टांगून ठेवले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि मतदार या सर्वांमध्येच संभ्रम आहे. सुरेश जैन यांना शिवसेनेने उमेदवारी दिली तरी ते स्वत:साठी फिरू शकणार नाहीत; त्यांना तुरुंगातूनच लढावे लागेल, असे चित्र आज तरी दिसत आहे. कारण निवडणुकीआधी ‘घरकुल’च्या निकालाची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जळगाव मतदारसंघात मनसेच्या ललित कोल्हेंशिवाय कुणीही उमेदवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करताना दिसत नाही. अर्थात, कुंपणावर असलेले ऐनवेळी निवडणुकीच्या आखाड्यात उड्या मारायला तयार असतील. पण ही निवडणूक जैनांसाठी लढली तरी आणि नाही लढली तरी अस्तित्वाचीच असणार आहे.

जैनांसारखीच स्थिती नंदुरबारचे एकेकाळचे सर्वेसर्वा असलेल्या काँग्रेसच्या सुरूपसिंग नाईकांची झाली आहे. सॉ मिल परवानगीप्रकरणी जेल आणि त्यानंतर गत निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यामुळे आपल्या कोशात जाऊन बसलेले नाईक या वेळेस पुन्हा नवापूर (जि. नंदुरबार) या मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे विद्यमान आमदार शरद गावित (विजयकुमार गावित यांचे बंधू) हे राष्‍ट्रवादीत गेल्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस-राष्‍ट्रवादीच्या आघाडीचा प्रश्नच राहत नाही. राज्यात आघाडी झाली तरी नंदुरबार जिल्ह्यात ती बिघडणारच, हे मात्र तेवढेच खरे आहे. त्यामुळे उमेदवार कोणत्याही पक्षांचे असोत, ‘विजयकुमार गावित विरुद्ध काँग्रेस’ अशाच लढती या जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये पाहायला मिळणार आहेत. डॉ.गावित हे राष्‍ट्रवादीचे आमदार असताना त्यांनी मुलगी हीना यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळवून दिली. याचा अर्थ तेदेखील भाजपकडूनच उमेदवारी करण्याची शक्यता आहे. तथापि, त्यांच्यावरही आदिवासी योजनांच्या गैरव्यवहाराचा ठपका आहेच व त्यांचीही चौकशी सुरू आहे. दुसरीकडे एक भाऊ आणि शालक राष्‍ट्रवादीत, दुसरा शिवसेनेत, मुलगी भाजपची खासदार आणि स्वत:ची राष्‍ट्रवादीतून झालेली हकालपट्टी अशा वळणावर ही निवडणूकही त्यांच्यासाठी कसोटीच ठरणार आहे. सुरूपसिंग नाईक यांनाही पूर्वीचे वैभव प्राप्त करण्यासाठी उतारवयात झुंजावे लागणार आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी ज्यांचे नाव अचानक चर्चेत यायचे ते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासाठी ही निवडणूकही वेगळे वळण घेऊन आली आहे. ज्यांच्याविरुद्ध लढायचे आहे, ते शिवसेनेचे आमदार शरद पाटील यांच्या व्यासपीठावर शालक सुभाष देवरे जाऊन बसल्यामुळे त्यांचीही पंचाईत झाली आहे. अर्थात, देवरेंना त्यांनीच पाठवले आहे की आमदार होण्यासाठी देवरे स्वत:च गेले आहेत, हे निवडणुकीचे मैदान खुले होईल तेव्हा समजेलच; पण आज तरी रोहिदास पाटलांसाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वेळच्या पराभवातून धडा घेत त्यांनी या वेळेस मतदारसंघ पिंजून काढला आहे; पण लोक त्यांना पुन्हा स्वीकारतात की शरद पाटलांच्या मागे जातात, हेही निवडणुकीनंतरच कळणार आहे. त्यामुळे खान्देशातील ज्येष्ठ नेत्यांसाठी येणारी विधानसभा निवडणूक ही राजकीय अस्तित्वाची अंतिम लढाई असणार आहे.