आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On New Turn To Maharashtra Assembly Election By Sanjiv Unhale, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदारराजाची चांदी आणि नव्या समीकरणांची नांदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात पंचवीस वर्षांनंतर एकदाची पंचरंगी लढत झडत आहे. राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच अवघ्या ४८ तासांत बहुसंख्य उमेदवारी अर्ज भरण्याचा आगळा विक्रम झाला. एवढेच नव्हे, तर कोणाकडे किती जागा याची खलबते तब्बल २२ दिवस आणि उमेदवारी वाटपाचा निर्णय अवघ्या दोन-चार तासांत घेण्याची पाळी आल्याने पक्षांची निर्णयक्षमताही (नंतर पश्चात्ताप झाला तरी) वाढली. उमेदवारांची धडधड शनिवारी इतकी वाढली होती की कार्यकर्ते, पक्षश्रेष्ठींशी संपर्क आणि कागदपत्रांचे भेंडोळे सांभाळताना अक्षरश: अनेकांची पाचावर धारण बसली.
अर्थात, या पंचरंगी सामन्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचे सारे गणितच आता बदलले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे यांना कोणत्याही स्थितीत भारतीय जनता पक्षाला सत्तारूढ होऊ द्यायचे नाही. एकदा ते सत्तेला चिकटले की एक दशकभर ते राज्य करतील याची साधार भीती आहे, तर दुस-या बाजूला गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अहवालात कोणत्याही युतीशिवाय एकट्या भाजपला ११५ जागा मिळतील, असा अहवाल दस्तुरखुद्द भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या हातात ठेवल्यामुळे त्यांनी निवडणुकीला एकतर्फी जाण्याचे ठरवले. भाजप नेत्यांचा आधीच मोदी हवेमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढला. त्यामुळे रिपाइं आणि इतर पक्षांचे कडबोळे एकत्र करून दलित आणि इतर मागासवर्गीयांची मतपेढी खेचण्याचे काम वरच्या पातळीवरून सुरू झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीमुक्त काँग्रेस झाल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेखाली निवडणूक लढवण्याची संधी वाढली. एरवी भाजप-सेना युती झाली असती, तर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असते, पण आता मतविभागणी अपरिहार्यपणे होणार असल्याने किमानपक्षी बलशाली उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या घोटाळ्यामुळे अंगावर होणारी चिखलफेक काँग्रेसच्या मंडळींवर होणार नाही.
खरे तर महायुतीचे सगळे वातावरण निर्माण झाले होते; शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आई तुळजाभवानीचे आशीर्वाद घेण्यासाठी सहकुटुंब तुळजापूरकडे प्रयाण केले. काही छोट्या सहयोगी पक्षांच्या पाच-दहा जागांसाठी पंचवीस वर्षांची युती तुटेल, असे वाटले नव्हते. मग अचानक अशी कोणती चक्रे फिरली की घटस्थापनेच्या दिवशी आघाडी आणि युतीचा एकाच वेळी घटस्फोट झाला. या मागचे इंगित असे की, महाराष्ट्राचे कोणतेही राजकारण शरद पवारांना कडेला सारून होत नाही याचा सोयिस्कर विसर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पडला. राष्ट्रवादीच्या कोंडीच्या प्रयत्नात त्यांनी बुधवारी रात्री बारानंतर काँग्रेसची ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये आठ ते दहा जागा या राष्ट्रवादीच्या जागा अदलाबदलीच्या प्रस्तावातील होत्या. यादी जाहीर करण्याचा पहिला मान काँग्रेसने मिळवला हे खरे, पण इथेच सारे गणित चुकले. बुधवारी रात्री माध्यमांनी महायुती झालीच असे चित्र निर्माण केले. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाटाघाटीचे गुऱ्हाळ चालू होते. दिल्लीमध्ये बसून प्रफुल्ल पटेल आणि अहेमद पटेल वाटाघाटी करत होते. राष्ट्रवादीला आपण आता जेरीस आणू शकतो असा आडाखा बांधून मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर करण्याची घाई केली. ही यादी जाहीर होताच मध्यरात्रीनंतर सर्व चक्रे उलट्या दिशेने फिरायला सुरुवात झाली. बुधवारी मध्यरात्रीनंतर रिपाइंचे नेते रामदास आठवले अचानकपणे दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये मुंबईहून अवतरले आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा संदेश घेऊन भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला दिल्लीत भेटले. त्यानंतर महायुतीतील आमच्या मित्रांना आम्ही सोडू शकत नाही, अशी भाजप नेत्यांनी शिवसेनेशी भाषा सुरू केली. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधानांना महायुतीमध्ये शिवसेना अडेलतट्टूपणाची भूमिका घेत आहे, असे सांगून भाजप-सेनेच्या विभक्तीकरणाला मान्यता मिळवली. पंतप्रधानांचे विमान अमेरिकेच्या दिशेने झेपावताच घटस्फोटाची तयारी वेगवान झाली. खरे म्हणजे राष्ट्रवादीतील अजितदादा पवारांच्या गटाला आणि भाजपमधील तरुण तुर्क गटाला आघाडी आणि युती नकोच होती. त्यांनी याचा फायदा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाचे तीनतेरा वाजवले.
पुलोद मॉडेल नव्या रूपात अवतरण्याची शक्यता का?
असे म्हणतात की शरद पवार आणि त्यांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे १९८४ चे पुलोद मॉडेल पुन्हा नव्या स्वरूपात अवतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र आले पाहिजे आणि भाजप सरकार प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या मागे आहे या आधाराने सगळ्यांची मोट एकत्र बांधली जाऊ शकते. कारण बिहारमधील लालू-नितीश या अहिनकुलांनासुद्धा भाजपच्या रेट्यामुळे एकत्र यावे लागले, पण दुस-या बाजूला भाजप आणि सेनेच्या जागा मोठ्या प्रमाणात आल्या, तर निवडणुकीनंतर ब्रेक के बाद युतीचा संसार मांडला जाऊ शकतो. म्हणूनच अनंत गितेच्या राजीनाम्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांतील युतीबद्दलचे सर्व निर्णय जैसे थे ठेवण्यात आले आहेत. सध्या तरी मतदारराजाची चांदी आणि नव्या समीकरणांची नांदी एवढे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.