आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Sadashiv Amrapurkar By Meena Deshpande

बंड्या एवढा मोठा होईल, वाटले नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझी मोठी बहीण लता पत्की हिचे लग्न अहमदनगरला होते. मंगल कार्यालयामध्ये आचारी बुंदीचे लाडू करणार होते. तेव्हा त्यांच्याजवळ कुणीतरी थांबावे म्हणून आईने आम्हाला थांबायला सांगितले. आम्ही विचार केला, कार्यालयात तालीम करू आणि लक्षही ठेवू. आचा-याने बुंदी काढली आणि लाडू वळायची वेळ आली तर म्हणे सकाळी वळू. पण नंतर लाडू जुळले नसते म्हणून रात्रीच्या दोन वाजता आम्ही सर्व कलावंत लाडू वळत बसलो. त्याच्या आईला जेव्हा हे कळले तेव्हा त्या रागावल्या होत्या. पण बंड्याला म्हणजे सदाशिवला सर्वांच्या मदतीला धावून जायची सवयच होती. त्यामुळे तो सर्वांचा लाडका होता. अशी आठवण सदाशिव अमरापूरकर यांच्यासोबत महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या मीना देशपांडे (गुजराथी विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका, एन-१ सिडकोतील रहिवासी) यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितली. त्या म्हणाल्या, सदाशिव माझ्या कॉलेजमध्ये होता.
अतिशय चांगला, विनोदी आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना जिगरबाजपणे करणारा आमचा मित्र बंड्या अहमदनगरसारख्या गावातून पुढे जाऊन सिनेक्षेत्रात दबदबा निर्माण करेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. अमरापूरकरांसोबत नाटकात काम करण्यासोबतच घरगुती कार्यक्रमांतील अनेक प्रसंग त्यांच्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले, त्यांनी सांगितले की, एकदा नागपूरला कथाकथन स्पर्धेला त्याला जायचे होते. तेव्हा कथेचे सादरीकरण कसे करणार आहे हे स्पर्धेआधी त्याने मला माझ्या घरी करून दाखवले. आशीर्वाद घेतला. कारण, मी त्याच्यापेक्षा वयाने मोठी होते. ‘काका किशाचा’ या नाटकात आम्ही सोबत काम केले होते. कॉलेज, घरकाम सर्व आवरून आम्ही रात्री जमायचो, नाटकाची तालीम करायचो. १९६९ ला आम्ही नाटकाच्या सादरीकरणासाठी औरंगाबादेत आलो होतो. स.भु.त हे नाटक झाले होते.
शब्दांकन : रोशनी शिंपी