आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Prime Minister Modi's Independence Day Speech By Vikas Zade, Divya Marathi

दिल्ली वार्तापत्र: प्रधान सेवकावर विश्वास ठेवायलाच पाहिजे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधीजींचा खून नव्हे, तर ‘वध’ करण्यात आला, अशी टिप्पणी करणा-या राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून वाढलेले नरेंद्र मोदी यांनी संघाच्या सर्व सीमारेषा ओलांडून तब्बल 66 मिनिटे देशवासीयांना खिळवून ठेवत लाल किल्ल्यावरून केलेले भाषण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर दीर्घ भाषण केल्याची नोंद मोदींच्या नावे जमा होणार आहे. मोदींनी ओघवत्या वाणीत प्रत्येक मुद्द्याला स्पर्श केला. त्यांना काय करायचे आहे ते सांगितले. देशवासीयांकडून असलेल्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. त्याबाबत देशातील राजकीय विश्लेषकांनीही मोदींची तारीफ केली.
गांधीजींचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटणे ही बाब मोदी म्हणतात त्याप्रमाणे सर्वांच्या सहमतीनेच राष्‍ट्राला पुढे नेणारी ठरेल. लाल किल्ल्यावर राष्‍ट्रध्वज फडकावण्याआधी राजघाटावर गांधींजींच्या स्मृतीला अभिवादन करताना संघाच्या काही लोकांना पोटशूळ झाला असेल. नरेंद्र मोदी यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या मंत्राचा ऊहापोह केला आणि त्या मार्गावर चालण्याचे वचन दिले. भाषणातून जयप्रकाश नारायण ते स्वामी विवेकानंद आणि भगवान गौतम बुद्ध या सर्वांना स्पर्श करणारे मोदी यांना लाल किल्ल्यावरील भाषण ही राजनीती नाही तर राष्‍ट्रनीती वाटते. एक लक्ष्य, एक मन, एक दिशा, एक मती, एक गतीचे सरकार असण्यावर विश्वास ठेवणारे मोदी स्किल्ड इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाच्या माध्यमातून देशाचा विकास साधण्याचे स्वप्न पाहत आहेत. याबाबत त्यांचा विश्वास दांडगा आहे. त्यांनी 12 तास काम करा, मी 13 तास काम करेन, अशी विनंती केली असली तरी त्याची सुरुवात मोदी पंतप्रधान झाले त्याच्या दुस-याच दिवसापासून झाली आहे.
मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत आपापल्या कार्यालयात असतात. मंत्रिपद उपभोग्य वस्तू नाही हे आता प्रत्येकाला कळायला लागले आहे. परंतु हे मंत्री किंवा अधिकारी इतका वेळ काय करतात हे कळायला मार्ग नाही. त्यांना बोलण्यास बंदी आहे. जे काही बोलणार ते मोदीच! कारण ते प्रधान सेवक आहेत! ज्यांनी ज्यांनी आतापर्यंतची लाल किल्ल्यावरील भाषणे ऐकलीत त्यांनी मोदींच्या पहिल्याच भाषणाला वरचा क्रमांक दिला आहे. त्यांच्या बोलण्यातील प्रत्येक गोष्ट काही प्रमाणात होऊ शकली तरी देश विकासाकडे जात असल्याचे जाणवायला लागेल. येत्या 2 ऑक्टोबरपासून मोदी स्वच्छ भारत अभियान राबवत आहेत. मोदींनी आता देशातील जेवढ्या समस्या दिसून येताहेत त्या एक दिवसातील किंवा तीन महिन्यांतील नाहीत. 60 वर्षे कॉँग्रेसचे सरकार होते. त्यांच्या काळात त्या निर्माण झाल्या. या समस्यांना ते पाप समजतात.
कॉँग्रेसने केलेले पाप धुवायला मोदी निघाले आहेत, ते किती धुतले जाईल तो भाग नंतरचा; परंतु हा विषय डोक्यात येणे अन् त्याची सुरुवात होत असेल तर देशवासीयांनी केलेली निवड अचूक होती असे म्हणावे लागेल. आता मोदींना संधी आहे, परंतु जादूची कांडी फिरवल्यागत ते बोलत असतील तर ते बाताडे ठरतील.

