आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट, शालेय नाटकापासून चित्रपटाकडे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर येथे २००३ मध्ये झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात सदाशिव अमरापूर यांचे महत्त्वाचे योगदान होते. या संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या 'तिसरी घंटा' या स्मरणिकेनिमित्त अमरापूरकर यांच्याशी त्या वेळी दिलखुलास गप्पा मारल्या. शालेय जीवनातील नाटकांपासून मुंबईपर्यंतचा रूपेरी प्रवास त्यांनी कथन केला.
मी नगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये शिकलो. त्याकाळी या शाळेची स्नेहसंमेलनं धूमधडाक्यात व्हायची. नगरकर म्हणून हेडमास्तर होते. त्यांना स्वत:ला क्रिकेट, नाटक आणि संगीताचं वेड. स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं शाळेच्या मदतीसाठी तेव्हा नाटकं बसवली जात. अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, अक्षांश-रेखांश, कवडी चुंबक अशी अनेक नाटकं शाळेच्या संमेलनात पाहिल्याचं मला आठवतं. तेव्हा खरं तर माझा ओढा नाटकाकडे नव्हताच. मी क्रिकेट खेळायचो. शाळेच्या क्रिकेट टीममध्ये होतो. निंबाळकर सर आम्हाला शिकवायचे. मी चांगला बॅट्समन आणि लेग स्पिनर होतो. अगदी कुचबिहारपर्यंत आम्ही मजल मारली होती.

पुढे नगर कॉलेजमध्ये गेलो. तिथेही नाटकाचं वातावरण होतं. प्रा. मधुकर तोरडमल नाटकं बसवत. स्वत: लिहित, स्पर्धेमध्ये भाग घेत. सैनिक नावाचा माणूस, काळं बेट लालबत्ती ही नाटकं तेव्हा गाजत होती. त्याकाळी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या, त्यांनीच काम केलेल्या आणि बसवलेल्या एकांकिकांच्या स्पर्धा होत. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक ग्रुप्स तयार झाले होते. कुमार कोटस्थानेचा ग्रुप "एक रात्र अमावास्येची' हे नाटक बसवत होता. त्यात मला छोटं काम मिळालं. मोठी भूमिका कोटस्थानेंचा धाकटा भाऊ करत होता. ऐनवेळी तो ते काम करू शकला नाही आणि ती भूमिका माझ्या वाट्याला आली. प्री-डिग्रीत असताना केलेल्या या नाटकातील भूमिकेसाठी मला दहा रुपयांचं उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं आणि तेव्हापासून क्रिकेटची बॅट बाजूला पडली. नाटक सुरू झालं ते आजतागायत. कॉलेजची पाच वर्षे आणि नंतरची ८-१० अशी जवळजवळ १५ वर्षे मी नगरमध्ये नाटकं केली. सुमारे २२ नाटकं आणि १५० हून अधिक एकांकिका केल्या. नंतर मी व्यावसायिक नाटकांकडे वळलो.

'अर्धसत्य'ने मिळाली कलाटणी
१९८२ मध्ये दुर्दैवाने म्हणा वा कशाने मला 'अर्धसत्य' चित्रपट मिळाला आणि नाटक मागे पडलं. तेव्हा मी विजय तेंडुलकरांच्या "कन्यादान' नाटकाची रिहर्सल करत होतो. चित्रपटात गेलो तरी नाटक काही सुटलं नाही. ८७ पर्यंत नाटक करत होतो. खोट्या ग्लॅमरचं आकर्षण मला कधीच चिकटलं नाही. आणि अशा वयात मी चित्रपटात गेलो की, त्यावेळी ग्लॅमरला मोठं मानण्याचंही काही कारण नव्हतं. तेंडुलकर, गोविंद निहलाणी, श्याम बेनेगलसारखी मंडळी सुरुवातीच्याच काळात मला भेटली. आज तर डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोळकर, बाबा आढावांसारखे मित्र माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे नाट्य-चित्रसृष्टीतील मोहमयी दुनियेतही वास्तवाचा, सामाजिक बांधिलकीचा विसर मला पडला नाही.
'अर्धसत्य' यशस्वी झाला आणि मला हिंदी चित्रपटसृष्टीतून एकदम मागणी आली. ८० चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. बी. आर. चोप्रा, यश चोप्रांपासून सगळ्यांना मी हवा होतो. मी पुन्हा तेंडुलकरांचा सल्ला घेतला. ते म्हणाले, "काही दिवस व्यावसायिक चित्रपटांचा अनुभव घेऊन बघ. मग ठरव...'
शब्दांकन : भूषण देशमुख