आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांनी संपूर्ण जगाला उत्तम कॉफी पिण्याची कला शिकवली...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को युनिव्हर्सिटीचे तीन विद्यार्थी जॅरी बाल्डविन, जेव सिगल व गॉर्डन बॉकर यांनी ३० मार्च १९७१ रोजी सिएटलमध्ये पहिल्या ‘स्टारबक्स’ कॅफेचा शुभारंभ केला. तिघेही कॉफीच्या बिया विकत असत. त्यांचा व्यवसाय वाढत होता व ते संतुष्ट होते.

याच काळात त्यांची भेट होवार्ड शुल्ट‌्झ यांच्याशी झाली. ते त्या वेळी कॉफी बनवणा-या एका कंपनीत सेल्समन होते. शुल्ट‌्झ पहिल्यांदा १९८१मध्ये कॅफेत दाखल झाले व तेव्हापासून स्टारबक्सचे चित्रच पालटू लागले. ‘जगातील सर्वात मोठी कॉफी हाऊस कंपनी’ ही सध्याची स्टारबक्सची ओळख शुल्ट‌्झ यांचीच करामत आहे. पहिल्या भेटीनंतर १९८२मध्ये बाल्डविन, सिगल अन‌् बॉकर यांनी शुल्ट‌्झ यांना आपल्या कंपनीत ‘डायरेक्टर ऑफ रिटेल ऑपरेशन्स’ म्हणून नियुक्त केले. १९८३मध्ये मिलान येथे मोठ्या संख्येने कॉफी बार बघून ते परतले व हीच पद्धत स्टारबक्समध्ये सुरू करण्याचा विचार केला. कंपनीचे मालक मात्र राजी नव्हते; पण शुल्ट‌्झ ‘स्टारबक्स’ला कॉफी कल्चरमध्ये नेण्याची योजना बनवून तयार होते. मोठ्या मुश्किलीने त्यांना सिएटलच्या कॉफी बार सुरू करण्याची परवानगी मिळाली. हा बार एवढा प्रसिद्ध झाला की, लवकरच संपूर्ण सिएटलमध्ये कॉफी हाऊस कल्चर प्रचलित झाले. तरीही कंपनीचे मालक विस्तार करण्यास उत्सुक नसल्याने शुल्ट‌्झ यांनी १९८५मध्ये ‘स्टारबक्स’ सोडले अन‌् वेगळी कॉफी बार चेन कंपनी सुरू केली. ती कंपनीही चांगलीच यशस्वी झाली. मात्र, त्यांचे मन स्टारबक्समध्येच अडकलेले होते. त्यामुळे त्यांनी १९८७मध्ये ती कंपनी खरेदी केली.
मात्र, तरीही अडचणी कमी झाल्या नाहीत. तोपर्यंत अमेरिकननांना उत्तम कॉफीबद्दल माहिती नव्हती. गुंतवणूकदारांना जेमतेम राजी करून त्यांनी त्याच वर्षी सिएटलबाहेर पहिले स्टाेअर सुरू केले. १९९६मध्ये जपान, १९९८मध्ये यूके व २००३मध्ये द.अमेरिकेत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. आज ६३पेक्षा अधिक देशांमध्ये ‘स्टारबक्स’चे स्टोअर्स आहेत.