या देशातील सव्वाशे कोटी लोक हे 24 कोटी 66 लाख 92 हजार 667 घरांमध्ये राहतात. त्यातील 16 कोटी घरे ही ग्रामीण भागात आहेत. उर्वरित शहरी भागात. यातील 13 कोटी 10 लाख घरांना शौचालये नाहीत. अशांसाठी देशभरात केवळ 80 हजार सार्वजनिक शौचालये बांधण्यात आलेली आहेत. तरीसुद्धा 49.8 टक्के घरातील लोकांना उघड्यावर शौचास जावे लागते. ही आकडेमोड केली आहे 2011 च्या जनगणनेने! तीन वर्षांनंतर त्यात विशेष बदल झालेला नाही. याचाच अर्थ देशातील 60 कोटी जनतेस आजही उघड्यावर शौचास जाण्याशिवाय पर्याय नाही. देशाचा 68 वा स्वातंत्र्य दिन साजरा करतानाची ही स्थिती आहे. पुरोगामी म्हणवणा-या महाराष्‍ट्रात खूप चांगले चित्र आहे असे म्हणता येत नाही. महाराष्‍ट्रात 2 कोटी 38 लाख 30 हजार 580 घरांपैकी जवळपास 82 लाख घरांमध्ये किंवा परिसरात शौचालये नसल्याने त्यांना प्रातर्विधी उघड्यावर आटोपावा लागतो.

नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती वर्षापर्यंत म्हणजेच 2019 पर्यंत संपूर्ण देश घाणमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना संपूर्ण देशातील घाण दिसायला लागली आणि त्याचे निर्मूलन व्हावे याची आंतरिक तळमळ त्यांच्या शब्दातून त्यांनी व्यक्त केली, ही बाबच प्रत्येकाला अभिमानास्पद वाटणारी आहे. शौचालयांसाठी विशेषत: शाळा-महाविद्यालयांतील इमारतीमध्ये स्वच्छतागृह बांधण्याकरिता सीएसआर आणि खासदार निधीचा वापर करण्याची उत्स्फूर्तपणे केलेली घोषणा ही देशात उघड्यावर शौचास जाणा-या प्रत्येकास सुखद वाटणारी आहे. आतापर्यंत झाला तो भ्रष्टाचार आणि यापुढे होईल तो विकास असे क्षणभर गृहीत धरले तरी त्यांची स्वच्छता मोहीम ही ‘बकवास’ तर ठरणार नाही ना? अशी शंका येते. ती याचसाठी की गुजरात विकासाचे पोवाडे गाणारे मोदी हे तब्बल 14 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री नव्हे ‘मुख्य सेवक’ होते. म्हणजेच प्रत्येक दहा वर्षांनंतर जी जनगणना होते त्यातील 2001 ते 2011 हा संपूर्ण काळ मोदींना मिळाला. त्यांनी गांभीर्याने लाल किल्ल्यावरून शौचालयाचा विषय विशद केला.
शौचालये नसल्याने देशातील महिलांना अंधारात उघड्यावर शौचास जावे लागते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याकडे लक्ष वेधले. आज गांधीजींच्या तत्त्वावर चालणारे संघाचे कार्यकर्ते असलेले नरेंद्र मोदी हे 14 वर्षांत गुजरातमधील प्रत्येकासाठी शौचालयांची व्यवस्था करू शकले नाहीत. 2011 च्या जनगणनेनुसार गुजरातच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ती धक्कादायक आहे. मग सहज वाटून जाते की लाल किल्ल्यावरून ताला-सुरात बोललेले मोदी हे ओघात ‘बेताल’ तर बोलून गेले नाहीत? गुजरातमधील सहा कोटींच्या वर लोकांसाठी 1 कोटी 21 लाख 82 हजार घरे आहेत. त्यातील 40 टक्क््यांवर घरातील लोकांसाठी शौचालयांची सुविधा अद्यापही होऊ शकली नाही. आजही गुजरातमधील 2 कोटी 55 लाख लोक उघड्यावर शौचास जातात, हे सत्य दडवून चालणार नाही. गुजरातमध्ये इतकी वर्षे एकाधिकार असताना मोदींना स्वच्छतेची आणि घर तिथे संडास ही यशस्वी मोहीम राबवता आली नाही.
जे 14 वर्षांत अडीच कोटी लोकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून थांबवू शकले नाहीत त्यांनी देशातील 60 कोटी जनतेला शौचालये उपलब्ध करून देणे हे मोदींचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. गुजरातमध्ये आजही 16 लाख घरांमधील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. म्हणजे ते 78 लाख लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नव्हते. गुजरातमध्ये 1 लाख 22 हजार घरांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही. सहा लाखांच्या वर लोक आजही अंधारात आहेत. याच राज्यातील 2 कोटी 53 लाखांवर लोकांना स्नानगृहे उपलब्ध नाहीत. 13 लाख 40 हजार घरांच्या आवारात स्नानगृहे आहेत, परंतु त्याला छत नाही. हे गुजरातचे वास्तव आहे.