आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Nationalist Congress By Pramod Chinchurwar, Divya Marathi

2019 चे राष्‍ट्रवादी मिशन राणेंची कॉंग्रेसी बोळवण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, असा नाट्यप्रयोग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगला आहे. सत्तेत येण्याचे दिवस जवळ आल्याने आता भाजप-शिवसेनेस मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा धक्का पचवू न शकलेल्या काँग्रेसला आता रोज राष्ट्रवादीसारखा राजकीयदृष्ट्या ‘दबंग’ पक्ष धक्के देतोय. कधी नव्हे इतकी काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर दुबळी झाली आहे.
मित्र पक्षांशी संघर्ष करण्याची जोखीम घेणे सध्या तरी काँग्रेसला परवडणारे नाही. एवढेच नव्हे तर पक्षातील बंडोबांनाही फार दुखावून चालणार नाही. कारण सोन्याचे अंडे देणा-या मुंबईत सत्ता असणे याचे काय काय लाभ होऊ शकतात, याची काँग्रेसला कल्पना आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता जाण्याची शक्यता असतानाही कोणत्याही परिस्थितीत सत्ता जाऊ नये यासाठी काँग्रेस आणि मित्र पक्ष राष्ट्रवादी यांच्या लटपटी खटपटी चालू आहेत. राजकीय वारे नेमके हेरून काँग्रेसच्या नाड्या कशा आवळायच्या यात शरद पवार हे वाकबगार आहेत. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आपल्या जागा वाढवून घेण्याचा त्यांचा आग्रह आहे.
2009 मध्ये राष्ट्रवादीने 114, तर काँग्रेसने 174 जागा लढवल्या होत्या. मात्र, या पाच वर्षांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपली ताकद वाढवली. काँग्रेसच्या एक पाऊल पुढे टाकत शिवसेना-भाजप यांच्यासोबत अभद्र युती करण्यात राष्ट्रवादीने कोणतीही कसर सोडली नाही. महापालिका, जिल्हा परिषदा या स्थानिक सत्ताकेंद्रांमधील काँग्रेस आघाडी व शिवसेना-भाजप महायुती यांची मैत्री पाहिली असता खरेतर महाराष्ट्रात विरोधी पक्ष नाहीच असेच म्हणावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या चंद्रपूर या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे उदाहरण घेता येईल. या जिल्हा परिषदेचे मुख्यालय चंद्रपूर शहरात भागवत यांच्या घरापासून केवळ 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
जेव्हा नवी दिल्लीत वा राष्ट्रीय पातळीवर रा.स्व.संघ आणि भाजप ही काँग्रेसवर तुटून पडत होती तेव्हा चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजप आणि काँग्रेस यांचा सुखेनैव संसार सुरू होता आणि गेल्या एक वर्षापासून सिंचन घोटाळ्यात बदनाम झालेल्या राष्ट्रवादीसोबत याच जिल्हा परिषदेत भाजपचा सत्ता संसार सुरू आहे. चंद्रपूर शहरातील महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. रा.स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर शहरातील नागपूर जिल्हा परिषदेतही असाच राष्ट्रवादी-भाजपचा संसार सुखाचा सुरू आहे. हमाम में सब... अशा उक्तीनुसार सध्याचे राजकारण महाराष्ट्रात सुरू असताना सत्तांतर झाले तरी एकही घोटाळेबाज नेता वा उच्चपदस्थ अधिकारी तुरुंगात जाणार नाही वा त्यांची संपत्ती जप्तही होणार नाही.
