यासारख्या ओळींतून
आपल्या आईला रेखाटत हृदयाला स्पर्श करण्याची ताकद असणारे कवी शंकर वैद्य म्हणजे विविध भाववृत्ती, मूड्स आपल्या कवितेत सहजगत्या पकडणारे कवी म्हणून साहित्यवर्तुळात, काव्यप्रेमींमध्ये प्रसिद्ध होते.
वैद्य यांचा जन्म १५ जून १९२८चा. त्यांचे बालपण ओतूर या गावी गेले. सातखणी घराभोवती कडुनिंब, चिंच, कवठी अशी अनेक झाडे. निसर्गाच्या सहवासात वैद्य यांचे बालपण गेले. मात्र नंतरच्या काळात त्यांनी विविध अनुभवांच्या जगात प्रवेश केला. ओतूर सोडून १९४१ साली त्यांनी जुन्नर येथे माध्यमिक शिक्षण घेतले. त्या वेळी वातावरण पारतंत्र्याच्या जाणिवेने झाकोळलेले होते. क्रांतीचे वारे वाहू लागले होते.
याच वातावरणात बालदिनी पोवाडे म्हणण्याचे काम वैद्यांकडे आले त्यातून त्यांनी कवितेची वाट धरली. याच काळात त्यांचा रेव्हरंड टिळकांच्या कवितांशी स्नेह जमला. दरम्यान, वैद्य यांचा ‘आला क्षण गेला क्षण’ हा कथासंग्रह आला. पण नंतर त्यांना कवितेनेच पूर्णत: झपाटून टाकले. त्यात त्यांचे कथालेखन मागे पडले. कवितेच्या विश्वात रमतांना वैद्य १९४६ साली मॅट्रिक झाले आणि ओतूर-जुन्नर सोडून महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. पुण्यातील साहित्यिक वातावरणात स्वत:ला ते घडवत होते. तेथे त्यांनी शेतकी खात्यात सात वर्षे नोकरी केली. कवी गिरीश यांच्याशी पुण्यात असताना त्यांचा स्नेह जुळला. कवी यशवंतांनी त्यांच्या एका मासिकात छापून आलेल्या कवितेचे कौतुक केले आणि रविकरिण मंडळातील कवी गिरीश आणि कवी यशवंत या दोन प्रथितयशांशी त्यांचा परिचय आणखीनच दृढच होत गेला.
सहसा कवी आपली लेखनशैली कधीच बदलत नाही, ना आपल्या कवितेचा विशिष्ट काळात तयार झालेला स्वभाव. पण प्रवाहानुसार बदलण्याची, बदलता काळ स्वीकारण्याची स्वागतशीलता वैद्य यांच्याकडे होती. मर्ढेकरांच्या कवितांचा काळ होता त्या वेळी वैद्य यांनीही बदल ओळखत आपली कवितेकडे बघण्याची दृष्टी बदलली. वास्तववादी, अस्तित्ववादी कवितांच्या काळामध्ये त्यांनी २००० पर्यंत लिहिलेल्या कवितांपैकी केवळ चार ते सहा कविता वगळता बाकी सर्व कविता स्वत:हून बाद केल्या होत्या. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘कालस्वर’, त्यानंतर तब्बल २७ वर्षांनी त्यांचा ‘दर्शन’ हा काव्यसंग्रह आला. मधल्या काळात त्यांचा संग्रह आला नसला तरी विविध मासिकांमधून, साप्ताहिकांमधून त्यांचे कवितालेखन चालूच होते. "सत्यकथा' मासिकापासून त्यांनी कवितालेखनाचे विश्व विस्तारले होते. "स्वरगंगेच्या काठावरती'सारखी कितीतरी अवीट गीते त्यांनी लिहिली, ज्यात म्हटले तर कविता होती, म्हटले तर गाणे होते. "पालखीचे भोई' ही त्यांची कविता तर अजरामरच ठरली. कवितेची कोवळीक जपणारे वैद्य यांनी कधीच आपल्या स्वभावात, कवितेत आक्रमकपणा आणला नाही. त्यांच्या स्वभावानुसारच त्यांची कविता शांत होती, संयत होती. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांचे निधन झाले असले तरी साहित्याचा व्यासंग असणारा, नवबदलांची जाणीव असणारा कवी त्यांच्या कवितेतून चरिंतन राहणार आहे.