आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटे मोदी: गोव्याच्या राजकारणाला दिले नवे सोज्वळ रूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोव्याचे मावळते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री आहेत. याचा अर्थ अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले सुशिक्षित व्यक्ती आहेत. त्यांचा राजकारणातील प्रवेश गोव्यातील मोठे स्थित्यंतर होते. त्याआधी येथील राजकारण बरेच बदनाम झाले होते. चर्चिल यांच्यासारख्या नेत्यांवर तस्करीचे आरोप झाले होते. त्या वेळी गोव्याच्या राजकारणात दोन पद्धतीचे लोक होते. एक म्हणजे राजकीय घराण्याशी संबंधित लोक पैसे कमावण्यासाठी इथे येत होते. यामुळे स्वहित साधण्यासाठी बराच संघर्ष झडत असे. तुम्हाला आठवत असेल, १९९० च्या दशकात गोव्यात दर सहा महिने, वर्षभरात सरकार बदलत होते. यामुळे गटातटाच्या व पक्षांतराच्या राजकारणाला उधाण आले होते. गोव्यातील लोकांना या अस्थिर स्थितीचा कंटाळा आला होता. अशा वातावरणात मनोहर पर्रीकरांचा राजकारण प्रवेश सुखावून गेला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीत वाढलेल्या, शाखेमध्ये जाणा-या पर्रीकरांना राज्याच्या राजकारणात सर्वोच्च स्थान प्राप्त होणे एक वेगळी घटना होती. याचे कारण म्हणजे ते गौड सारस्वत ब्राह्मण आहेत. गोवा व महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा पाहता ब्राह्मणांना विशेष संधी प्राप्त होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे गोव्यात कॅथोलिक ख्रिश्चन ३५ टक्के आहेत. त्यामुळे ख्रिश्चनांच्या पाठिंब्याशिवाय कोणत्याही नेत्याला यश मिळणे अवघड होते. मात्र, पर्रीकरांच्या व्यक्तिमत्त्वाने या समाजाला आपलेसे केले. पर्रीकरांच्या राजकीय प्रवासात अडचणी आल्या नाहीत अशातला भाग नाही. त्यांना यासाठी बराच संघर्ष करावा लागला. गटबाजीच्या राजकारणात साम, दाम, दंड,भेद करण्यास सक्षम नसल्याने पर्रीकर राजकारणासाठी पात्र नाहीत, असेही सांगण्यात आले.

त्यांचे व्यक्तिमत्त्व ब-याच अंशी मोदींसारखे आहे. गोव्यात तर त्यांना छोटा मोदी संबोधले जाते. मोदींसारखेच ते हुकूमशहाप्रमाणे काम करतात. मोदींप्रमाणेच त्यांच्यावरही माध्यमे नाराज आहेत. पर्रीकर नीट बोलत नाहीत, व्यवस्थित उत्तर देत नाहीत, असा त्यांच्यावर आरोप होतो. अशा स्थितीत दोघांचे केंद्रात जमेल का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. पर्रीकर खूप साधे राहतात, त्यांना बडेजाव आवडत नाही. आयआयटी शिक्षणानंतर त्यांनी कंपनी सुरू केली होती. संपत्तीही फार नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तेत वाढ झाली नाही. पत्नीचे निधन होऊन बरीच वर्षे झाल्याने कुटुंबात सर्वकाही तेच आहेत. राजकारणातील व्यग्रतेमुळे त्यांचा मुलगा आता कंपनी सांभाळतो. त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप कधी लागले नाहीत. मोदींप्रमाणेच पर्रीकर २४ तास सात दिवस काम करणारे नेते आहेत. दोन वर्षांपूर्वी आम्ही त्यांना सीएनएन-आयबीएनच्या एका कार्यक्रमात बोलावले होते. त्यांनी प्रयत्न केल्यास लहान राज्यांचे राजकारणही बदलू शकते, असे सांगितले. गोव्याचे राजकारण त्यांनी निश्चितच बदलले आहे.

२००९ मध्ये ते केंद्राच्या राजकारणात येऊ शकले असते. तेव्हा त्यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चिले गेले. मात्र, एका टीव्ही कार्यक्रमात त्यांनी अडवाणींविरुद्ध वक्तव्य केल्याने नाव मागे पडले. ते लहान राज्यातून येत असल्याचेही काहींचे म्हणणे होते. संरक्षण मंत्रालयामध्ये सदैव प्रामाणिक व्यक्तीची आवश्यकता असते. पर्रीकर यांच्याबाबतीत ते लागू पडते. ए. के. अँटनीही प्रामाणिक होते, मात्र ते निर्णय घेत नव्हते. पर्रीकर धाडसी निर्णय घेणारे नेते आहेत. ते चांगले वक्ते नाहीत. गोव्यात माझे लहान घर आहे. गेल्या डिसेंबरमध्ये तिथे आमचा कौटुंबिक कार्यक्रम होता. पर्रीकरांनीही त्यासाठी यावे अशी आमची इच्छा होती. दुस-या दिवशी मुलाचे लग्न असल्याने १५ मिनिटांसाठी अवश्य येऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी ते आश्वासन पाळले. त्यामुळे हा बांधिलकी ठेवणारा नेता आहे.
नाव - मनोहर पर्रीकर
- वडील- गोपालकृष्ण प्रभू
- जन्म - १३ डिसेंबर १९५५, मापुसामध्ये
- शिक्षण - आयआयटी, मुंबईतून पदवी.
- कुटुंब- पत्नी स्व. मेधा पर्रीकर, दोन मुले. एक उत्पल इंजिनिअर, लहान मुलगा अभिजित अमेरिकेत मॅनेजमेंट अभ्यासक्रम शिकला आहे. दोघांचे लग्न झाले आहे.
ज्येष्ठ पत्रकार असलेले राजदीप यांचे गोव्यात घर आहे. मनोहर पर्रीकर आणि गोव्याच्या राजकारणावर त्यांचा २० वर्षांपासून अभ्यास आहे. अतिथी लेखक या नात्याने त्यांनी पर्रीकरांच्या राजकीय प्रवास विशद केला.