शिलर यांचे वडील पत्रकार, तर आई गृहिणी होत्या. न्यूयॉर्कमध्ये सातव्या वर्गात शिकत असताना शाळेच्या प्रगतिपुस्तकात त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की, २००१ मध्ये तुम्ही काय असाल? ३५ वर्षांपूर्वी विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, कदाचित प्राण्यांची पार्टटाइम डॉक्टर, पार्टटाइम पुरातत्त्ववादी किंवा पार्टटाइम अमेरिकन राष्ट्रपती. मात्र,त्यांनी पत्रकारितेत करिअर करण्याचे ठरवले.
विविन शिलर/ पत्रकार
>जन्म : १३ सप्टेंबर १९६१
> शिक्षण : कॉर्नेल विद्यापीठातून पदवी, मिडलबरी कॉलेजमधून रशियन भाषेतील पदवी
> कुटुंब : पती फिल फ्रँक, लघुपट निर्माता, दोन मुले.
चर्चेचे कारण : ट्विटर न्यूजप्रमुखपदाचा नुकताच राजीनामा.
सोव्हिएत स्टडीमधील पदवीनंतर त्यांनी रशियात टूर गाइडची नोकरी पत्करली. त्यांच्या पत्रकारितेला १९८८ पासून सुरुवात झाली. टर्नर ब्रॉडकास्टिंगने रशियात त्यांना भाषांतरकाराची नोकरी दिली. येथे त्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचल्या. २००२ ते २००६ या काळात डिस्कव्हरी टाइम्स वाहिनीतही त्यांनी कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात वाहिनीची प्रेक्षक संख्या एक कोटीवरून ३ कोटींवर जाऊन पोहोचली. २००९ मध्ये त्या नॅशनल पब्लिक रेडिओ (एनपीआर) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या. त्यांच्या कार्यकाळादरम्यान एनपीआर वाईट कारणांसाठी चर्चेत होते. २०१० मध्ये राजकीय विश्लेषक जुआन विलियम्स यांनी मुसलमानांना पाहून भीती वाटते, असे विधान केल्यानंतर शिलर यांनी विलियम्स यांना नोकरीवरून काढून टाकले. विलियम्स यांनी ही गोष्ट एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाला सांगावी, असे सांगत शिलर यांनी नंतर विवादही ओढवून घेतले. त्यानंतर मार्च २०११ मध्ये एनपीआरसाठी निधी गोळा करणारे रॉन शिलर यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला. एनपीआरने सरकारी मदत घ्यायला हवी का, असा प्रश्न उचलत परंपरावादी खासदारांवर टीकेची झोड त्यांनी या व्हिडिओमधून उठवली होती. या वादामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.