आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतार्थ जीवनाचे तपस्वी व्यक्तिमत्त्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहार, केरळचे राज्यपाल, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती, संसद सदस्य अशी मोठी पदे सांभाळणाऱ्या रा. सू. गवई यांचे शनिवारी निधन झाले. रविवारी दारापूर येथे मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न...

‘बेजुबानी जवाब होके रही,
हर नजर दास्तां होके रही,
िजसपे हमने कभी कदम रखा
वो जमीं आसमां होके रही’

असे एका उर्दू शायराने म्हटले आहे. ते दादासाहेबांना सार्थपणे लागू पडते. दादासाहेबांचे व्यक्तिमत्त्व संघर्षातून घडले हाेते. राजकीय नेत्यांनी त्यांना मोठेपण नजराणा म्हणून िदले नाही. त्यांचं कर्तृत्वच मुळी तेवढं विशाल होतं म्हणून पदेच त्यांच्या पायाशी आली. िबहार आणि केरळचे ते राज्यपाल झाले. राज्याच्या विधान परिषदेचे प्रदीर्घ काळ उपसभापती राहिले. जागतिक बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष झाले. राज्यघटनेला हात लावू देणार नाही, अशी गर्जना देत त्यांनी संसदही गाजवली.
अशा नानाविध जबाबदाऱ्या अमरावतीच्या या भूमिपुत्राने लीलया सांभाळल्या, परंतु कधीही त्यांना गर्व शिवला नाही. साधारण कार्यकर्त्यांपासून ते उच्चपदस्थ अधिकारी-लोकप्रतिनिधींपर्यंतची त्यांची माया एकसमान होती. त्यामुळेच अमरावती येथील निवासस्थान ‘कमलपुष्प’वर चाहत्यांचा नेहमी गराडा दिसून यायचा. काँग्रेसनगरातील त्यांचा हा बंगला मात्र विशालहृदयी व्यक्तित्वाला कायमचा मुकला, याची खंत बोचत राहील.

प्रारंभीच्या काळात दादासाहेबांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. खेडेवजा गावातील त्यांचे बालपण आणि पुढे शिक्षण व ज्ञानसंपादनासाठी त्यांना करावी लागलेली धडपड याबाबतची कथा ऐकली की अगदी थक्क व्हायला होते. त्यांचे वडील सूर्यभानजी निरक्षर असले तरी सुसंस्कृत व दानशूर होते. बरीच वर्षे ते ग्रामपंचायत सदस्य होते. गावच्या स्कूल कमिटीचेही ते सदस्य होते. दादासाहेबांच्या आई सरूबाईही पुढारलेल्या विचारसरणीच्याच. तीन मुली आणि तीन मुलगे असा सहा अपत्यांचा सांभाळ करीत त्या परोपकार करायच्या. चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी दादासाहेबांना जवळच्या खोलापूरला जावे लागले. प्राथमिक शिक्षण घेताना शिक्षकांचे प्रेम त्यांना लाभले. हुशार मुलगा म्हणून प्रत्येक शिक्षक त्यांचा गौरव करायचे. शिवाय भविष्यात हा मुलगा मोठा होईल, असं त्याचं भाकीतही असायचं. दादासाहेबांनी गाठलेली शिखरं आठवली तरी बालपणी त्यांच्या शिक्षकांनी वर्तवलेलं भाकीत किती अचूक होतं, याची खात्री पटते. महाविद्यालयीन शिक्षण घेताना मात्र त्यांना जरा कटू अनुभवांचा सामना करावा लागला. एका प्राध्यापकाच्या पीरियडला पोहोचायला दादासाहेबांना उशीर व्हायचा. त्याचा राग म्हणून त्या प्राध्यापकाने वर्ग सुरू असतानाच दादासाहेबांना जात विचारली. दादासाहेबांनी अत्यंत मोठं मन करून वेळ मारून नेली. खोटं बोलले, पण कसलाही प्रतिकार केला नाही. एकदा जेव्हा ते खोटं व्यक्त करण्याची वेळ आली तेव्हा दादासाहेब म्हणाले, सर, इतिहासाच्या पीरियडमध्ये जातीचा काही प्रश्नच नव्हता. आपण इतिहासाचं विचारलं असतं तर मी खोटं बोललो नसतो.

कालांतराने ते प्राध्यापक निवृत्त झाले. तोपर्यंत दादासाहेब आमदार झाले होते. त्यांनी शिक्षण संस्थाही काढली होती. एकदा ते प्राध्यापक महोदय आले. निवृत्तीनंतरचं हलाखीचं जिणं कसं असह्य झालं ते सांगू लागले. दादासाहेबांनी त्यांना आपल्या संस्थेत प्राचार्य म्हणून सामावून घेण्याचा आदेश दिला. मनाचा मोठेपणा किती असू शकतो, हे या उदाहरणावरून लक्षात येतं. दे. झा. वाकपांजर, रामेश्वर अभ्यंकर, बळवंत वानखडे ही अशी मंडळी आहेत, ज्यांच्यासाठी ते परिसासारखे ठरले. वाकपांजर पराभूत झाले तरीही वलगाव विधानसभा मतदारसंघाची त्यांची उमेदवारी मात्र दादासाहेबांनी कधीही बदलली नाही. मध्यंतरीच्या काळात चरणदास इंगोले यांचाही अनुभव याहून वेगळा नाही. अशा या हरहुन्नरी व बहुआयामी व्यक्तित्वाच्या िनघून जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तथागत या संकटातून सावरण्याची शक्ती देतील. यशवंतराव खापर्डे यांच्या लेखातील ओळी मला आठवतात...दादासाहेबांबाबत ते म्हणतात, अपना जमाना आप बनाते हैं अहले दिल, हम वो नहीं कि जिनको जमाना बना गया|
भूषण बनसोड, नगरसेवक तथा रिपाइं नेते, अमरावती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, दा.सू. गवई यांचा जीवन परिचय