आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा14 मार्च हा कविवर्य सुरेश भट यांचा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा.
सुमारे 14 वर्षांपूर्वीची घटना असेल. नागपुरातील हिंगणा एमआयडीसीत एका लोखंडाच्या कारखान्यात कंत्राटी कामगार म्हणून मी काम करायचो. बारा तासाला शंभर रुपये मिळायचे. दिवसा पुस्तके व पेपर वाचायला मिळावीत, म्हणून मुद्दाम सुपरवायझरकडून रात्रपाळी मागून घेतली होती. एकदा एमआयडीसीतील पानठेल्यावर विजय राऊत यांची ओळख झाली. ते त्यावेळी ‘पब्लिक मीडिया’ नावाचे साप्ताहिक चालवायचे. पानठेल्यावर खर्याच्या (मावा) निमित्ताने नेहमी आमची भेट व्हायची. एक दिवस मी त्यांना म्हणालो, ‘मलाही वाचनाची व कविता लेखनाची आवड आहे.’ ते लगेचच म्हणाले, ‘तुम्ही एक कविता द्या, मी आमच्या पेपरमध्ये छापतो.’ कविता छापण्यासाठी पैसे लागतात, असे मला त्यावेळी वाटायचे. मी म्हणालो, ‘किती पैसे लागतील?’ त्यावर ते म्हणाले, ‘छे, कविता छापण्यासाठी पैसे लागत नाही.’ त्यानंतर काही दिवसांनी माझ्या कवितेचा कागद त्यांच्या हातात दिला. त्यांनी ती कविता प्रसिद्ध केली. कविता छापून आलेली पाहून मला खूप आनंद झाला. जो भेटेल त्याला मी पेपर दाखवायचो.
एके दिवशी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राऊत पानठेल्यावर भेटले. रात्रपाळी होती. त्यामुळे दिवसभर रिकामाच होतो. राऊत म्हणाले, ‘ चला, रामदासपेठेत जाऊन येऊ’. मी लगेचच होकार दिला. एमआयडीसीपासून रामदासपेठ हे अंतर साधारण आठ किलोमीटर असेल. मोटारसायकलीवर गप्पा मारत निघालो. रामदासपेठ ही नागपूरमधील र्शीमंतांची वस्ती. एका घरासमोर अपघातग्रस्त टाटा सुमो लावलेली होती. घरात जाईपर्यंत ते कुणाचे हे माहीत नव्हते. दरवाजाजवळ जाताच आतून ‘ये विजू’ असा आवाज आला. मग आम्ही दोघेही आत गेलो. खोली तशी मोठी होती. सगळीकडे अस्ताव्यस्त पडलेली पुस्तके. छोट्या टेबलासमोर खुर्ची टाकून एक मध्यमवयीन व्यक्ती बसली होती. नमस्कार झाला. ओळख करून देण्याइतका मी काही मोठा नव्हतो, तरी विजूने ओळख करून दिली. ज्यांच्याशी करून दिली ते होते गझलकार सुरेश भट. भटांनी पवार म्हणजे कोण? असे माझ्याकडे पाहून विचारले. मी लगेचच माझी जात सांगितली. भट यांना भेटण्याची, बोलण्याची संधी मिळाली यामुळे मी अगदी भारावून गेलो होतो. त्यांच्याशी काय बोलावे अन् काय नाही हे सूचत नव्हते. उत्सुकतेपोटी मी विचारले, ‘अपघातग्रस्त कार घरासमोर का लावली?’ यावर ते थोडे भावनिक झाले. गहिवरल्या शब्दांत म्हणाले, ‘या कारला अमरावतीजवळ झालेल्या अपघातात माझा मुलगा ठार झाला. कारकडे पाहिल्यानंतर मृत्यूची पदोपदी जाणीव होते.’
भटांनी घरकाम करणार्या बाईला आवाज देत ‘आज चिकन कर’ असे फर्मान सोडले. भट पक्के मांसाहारी होते. आमच्या गप्पा सुरूच होत्या. मी भटांना म्हणालो, ‘मला ती उष:काल होता होता.. कविता फार आवडते.’ भटांनी लगेच ‘उष:काल होता होता’ आणि ‘मेंदीच्या पानावर..’ या कविता ऐकवल्या. गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. साडेसात कधी वाजले हे समजलेही नाही. रात्री साडेआठ वाजता मला रात्रपाळीसाठी जायचे होते. त्यामुळे विजयला निघण्यासाठी खुणावले. तो भटांकडे पाहत म्हणाला, ‘दादा, पुन्हा येतो.’ ‘ये.. पुढच्या वेळी या पवारला नक्की घेऊन ये,’ असं म्हणत भटांनी निरोप दिला.
त्यानंतर पुन्हा रामदासपेठेत माझे जाणे झाले नाही. असेच एक दिवस दिवसपाळीचे काम आटोपून घरी परतलो. घरी आल्यानंतर रेडिओ ऐकण्याची मला सवय होती. जेवण झाल्यानंतर रेडिओ लावला. आठच्या बातम्या सुरू होत्या. सुरेश भट यांचे निधन झाल्याची बातमी ऐकली अन् माझ्यासमोर त्यांच्या भेटीचा तो दिवस पुन्हा तरळून गेला. या 14 मार्चला सुरेश भट यांना जाऊन 11 वर्षे पूर्ण झाली. त्यांची पुन्हा भेट घेण्याची माझी इच्छा अपूर्णच राहिली..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.