आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक वाटायचं, नाटकातला हा माणूस एवढं वाचतो कधी..! (विशेष लेख - अनिल अवचट)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तो भेटला तो धाकट्या भावाचा - सुभाषचा मित्र म्हणून. सुभाष त्या वेळी माझ्या शेजारी राहायचा. त्या वेळी त्याच्या घरात फोन नव्हता आणि आमच्याकडे होता. म्हणून त्याच्याकडे आलेली मित्रमंडळी फोन करायला आमच्याकडे येऊन बसत. मग आमच्याशी ओळखी, गप्पा व्हायच्या. तसा सदाशिव आला. त्याचं वाचन चांगलं, त्याने माझी तोवरची पुस्तकं वाचलेली. त्यावर मनापासून बोलायचा. मला आश्चर्य आणि कौतुक वाटायचं. हा नाटकातला माणूस. एवढं वाचतो कधी आणि कसं? त्या वेळी माझी ‘वाघ्या-मुरळी’ विषयाची पाहणी चाललेली. त्यातल्या काही हकिगती मी सांगत होतो. तेव्हा तो आयएनटीची नाटकं करायचा. मला सारखा आग्रह करायचा, “मला तू याच विषयावर एक नाटक लिहून दे रे.”
मी म्हणायचो, “अरे, नाटक माझा प्रांत नाही.”
“लिही, म्हणजे येईल. मी करतो मदत.”
पण तशा स्वरूपात सुचलं तर पाहिजे ना! माझ्यावर दडपण आणण्यासाठी त्याच्या आयएनटीमध्ये त्यानं जाहीर केलं की, अनिल माझ्यासाठी नाटक लिहितोय, ते आपण करायचं. मला त्यांच्यापैकी कुणी भेटलं की विचारायचं, “कुठपर्यंत आलंय आपलं नाटक?” कोणी म्हणायचे, “काही प्रवेश झाले असले तर द्या. आम्ही बसवायला लागतो.” बापरे! या सगळ्याची सवयच नव्हती. ‘नाही’ म्हणत राहिलो आणि सुटका करून घेतली.
सदाशिव आणि मी जास्त जवळ आलो ते ‘लग्नाची बेडी’ या नाटकाच्या दौ-यात. कार्यकर्त्यांना मानधन देता यावं म्हणून सामाजिक कृतज्ञता निधीने (सा.कृ.नि.) पैसे उभे करण्यासाठी हे नाटक आयोजित केलं होतं. दौरा महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांत. कलावंतांना हॉटेलमध्ये स्वतंत्र खोली; पण सदाशिवने सांगितलं, “अनिल आणि मी एका खोलीत राहू.” त्याने संस्थेचा खर्च वाचवला आणि मैत्रीचा मान राखला. पण वडिलांचा नाटकाला सक्त विरोध. एकदा तर त्याने तालमीला जाऊ नये म्हणून वडिलांनी त्याला खोलीत कोंडून ठेवलं होतं. तरी त्याने तो नाद सोडला नाही. सुभाषचं ‘धुरकट’ नाटक त्यानं केलं होतं. त्याला राज्य पुरस्कारही मिळाला. मग व्यावसायिक रंगभूमी. स्मिता पाटीलबरोबर ‘छिन्न’ केलं. तेंडुलकरांच्या ‘कन्यादान’मध्ये प्रमुख भूमिका त्यानं केली. पुढे तेंडुलकरांच्या सूचनेवरून गोविंद निहलानीने त्याला ‘अर्धसत्य’ सिनेमात रामा शेट्टीची भूमिका दिली आणि जीवनात हिंदी सिनेमा सुरू झाला. तो खास ‘नगरी’ आहे. लोकांत जाणं, गप्पा मारणं हा त्याचा स्वभाव. त्यामुळे माणसं आपलीशी होतात. पुण्यात माझ्याबरोबर फिरायला जाणं त्याला फार आवडतं. म्हणतो, “तुझी माणसं छान आहेत रे.” माझा औषधवाला, बेकरीवाला, एवढंच काय सलूनवालाही आता त्याचा झाला आहे. मी गेल्यावर विचारतात..

मुक्तांगणला इमारत बांधताना, त्याचा अडचणीचा काळ असूनही एक लाख रुपये त्यानं दिले. मेधा पाटकरांच्या आंदोलनाला पाठिंबा. नर्मदा परिसरात गेला. परत येऊन मला घेऊन मंत्रालयात जाऊन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना भेटला. धरणग्रस्तांचे हाल इतक्या पोटतिडकीने सांगितले की माहोलच बदलला तिथला. कार्यकर्त्याला आजारपणात, अडचणीच्यावेळी गुपचूप मदत पाठवणार. काय रसायन आहे हे!
(सौजन्य - अक्षर दिवाळी अंक २०१२)