आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Marathwada Development And Drought Situation

मराठवाडी मरगळ विकासाला मारक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या विभागाचा विकास होण्यासाठी जनतेची प्रबळ आणि जबाबदार मानसिकता जशी महत्त्वाची ठरते तसेच कर्तबगार लोकप्रतिनिधी, समंजस, कर्तव्यदक्ष आणि सर्वंकष विकासाविषयी सहानुभूतीचा दृष्टिकोन बाळगणारी नोकरशाही तसेच नैसर्गिक साधन संपत्ती हे घटकदेखील महत्त्वाचे ठरतात. मी जेव्हा मराठवाड्याकडे पाहते, तेव्हा लक्षात येतं की, हे चारही घटक दुबळे पडले आहेत. अनेक पंचवार्षिक योजना आणि राज्य शासनाचे अनेक अर्थसंकल्प येऊन गेले, पण मराठवाड्याची गाडी विकासाच्या रुळावरून काही पुढे सरकली नाही. मराठवाड्यात जायकवाडी सारखं धरण बांधण्यासाठी शंकरराव चव्हाणांनी त्या वेळी प्रयत्न केले नसते तर कदाचित गोदावरीचे सर्व पाणी आंध्रला द्यावे लागले असते. त्यानंतर असे नेतृत्व पुढे आले नाही. इथे पुढा- यांची वाणवा नाही, परंतु या सगळ्यांची मोट बांधून विकासासाठी प्रयत्न करणारा नेता मात्र नाही, हा एक मोठाच अनुशेष म्हणावा. ऐंशीच्या दशकात जालन्यात काही मोठे कारखाने, प्रकल्प येऊ घातले होते. ते आले असते तर विभागातल्या कामगारांना काम मिळाले असतं. पण केवळ पाणी नाही म्हणून ते प्रकल्प इतर शहरात गेले. केवळ जालनाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात हेच चित्र पाहायला मिळते. आमच्यातूनच निवडून गेलेले लोकप्रतिनिधी हळूहळू संस्थानिक होतात. लोक विकासाची कामे बाजूला राहतात. विकास निधीची तरतूद केली जात असतांना मराठवाड्याचा विकासनिधी +अनुशेष = एकूण विकास निधी अशा प्रमाणात मिळवायलाच हवा हा निर्धार त्यांच्यात दिसतच नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. संपूर्ण मराठवाड्यातल्या राजकीय शक्तींनी एकत्र येऊन आवाज उठवायला हवा. राजकीय आणि प्रशासकीय शक्तींनी एकत्र येऊन विभागाच्या समस्या लक्षात घेऊन संपन्नतेचं स्वप्न पाहायला हवं.
या दुष्काळानं आम्हाला थोडं फार हे शिकवलं. घाणेवाडीचा गाळ काढण्यास चार वर्षांपासून जलसंरक्षण मंच ही संस्था झटते आहे. अशा प्रेरणा गावपातळीपासूनच जागृत होऊ शकल्या आणि खेडी दत्तक घेऊन त्यांचा विकास साधला गेला तर मराठवाड्यावरील मागासलेपणाचा ‘स्टॅँप’ पुसला जाऊ शकतो. संपूर्ण मराठवाड्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. आठवीतल्या मुलांना नीट लिहिता-वाचता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सहाव्या वेतन आयोगाचा पगार उचलणा- या शिक्षकांकडून आम्ही अपेक्षा ठेवायची की नाही? मला जॉन केनेडींचे शब्द आठवतात, ‘डोन्ट आस्क व्हॉट कंट्री हॅज डन फॉर यू बट आस्क व्हॉट यू हॅव डन फॉर युवर कंट्री’. केवळ साक्षर नाही तर जीवन साक्षीभूत होऊन जगलं तर काय घडू शकतं याचा आदर्श वस्तुपाठ जालना तालुक्यातील कडवंची या गावानं घालून दिला आहे. या लहानशा गावात दोनशे शेततळी आहेत. इथला शेतकरी शेतात राहतो, द्राक्षांच्या बागा पिकवितो, इथली द्राक्ष संपूर्ण भारतात जातात. जीवनाच्या पाटीवर कर्तृत्वाची अक्षर लिहिण्याची ऊर्जा शेतक- यांसह सर्वच नागरिकांमध्ये जागली तर मराठवाड्याच्या विकासात कोलदांडा घालण्यास कोणी धजावणार नाही.
(लेखिका कादंबरीकार, नदी जोड प्रकल्पाच्या अभ्यासक आहेत.)