लोकांना तेच ते चेहरे सत्तेत पाहून कंटाळा आलाय आणि काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या मग्रुरीला कंटाळले आहेत, त्यामुळे केवळ रुचीपालट म्हणून सत्तांतर होऊ शकते. राजकीय सपाटीकरणाचा लाभ उठवत राष्ट्रवादीने आपली ताकद चौफेर वाढवली. कथित मोदी लाटेतही काँग्रेसपेक्षा दोन अधिक खासदार निवडून आल्याने तर आता राष्ट्रवादीला राज्यात क्रमांक एकचा पक्ष होण्याच्या उंबरठ्यावर आपण पोहोचल्याचे वाटणे स्वाभाविक आहे. अशात काँग्रेसचे नेतृत्व राजकीय खंबीरपणा न दाखवणा-या पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती असल्याने तर आक्रमक राष्ट्रवादीला आगामी निवडणूक ही पक्षाला क्रमांक एकवर नेण्याची हीच सुवर्णसंधी असल्याचे वाटू लागले आहे. 2014 मध्ये आपला पराभव झाला तरी काँग्रेसपेक्षा आपले संख्याबळ विधानसभेत अधिक राहावे म्हणजे विधानसभेत अजित पवार हे विरोधी पक्षनेतेपदी राहून पुन्हा लाल दिव्याची गाडी आणि मंत्रिपदाचा दर्जा मिळवू शकतात. विधान परिषदेत तर यापूर्वीच राष्ट्रवादीची सदस्य संख्या जादा आहे. सुनील तटकरे यांच्या बिनविरोध निवडीने आता विधान परिषदेत राष्ट्रवादीचे 30, तर काँग्रेसचे केवळ 22 सदस्य उरले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्यास पवारांचे खास असलेले तटकरे हे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर विराजमान होतील आणि त्यांनाही मंत्रिपदाचा दर्जा मिळेल. याला म्हणतात चीत भी मेरी, पट भी मेरी. या विरोधी पक्षनेतेपदाचा वापर करून 2019 मध्ये आपल्या नेतृत्वात सरकार बनवणे सहज शक्य होईल, असे राष्ट्रवादीतील डोकेबाज नेत्यांना वाटत आहे.
त्यामुळे 2014 च्या जागावाटपाच्या चर्चा अशा 2019 चे लक्ष्य ठरवून केल्या जात आहेत. काँग्रेस 10 पेक्षा अधिक जागा वाढवून देत नाहीच तर विधान परिषेदची तरी एक जागा वाढवून घ्या, अशा हेतूने हे डावपेच खेळण्यात आले आहेत. तटकरेंच्या जागेवर त्यांचे पुत्र रोहा मतदारसंघातून उभे राहू शकतात. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोट्यातून 4 जागा या वेळेस देण्यात येणार आहेत. या कोट्यात रोह्याची निवड झाली तर तटकरेंची कन्या अदितीला संधी मिळू शकते. या सा-या प्रक्रियेत राजकारणातील घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. सुनील व अनिल तटकरे हे बंधू आता विधान परिषदेत तर या कुटुंबातील एक सदस्य विधानसभेत असे एकाच कुटुंबातील तीन सदस्य विधिमंडळात बघायला मिळतील! काँग्रेसने अलीकडेच जाहीर केलेल्या समित्यांची जंत्री वाचून चांगलीच करमणूक झाली. आदर्श घोटाळ्यातून सहीसलामत बाहेर काढण्यात आलेले अशोक चव्हाण हे समन्वय समितीचे प्रमुख, तर बंड करून नंतर लोटांगण घालणारे नारायण राणे हे प्रचार समिती प्रमुख असणार आहेत. प्रचार समिती प्रमुखपद राणेंना जाहीर होताच जणू काही मुख्यमंत्रिपदाची उमेदवारीच त्यांना जाहीर झाली असल्याचा भ्रम काही माध्यमांचा आणि राणेभक्तांचा झाला आहे. 2009 मध्येही लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बाळासाहेब विखे पाटील यांना तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तत्कालीन केंद्रिय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांना प्रचारप्रमुखपद देण्यात आले होते. या दोघांना एकूणच उमेदवार निवड आणि जाहीर सभांमधली भाषणे यांच्यात किती स्थान मिळाले होते हे जगजाहीर आहे.
राणेंना शोभेचे पद देऊन खरेतर बोळवण करण्यात आली आहे. राणेंच्या भाषणाची वा त्यांच्या नेतृत्वाची लोकप्रियता कोकणाबाहेर मुळातच नाही आणि आता तर तेथेही त्यांचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. सामूहिक नेतृत्वाची चर्चा सध्या काँग्रेसमध्ये रंगली असली तर निवडणुकीचे नेतृत्व पृथ्वीराज चव्हाणच करतील, हे स्पष्ट आहे.