आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्याच्या दुकानी बसून बनवली पहिली वेबसाइट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुहास गोपीनाथ, उद्यमशील
जन्म: ४ नोव्हेंबर १९८६
शिक्षण: अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू
वडील: एम.आर. गोपीनाथ (संरक्षण शास्त्रज्ञ), आई : कला गोपीनाथ (गृहिणी), भाऊ : श्रेयस
चर्चेत- नुकतीच त्यांची कंपनी ग्लोबल्स इन्का. अलिबाबाच्या जॅक मासोबत स्टार्टअपसाठी एकत्र आली आहे.
तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये देशभरातील सर्व सीईओंना बोलावले होते. कार्यक्रमस्थळी एक कार थांबली आणि त्यातून एक मुलगा उतरला. गेटवर सुरक्षा रक्षकांनी अडवले आणि म्हटले, ‘तुम्ही अजून लहान आहात, मोठ्यांच्या कार्यक्रमात कुठे जाता?’ त्या मुलाने मोबाइल काढला आणि संयाेजकांना फोन केला. ते धावत-पळत गेटवर आले आणि या मुलाला सन्मानाने आतमध्ये घेतले. हा मुलगा दुसरा काेणी नव्हे, तर १७ वर्षांचा सुहास गोपीनाथ होता.
बंगळुरूची आयटी सोल्युशन्स कंपनी ग्लोबल्स इंकचे सीईओ आणि प्रेसिडेंट. सुहास यांना कार्यक्रमात वक्ता म्हणून बोलावण्यात आले होते. जगातील सर्वात कमी वयाच्या या सीईओची कहाणी मध्यमवर्ग आणि सामान्य मुलांसारखीच आहे. सुहास बंगळुरूच्या एअरफोर्स स्कूलमध्ये शिकत होते. लहानपणी प्राणिशास्त्राची आवड होती. त्या वेळी घरी संगणक नव्हता तसेच तो घेण्याची ऐपतही नव्हती. घराजवळील इंटरनेट कॅफेत ते जाऊ लागले. महिन्याचा १५ रुपये पॉकेटमनी कमी पडू लागला. दुकान १ ते ४ बंद राहत होते. त्यांनी या वेळात दुकान चालवण्याची तयारी दर्शवली त्याबदल्यात दुकानदाराकडे फ्री नेट सर्फची अट घातली. अट मान्य झाल्यावर तिथेच या आंत्रप्रिन्योरने पहिली वेबसाइट तयार केली.
फ्रीलान्स मार्केट प्लेसवर वेबसाइट बिल्डरच्या रूपात नोंद झाल्यानंतर पैसे न घेता न्यूयॉर्कच्या एका कंपनीची वेबसाइट तयार केली. त्या वेळचे वय होते १३ आणि कमाई १०० डॉलर. पैसे जमा करण्यासाठी बँक अकाउंट नव्हते. वडिलांना सांगितल्यावर ते नाराज झाले. विरोध केला, मात्र भावाने प्रोत्साहन दिले. भाऊ अभियांत्रिकी करत होता. त्या वेळी सुहास नववीत होता. वडिलांनी भावासाठी संगणक आणला. काही दिवसांनंतर सुहासनेही स्वकमाईतून संगणक घेतला. १४ व्या वर्षी अमेरिकी कंपनी नेटवर्क सोल्युशन्सने पार्टटाइम जॉबची ऑफर दिली. ते सुहास यांच्या शिक्षणाचा खर्चही करू इच्छित होते. यादरम्यान बिल गेट्स यांच्याविषयी वाचल्यानंतर नोकरीपेक्षा कंपनी सुरू करणे आणखी आनंददायी असल्याचे वाटले आणि ग्लोबल इंक कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. भारतात १८ पेक्षा कमी वयात कंपनी नोंदणी करता येत नसल्यामुळे त्याची अमेरिकेत नोंदणी करण्यात आली. अमेरिकेत कंपनी स्थापनेसाठी १५ मिनिटे लागली. सुहासचा अमेरिकेत शिक्षण घेणारा मित्र बोर्ड मेंबर झाला.

मात्र, दहावी प्री बोर्डात सुहास गणित नापास झाला. शाळेत आईला बोलावले. त्यानंतर आईने अभ्यासाशिवाय काही न करण्याचे बजावले. चार महिन्यांच्या अभ्यासात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. १७ व्या वयापर्यंत घरात कंपनीविषयी कोणाला सांगितले नाही. बारावी पूर्ण करून बंगळुरूच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पाचव्या सेमिस्टरमध्ये जागतिक बँकेने बोर्ड मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले.