आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : वडिलांच्या पावलावर प्रणितींचे पाऊल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशविरोधी पक्ष म्हणून एमआयएमवर बंदी घातली पाहिजे, या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ उडाली. २००४ ते २०१२ अशी आठ ते नऊ वर्षे एमआयएमचा पाठिंबा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाला हवाहवासा वाटत होता. तोच पक्ष प्रणिती यांना सामाजिक ऐक्यात फूट पाडणारा व देशविरोधी कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांसारखा वाटू लागला. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील काँग्रेस नेतृत्वाने या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांना काय वाटते यापेक्षाही प्रणिती शिंदेंच्या आरोपांमध्ये विधानसभा निवडणुकीतील स्थानिक राजकारणातला राग व आगामी महापालिका निवडणुकांमधील संभाव्य तणाव अधिक दिसतो. वडिलांप्रमाणेच खळबळजनक वक्तव्य करण्याची आमदार प्रणिती शिंदे यांची ही पहिलीच वेळ. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संघ परिवारास व भाजपवर हिंदू आतंकवाद पसरवणारे जयपूर येथे जानेवारी २०१३ मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय बैठकीदरम्यान असा आरोप केला होता. त्याचबरोबर (सॅफरॉन टेररिझम) अशी पुस्ती जोडली होती.
एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन आेवेसी यांनी उत्तर देताना, काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली. २००४ ते २०१२ या कालावधीत एमआयएमने दिल्लीत काँग्रेसच्या आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. तर २०११ मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री काँग्रेसचे किरणकुमार यांच्यावर तेलुगू देसमने अविश्वास ठराव आणला असताना, हैदराबादेत कांँग्रेसची पाठराखण केली होती. त्या वेळेला एमआयएमवर कोणी देशविरोधी असल्याचा आरोप केला नाही. मग आजच का बोलले जाते, असा सवाल ओवेसींचा आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी ३३ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. एमआयएमचे तौफिक शेख यांच्या उमेदवारीमुळे प्रणिती यांचे विजयी मताधिक्य यंदा साडेनऊ हजारांवर आले. सुशीलकुमार शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रणिती यांना मिळालेला विजय हा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना थोडाबहुत दिलासा देणारा असला तरीही, नजीकच्या भविष्यातील स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने काळजीत टाकणारा निश्चितच आहे. सव्वादोन वर्षांनंतर सत्ताधारी काँग्रेसला सोलापूर महापालिका निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. एमआयएमला विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, जवळपास सहा प्रभागांमधून काँग्रेसपेक्षा जास्त मते एमआयएमची आहेत. साधारणत: १५ ते १६ जागांवर एमआयएम प्रभाव टाकू शकते, अशी आजची स्थिती आहे. प्रणिती व काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला भविष्यातील ही बोच आजच जाणवणे साहजिक आहे. आेवेसी यांनी आमदार प्रणितींवर आरोप मागे न घेतल्यास फौजदारी व बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर प्रणितींनी घूमजाव केले. माझे वक्तव्य कोणत्याही राजकीय पक्षासंदर्भात नाही, तर देशाच्या निधर्मी चेहऱ्याला धक्का लावणारी विधाने करणाऱ्या सर्वच पक्षांच्या विरोधात आहेत, अशी दुरुस्ती करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. या राजकीय आरोप-प्रत्यारोपातून फारसे काही निष्पन्न होणार नाही, पण महापालिका निवडणुकीच्या राजकारणातील संभाव्य खळबळ निश्चित प्रतिबिंबित होते आहे.