आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Mumbai Report Card By Pramod Chunchuwar, Divya Marathi

राजकारणातील फॉर्म्युला वन रेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महायुती तुटते की राहते, या प्रश्नाभोवती राज्याचे राजकारण आठवडाभर फिरत राहिले. रुग्णालयात दाखल झालेल्या गंभीर आजारी व्यक्तीचा ईसीजी जसा वर-खाली होत असतो तसा भाजप-सेना युतीच्या अभंगतेचा आलेख सतत वर-खाली होत होता. तुटली रे तुटली अशा बातम्या टीव्ही वाहिन्यांवर शुक्रवारी पसरल्या आणि राज्यभरात खळबळ माजली. या बातम्यांची पेरणी शिवसेना नेत्यांनीच केली होती आणि भाजपला जोर का झटका देऊन जमिनीवर आणण्याचे डावपेच यामागे होते, असे नंतर स्पष्ट झाले होते. सध्या माध्यमांना हाताशी धरून राजकारण खेळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात राजकीय घडामोडी इतक्या वेगाने घडत असतात की उच्चपदस्थ राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवण्यावाचून माध्यम प्रतिनिधींसमोर अनेकदा पर्याय नसतो. मुंबईत सध्या एका मराठी वर्तमानपत्रात भाजपने पेरलेल्या तर टीव्ही माध्यमात शिवसेनेने पेरलेल्या बातम्यांवर माध्यमे आणि राजकारण क्षेत्रात खुमासदार चर्चा झडत असतात.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी त्सुनामी लाटेमुळे आणि भाजपने नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर केल्याने राज्यात भाजप आणि सेनेला अपेक्षेच्या दुप्पट जागा मिळाल्या. देशातील काही राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्याने मोदी लाटेला ओहोटी लागल्याची टीका होऊ लागली. अर्थात मोदी लाट खरोखरच होती का आणि असेल तर तिला ओहोटी लागली का, हा वादाचा प्रश्न आहे. मात्र राज्यात या पोटनिवडणुकांच्या निकालाचा कोणताही फटका भाजप-सेनेला बसणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे. देशभरात काँग्रेसविरोधी नाराजी असतानाही कर्नाटक विधानसभेत काँग्रेसची सत्ता आली. कारण तेव्हा कर्नाटकात भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध जनतेत चीड होती आणि येदुरप्पा हे भाजपविरुद्ध लढले होते. तसेच या वेळेस राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट व विकासाच्या आघाडीवर अपयशी सरकारविरुद्ध अशीच चीड जनतेच्या मनात आहे. त्यामुळे भाजप-सेनेचे सत्तेत येणे निश्चित आहे. या खात्रीमुळेच भाजप-सेनेमध्ये जागावाटपाचे कारण पुढे करून सुरू असलेल्या वादाशी खरे तर मूळ कारण आहे ते मुख्यमंत्रिपदाचे. जागा ज्याच्या अधिक त्याचे आमदार अधिक आणि त्याचाच मुख्यमंत्री, असे हे समीकरण असल्याने दोन्ही पक्षांची लढाई ही खरे तर मुख्यमंत्रिपदासाठी आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा लवकर सुटेल असे दिसत नाही. पोटनिवडणुकीत गुजरातमध्येच भाजपचा पराभव झाल्याने शिवसेना आता आक्रमक भूमिका घेणार आहे, हे तर निश्चित. लोकसभा निवडणुकीत भाजप हा मोठा भाऊ तर शिवसेना छोटा भाऊ तर विधानसभेत हे समीकरण उलटे असते. भाजप-सेना युती झाल्यापासून हे ठरलेलेच आहे. मात्र २००९च्या विधानसभा निवडणुकीत सेनेपेक्षा ५० जागा कमी लढूनही भाजपने सेनेपेक्षा दोन जागा अधिक जिंकल्या. या स्ट्राइक रेटमुळेच या वेळेस भाजपला अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. त्यामुळे आपल्या जागा वाढवून घेण्यासाठी त्यांनी नवा फाॅर्म्युला दिला आहे. तो म्हणजे लोकसभेत भाजपने २६ आणि सेनेने २२ जागा लढल्या होत्या. हेच समीकरण राज्यात उलटे करून सेनेने नेहमीप्रमाणे मोठ्या भावाची भूमिका वठवावी, असा धूर्त प्रस्ताव भाजपने सेनेसमोर ठेवला आहे. याचा अर्थ २६ लोकसभा म्हणजे १५६ विधानसभा ( एका लोकसभेत ६ विधानसभा येतात.) शिवसेनेने तर २२ लोकसभा म्हणजे १३२ विधानसभा भाजपला देण्यात याव्यात असा नवा प्रस्ताव भाजपने सेनेकडे ठेवला आहे. पितृपक्षाचा समारोप २४ सप्टेंबर रोजी होत आहे. २५ सप्टेंबर रोजी सेनेने वांद्र्यातील रंगशारदामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तिकिटेच्छुक उमेदवार, घटक पक्ष आणि महत्त्वांकाक्षी नेते यांना अडकवून ठेवण्यासाठी हा खेळ खेळला जातोय. भाजप-सेना दोघांनी मिळून जागांसाठी उंच उड्या मारणा-या घटक पक्षांचा असा काही गेम केलाय की हे पक्ष "आम्हाला जागा नको मात्र तुम्ही एकत्र लढा,' असे म्हणत काकुळतीला आले आहेत. २५ तारखेला हा वाद संपला असेल आणि बहुसंख्य उमेदवारांची घोषणा झाली असेल. सत्ता हातून जाणार हे स्पष्ट दिसत असल्याने अस्वस्थ झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचेही भिजत घोंगडे २५ तारखेपर्यंत कायम राहणार आहे. जागावाटपाबद्दल काँग्रेस आघाडी वा महायुतीतील भाजप-सेना यांच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये जवळपास निर्णय झाला आहे. सध्या सर्वच पक्ष आपापले उमेदवार निश्चित करण्यात गुंतले असून माध्यमे आणि कार्यकर्त्यांसाठी जागावाटपाचे तुणतुणे वाजवले जात आहे. त्यामुळे २५
तारखेपर्यंत राजकीय फॉर्म्युला वन रेस बघून स्वत:चे मनोरंजन करून घेण्याशिवाय राज्यातील जनतेसमोर पर्याय नाही.