आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Dalit PhD Scholar Rohit Vemula In Divya Marathi.

समाजाला अंतर्मुख करणारी एका आत्म्याची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद विद्यापीठात पीएचडी करत असलेल्या रोहित वेमुला या २६ वर्षे वयाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या सर्वांनाच गंभीर विचार करण्यास भाग पाडणारी आहे. विचारसरणीचे मतभेद हे सर्वत्रच आहेत आणि विद्यापीठात ते राहणारच, पण त्याची विभागणी जर अशी जात आणि धर्माच्या आधारे होत राहिली तर भारतीय समाज कधी जोडला जाणार, असा अस्वस्थ करणारा प्रश्न पडतो. खरे म्हणजे रोहितच्या आत्महत्येने असे अनेक प्रश्न समाजासमोर पुन्हा आणून ठेवले आहेत. पहिला प्रश्न म्हणजे अशा घटनांकडे जातीय विभागणी म्हणून पाहायचे काय, या प्रश्नाचे उत्तर समाजाला द्यावे लागणार आहे. दुसरे म्हणजे जेथे शिक्षण दिले जाते, अशा परिसरात जी थेट राजकीय विभागणी झाली आहे, त्याचे काय करायचे? त्या आधारे होणाऱ्या नेमणुका आणि निर्णयांमुळे जी शैक्षणिक हानी होते आहे, ती आपण कशी भरून काढणार आहोत? तिसरा प्रश्न आहे, राजकीय हस्तक्षेपाचा. राजकीय संघटना आल्या की राजकीय हस्तक्षेपही आलाच. तो मान्य करायचा का? आणि चौथा प्रश्न आहे तो भावनिक उद्रेकाचा. अशा घटनांमधून देशभर जो भावनिक उद्रेक निर्माण होऊन देशाचे नुकसान होते, त्याचे काय करायचे? त्या विद्यापीठातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे अभाविपच्या तक्रारीवरून खासदार आणि केंद्रातील कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी केंद्रीय मनुष्यबळमंत्र्यांना पत्र लिहिले आणि त्यावरून रोहितसह पाच विद्यार्थ्यांना वसतिगृहातून निलंबित करण्यात आले होते. आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे हे पाच विद्यार्थी सदस्य होते. त्यांनी अभाविपच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली, असा आरोप आहे. तर अशी मारहाण आम्ही केलेली नाही, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ सत्य काही वेगळे आहे. मारहाण झाली असेल तर त्यावर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई का झाली नाही आणि हे प्रकरण खासदार आणि पुढे केंद्रीय मनुष्यबळ खात्याकडे का गेले आणि तेथे गेल्यावर विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याइतके महत्त्व त्याला का आले, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.
रोहितच्या आत्महत्या प्रकरणात बंडारू दत्तात्रेय, विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव पोडिले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता सुशील कुमार व त्याच्या भाऊ कृष्णा चैतन्य यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कायद्यानुसार तपास होऊन आरोपींना शिक्षा होईल; पण आपल्या देशात इतक्या सरळ पद्धतीने काही होत नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी रोहितचे कुटुंबीय आणि विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. रोहितने आत्महत्या केली असली तरी ती करण्यास जी माणसे कारणीभूत ठरली आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले. आता येथे आणखी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, ते म्हणजे रोहितच्या आत्महत्येला याच घटना जबाबदार ठरल्या काय? हा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे कारण रोहितने जे पत्र लिहून ठेवले आहे, त्यातून त्याचे कविमन व्यक्त झाले आहे आणि इतका संवेदनशील असलेला हा तरुण वेगळ्याच मानसिकतेतून जात होता, असेही जाणवते. ‘जीवनातील खरेपणा कृत्रिमतेने ठासून भरलेला असल्याने हृदयाच्या खोलवर जाऊन प्रेम करणे अवघड झाले आहे’ किंवा ‘विज्ञान, तारे, निसर्गावर माझे अतिशय प्रेम आहे; पण आता माझे निसर्गाशी फारकत घेतलेल्या माणसांवर प्रेम जडले,’ अशा भावना व्यक्त करणारे तरुण मन किती संवेदनशील असेल, याची आजूबाजूचे व्यवहारी जग कल्पना करू शकणार नाही. त्यामुळेच त्याने आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये आणि आपल्याला शांततेने निरोप मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. कदाचित आजूबाजूच्या याच बजबजपुरीने त्याचे मन विटले असावे. व्यवस्थेतून मन घडते की चांगली किंवा वाईट व्यवस्था चांगले किंवा वाईट मन घडवते, या प्रश्नाच्या उत्तराबाबत अजून समाजात एकमत होत नाही. त्यामुळेच मनाच्या घडणीसाठी काम करणारे जेवढे आहेत तेवढेच आज व्यवस्थेच्या दुरुस्तीच्या बाजूनेही उभे आहेत. त्यामुळेच असेल कदाचित, पण रोहितने व्यवस्था आणि मनाच्या वादात न पडता आपणच कोठे तरी कमी पडलो आहोत, अशी भूमिका स्वीकारलेली दिसते. आता प्रश्न असा पडतो की ज्या व्यवस्थेत त्याला जगावे लागले, तिला दोष द्यायचा की नाही? जसे की व्यवस्था चांगली नाही म्हणून देशातील हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांनी आत्महत्या करावी, अशी वेळ समाजाने म्हणजे समाजातील काही माणसांनीच आणली आहे; पण त्यांना शिक्षा होण्यास मर्यादा आहेत.आत्मा आणि शरीरातील वाढत्या संघर्षाचा उल्लेख या पत्रात रोहितने केला असून आपण आत्म्यापासून दूर जात आहोत, अशी खंत व्यक्त केली आहे. रोहित, तू आत्महत्या का केलीस, हे आता कदाचित कधीच कळणार नाही, पण मानवी आत्म्याचा प्रवास राक्षसी शरीराकडे होतो आहे, याची तुझे ते पत्र आम्हाला कायम आठवण करून देत राहील.