आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशप्राप्ती: ब्रिटिश सेनेच्या पहिल्या महिला मेजर जनरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशप्राप्ती| सुसन रिज, ब्रिगेडियर

सुसन रिज आगामी सप्टेंबर महिन्यात ब्रिटनच्या सर्वोच्च श्रेणीच्या महिला अधिकारी अर्थात डायरेक्टर जनरल आर्मी लीगल सर्व्हिस प्रमुख असतील. त्यांच्या हाताखाली १३० वकील आणि सेना असेल. त्या एका अधिकारी कोअरच्या प्रमुखही असतील आणि त्यात उच्चशिक्षित महाधिवक्तेही असतील. महिलांची सर्वोच्च पदावर नियुक्ती करण्याबाबत ब्रिटिश लष्करात मागच्या ब-याच दिवसांपासून होकार-नकाराची अवस्था होती आणि प्रथमच एका महिलेला या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

सुसन या २३ वर्षांपासून लष्करात कार्यरत असून त्यांनी ६ वर्षे वकिलीही केली आहे. वकिलीच्या कार्यकाळात चार वर्षांतच त्या कंपनीच्या मालकाने सुसन यांना भागीदारीचा प्रस्ताव दिला. मात्र, सुसन यांनी तो फेटाळला आणि सेंडहर्स्टमध्ये प्रोफेशनली क्वालिफाइड ऑफिसरच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमात अधिकारशाही आणि नेतृत्वगुणावर अधिक भर असतो. शिवाय प्रत्यक्ष शारीरिक, शस्त्र तसेच अन्य धोरणांचेही यात प्रशिक्षण दिले जाते. फील्ड नसल्यास लष्कराचे वकील, डॉक्टर, डेंटिस्ट, नर्स आदी क्लासरूममध्ये असतात. इतकी वर्षे लष्करात राहू असा विचार सुसन यांनी कधीच केला नव्हता. त्यांना फक्त चार वर्षेच लष्करात राहायचे होते. त्यांच्या बटालियनच्या त्या एकमेव महिला होत्या. योगायोगाने लष्करातील लेफ्टनंट कर्नलशीच त्यांनी लग्न केले.

पती जेव्हा बाल्कन किंवा अफगाणिस्तानमध्ये युद्धास जात तेव्हा सुसन यांनाही त्यांच्यासोबत जायची संधी मिळायची. मात्र, आता प्रत्यक्षात त्यांच्यावरच जबाबदारी आहे. कमांडरना शिस्त, रोजगार कायदे आणि प्रशासकीय कायद्यांबाबत सल्ला द्यावा लागेल. सोबतच बरॅक, प्रशिक्षण कार्यशाळा किंवा प्रत्यक्ष अभियान दुस-या देशात असताना जवानांना लष्करी सल्ला देण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असेल.

ब्रिटिश लष्कराचे चीफ ऑफ जनरल स्टाफ सुसन यांना पूर्वीपासूनच ओळखतात. ते म्हणतात की, लष्करात काही निवडक लोकच आहेत, ज्यांच्यावर माझा विश्वास अाहे. ब्रिगेडियर सुसन रिज या त्यांच्यापैकीच एक आहेत.

ब्रिटिश लष्करात सध्या ८२ हजार जवान असून त्यात महिलांचे प्रमाण ८.९ टक्के आहे. पुढील पाच वर्षांत महिला जवानांची संख्या १५ टक्क्यांपर्यंत पोहोचायला हवी, असे लष्कराचे मत आहे. यासाठी ब्रिगेडियर सुसन रिज यांची पदोन्नती कामी येऊ शकते.

>वय - ५२ वर्षे
>शिक्षण - स्टेट स्कूलमधून प्राथमिक शिक्षण, युनिव्हर्सिटी ऑफ लॉमध्ये पदविका शिक्षण, कॉलेज ऑफ लॉमधून उच्च शिक्षण.
>कुटुंब - पती आणि मुलगा
>चर्चेचे कारण - ब्रिटिश आर्मीच्या पहिल्या महिला जनरल म्हणून घोषित.