आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Sadashiv Amrapurkar By Govind Nihlani

खलनायकामधला अस्सल ‘नायक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अर्धसत्य’ या चित्रपटातून रामा शेट्टी या खलनायकाची भूमिका यशस्वीपणे साकारत खलनायकाची चौकटीबद्ध प्रतिमा पदार्पणातच मोडणा-या सदाशिव अमरापूरकर यांच्याविषयीच्या आठवणींना ‘अर्धसत्य’चे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी दिलेला उजाळा...

‘अर्धसत्य’चे कास्टिंग सुरू होते. ओम पुरी, नसिरुद्दीन शहा, स्मिता पाटील आदी कलाकारांची नावे जवळपास निश्चित झाली होती. चित्रपटातील रामा शेट्टी हे खलनायकाचे पात्र माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. त्यासाठी मला नेहमीचे चेहरे नको होते. या खलनायकाचा चित्रपटातला चेहराही बॉलीवूडच्या इतर चित्रपटांमधील खलनायकाप्रमाणे नव्हता. मला नवा चेहरा हवा होता. विजय तेंडुलकरांकडे माझ्या या शोधाचे उत्तर होते. त्यांनी अत्यंत शांतपणे मला ‘सदाशिव अमरापूरकर’ हे नाव सुचवले. ‘सदाशिव उत्तम काम करतो. तो तू दिलेल्या संधीचे सोने करील’ तेंडुलकरांनी विश्वासाने सांगितले. त्या वेळी अमरापूरकर थिएटर करायचे. तेंडुलकर मला अमरापूरकर काम करीत असलेले एक नाटक पाहायला घेऊन गेले.
नाटकाचे नाव होते ‘हॅंड्स अप’. नाटक विनोदी धाटणीचे. अमरापूरकरांची भूमिकाही विनोदी. सुरुवातीला, हे नाटक पाहताना मी साशंक होतो, की माझ्या चित्रपटातील रामा शेट्टीची गंभीर भूमिका हा विनोदी भूमिका साकारणारा अमरापूरकर कसा करू शकेल ? पण मग विनोदी भूमिका हा अभिनेता इतक्या उत्तम निभावतो तर तो खलनायकही साकारू शकेल असा विश्वास मला तेंडुलकरांनी दिला आणि मी सदाशिवची निवड रामा शेट्टीसाठी केली. माझी निवड सार्थ ठरली. रामा शेट्टीने बॉलीवूडमध्ये नवा इतिहास रचला. नवी प्रतिमा निर्माण केली. खलनायकाची तथाकथित संकल्पना सदाशिवने मोडीत काढली. ‘अर्धसत्य’ या पहिल्या चित्रपटात खलनायक म्हणून स्वत:ला चित्रपटक्षेत्रात पर्दापणातच रूढ करताना सदाशिवने तमा बाळगली नाही. सेटवर अत्यंत सौहार्दपणे वागणा-या, सतत सहकार्य करणा-या व सामाजिक संवेदनशीलता बाळगणारा वास्तव जीवनातील नायकच होता.
शब्दांकन : प्रियंका डहाळे