आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरिक जाणिवेचा बहुगुणी कवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक बहुगुणी, प्रतिभासंपन्न कवी असं एका वाक्यात कवी शंकर वैद्य यांचं वर्णन करता येईल. कवी म्हणून ते जितके संवेदनशील होते, तसेच माणूस म्हणूनही होते. इतका चांगला ‘माणूस’, इतका चांगला ‘कवी’, गीतकार आपल्यातून गेला याचं मला अत्यंत वाईट वाटत आहे. त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. सरोजिनीबाई -त्यांच्या पत्नींच्या निधनानंतर ते विलक्षण एकाकी झाले होते. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायचाे तेव्हा तेव्हा मला त्यांची ही वेदना अगदी आतून कळायची. दोघा पती-पत्नींचा एकमेकांवर खूप जीव होता; पण त्यांनी त्यांचे एकाकीपण कधीही स्वत:हून आपल्या अभिव्यक्तीतून जाणवू दिले नाही. नव्या लेखकांना, कवींना ते सतत प्रोत्साहन देत असत. नव्या पिढीतल्या लाेकांविषयी, त्यांच्या लेखनाविषयी ते सतत सजग असत. अशी माणसे साहित्यक्षेत्रात पुन्हा होणे नाही. माझा त्यांच्याशी विंदा, बापट यांच्याइतका कधी वैयक्तिक संवाद फारसा नव्हता; पण तरीही एका कवीला दुस-या कवीची आंतरिकता कळते ना... वैद्यांशी माझा तसाच आंतरिक संवाद होता.

जगण्यातील कविता हरवू नकोस सांगणारे वैद्य सर
स्पृहा जोशी, अभिनेत्री, कवयित्री
मी अकरावीत असल्यापासून वैद्य सरांच्या संपर्कात होते. एका स्पर्धेच्या निमित्ताने माझी त्यांच्याशी ओळख झाली होती. त्या वेळेपासून मी नुकतीच लिहू लागले होते. वैद्य सर मला कायम समजावत की, जगण्यात एक कविता आहे, ती शोधायचा प्रयत्न कर. लय आहे आपल्या जगण्याच्या कवितेत. ती हरवू देऊ नकोस. त्यांनी सतत माझ्यातल्या लेखन ऊर्जेला प्रोत्साहन दिलं. आजच्या पिढीला कवितेतलं काय कळतं, असा दृष्टिकोन त्यांनी कधीच ठेवला नाही. नव्या लेखनाचं ते कायम स्वागत करायचे, त्याबाबत मार्गदर्शन करायचे. माझ्या ‘लोपामुद्रा’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी त्यांनी मला वयोमानानुसार उपस्थित राहू शकले नव्हते, तरी आशीर्वाद मात्र भरभरून दिला होता. त्यांच्या जाण्याने माझा एक मार्गदर्शक हरवला आहे.

संदर्भबहुलता असणारे प्राध्यापक
प्रज्ञा दया पवार, कवयित्री, लेखिका
वैद्य सरांच्या जाण्याने मला खरे तर धक्काच बसला आहे. एम.ए. पदवी शिकत असताना ते माझे शिक्षक होते. एक प्राध्यापक म्हणून त्यांचा खूप लाैकिक होता. त्यांच्याकडे संदर्भबहुलता होती. कवितेकडे केवळ एका परिप्रेक्ष्यातून न पाहता ती विविध परिप्रेक्ष्यांतून कशी समजून घ्यावी, हे वैद्य सर आम्हाला अत्यंत आत्मीयतेने शिकवत. सत्यकथा मासिकापासून त्यांनी कवितालेखनाला सुरुवात केली. १९६० च्या काळानंतरच्या कवितालेखनात जे बदल झाले त्याबाबतही ते स्वागतशील होते. माझ्यासारख्यांच्या कवितांना त्यांनी नेहमीच उत्तम पारखलं, प्रोत्साहन दिलं. सध्याच्या स्पर्धा, संशयाच्या संक्रमण काळात वैद्य सरांसारखे पारदर्शी पारख असणारे साहित्याचे व्यासंगी मिळणे तसे कठीणच.

कवितेशी प्रामाणिक राहणारे वैद्य सर
विष्णू जोशी, प्रकाशक, काव्याग्रह प्रकाशन
वैद्य सरांशी माझा सतत संपर्क असायचा. त्यांना नव्या लेखनाची कायम उत्सुकता असायची. लाेकनाथ यशवंतांच्या कवितांचे वा त्यांच्याचसारख्या अनेक कवींच्या कवितांचे त्यांनी कायम उत्तम रसग्रहण त्या त्या कवींशी संवाद साधत केले. त्यांनी कधीच ओढूनताणून कविता लिहिली नाही. एकदा त्यांनी मला लिहिलेल्या पत्रात ‘माझ्या हल्लीच्या कविता तुरळक पावसासारख्या आहेत’ असे प्रांजळपणे सांगितले होते. त्यांच्या जाण्याने कविताक्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

रोमँटिक कविता लिहिणारा कवी
वसंत पाटणकर, लेखक
वैद्य एक उत्तम कवी होते. आपल्या प्रकृतीला साजेशी त्यांनी कविता लिहिली. मर्ढेकर-बोरकरांवरती त्यांनी उत्तम समीक्षा केली होती. रोमँटिक वळणाची भावकविता लिहिणाचे त्यांनी सुरू ठेवले. गीतांमधली लय जपण्याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. एम.ए.च्या वर्गात ते मला शिकवायला होते. जी.ए. कुलकर्णींचा एक कथासंग्रह त्यांनी शिकवला होता. अत्यंत उत्तम प्राध्यापक म्हणून आमच्यात ते लोकप्रिय होते. कुसुमाग्रजांच्या कवितेचा त्यांच्यावर प्रभाव होता. कविता वाचन ते उत्तम करत असत. सादरीकरणाचे त्यांना अंग होते. वृत्तछंदामध्ये लिहणि्यावर त्यांचे प्रभुत्व होते.

पारंपरिक लेखन काळातील कवी
वसंत आबाजी डहाके, कवी, लेखक
मराठीतले एक महत्त्वाचे कवी म्हणून शंकर वैद्य यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पारंपरिक पण एका महत्त्वाच्या काळाची धाटणी लाभलेल्या कवींपैकी वैद्य एक होते. त्यांच्या कवितांशिवाय त्यांचे समीक्षात्मक लेखनही उत्तम होते. त्यांचे संपादनकौशल्यही वाखाणण्याजोगे होते. नव्या कवितांशी त्यांचा चांगला परिचय असायचा. कुसुमाग्रजांच्या कवितांचे त्यांनी चांगले समीक्षण केले होते. त्यांच्या जाण्याने एका महत्त्वाच्या लेखनशैलीला आपण गमावले आहे.