आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Women's Day By Melinda Gates, Divya Marathi

दिव्य मराठी विशेष : भारतीय महिलांकडून अव्याहत काम करण्याची प्रेरणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचा जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी भारताकडे अनेक कारणं आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक बालकं आपला पाचवा वाढदिवस साजरा करत आहेत. या यशासाठी भारतीय महिलांचे खास आभार मानायला हवेत. भारत योग्य दिशेने मार्गक्रमण करतोय, कारण येथील स्त्री-शक्ती देशाला त्या दिशेने नेतेय.


मी व माझे पती बिल गेट्स यांच्यासाठी हे इतकं महत्त्वाचं का आहे, याची कारणं मला आवर्जून सांगावीशी वाटतात. गेट्स फाउंडेशनमध्ये सर्व कामं एकाच साध्या नियमाने होतात, जो मी व बिलने कुटुंबाकडूनच शिकला आहे. प्रत्येक माणसाचं महत्त्व एकसारखंच असतं, हाच तो नियम. म्हणजेच, भारतात जन्मलेलं प्रत्येक मूल- श्रीमंत असो की गरीब, मुलगी असो की मुलगा.. प्रत्येकाला निरामय आयुष्य जगण्याच्या समान हक्क आहे. मायक्रोसॉफ्टच्या यशानंतर आम्ही एक निर्णय घेतला. तो म्हणजे, गरीब देशांना विळखा घालणा-या समस्यांची सोडवणूक आम्ही आमच्या संसाधनांनी करू. यासाठी आम्ही महिला व मुलींच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं.


तीन वर्षांपासून भारत पोलिओमुक्त आहे. गर्भवतींना चांगल्या वैद्यकीय सुविधा व पौष्टिक आहार मिळत असल्यामुळे येथील मुलं आता पहिल्यापेक्षा अधिक आरोग्यवान झाली आहेत. प्रसूतीदरम्यान अर्भकं व आई दगावण्याचे प्रमाण कमी होत आहे. कारण आई व सुईणींना योग्य शिक्षण व प्रशिक्षण मिळत आहे. यामुळे आता प्रसूती म्हणजे जिवावरचं संकट राहिलेलं नाही. पोलिओ निर्मूलनात आरोग्य स्वयंसेवकांचं मोठं योगदान आहे. यातही बहुतांश महिलाच आहेत. याच कारणामुळं दुर्गम भागात आता सहजपणे आरोग्य सेवा मिळत आहेत.


स्त्री-शक्तीला योग्य दिशेने वळवून देशाला प्र्रगतिपथावर नेले जाऊ शकते. याच कारणामुळे गेट्स फाउंडेशनने बिहार व उत्तर प्रदेश सरकारसोबत हातमिळवणी केली आहे. या माध्यमातून महिलांच्या सुप्त शक्तीला वाव देत देशाला विकासपथावर नेले जात आहे.


आपल्या कुटुंबासाठी काय महत्त्वाचं, हे महिलेला अचूक माहीत असतं. तिच्याकडे एक रुपया असेल तर ती 80 पैसे मुलांवर खर्च करते. कुटुंबाचे बजेट आवाक्यात ठेवून ती हे पैसे आरोग्य, पौष्टिक आहार व शिक्षणावर खर्च करते. ज्या घरांचं बजेट महिलांच्या हाती असतं त्या घरांतील मुलं 20 टक्के अधिक यशस्वी असतात.


सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे माझं अवघं आयुष्य ‘डाटा’मध्येच गेलं. यामुळे आता महिला व मुलींमध्ये गुंतवणूक करणं चांगलं वाटतंय. माझ्या मुली, प्रवासात भेटलेल्या महिलांबाबत मी जेव्हा विचार करते, तेव्हा आपण जे करतोय ते योग्यच असल्याची खात्री अगदी पुरेपूर पटते. महिलांना उगवत्या भविष्याकडून अनेक आशा आहेत. ते सुंदर करण्यासाठी महिला स्वत:पासूनच प्रयत्नांच्या पराकाष्ठेस सुरुवात करत आहेत.


बिहारमध्ये जाताना मी पाटण्यात थांबले. या दरम्यान माझी भेट शर्मिला देवी या तरुणीशी झाली. ती म्हणाली, कुटुंबासाठी घेतलेले तिचे सर्व निर्णय पुढच्या काळात अचूक ठरले. खासकरून मुलं जन्माला घालण्याचा निर्णय. मुलांना आजारी पाडणा-या नाल्या बंद करण्यासाठी दिल्लीत 26 महिलांनी एक समूह स्थापला अन् स्थानिक अधिका-यांना नाल्या बुजवायला भाग पाडल्याची कथाही मी ऐकली आहे. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी महिलांनी आवाज बुलंद केल्याच्या अनेक किस्से-घटना आहेत. त्या सर्व मला प्रचंड प्रेरित करतात. भारतीय महिलांचे सुधारलेले जीवनमान पाहून मनं अगदी आनंदून जातं. ज्यांना भविष्य उज्ज्वल करायंच आहे त्यांनी आजच महिलांचे सबलीकरण करण्याची घोषणा केली पाहिजे. हे स्वप्न सत्यात उतरवले तर पुढील वर्षी महिला दिन साजरा करण्यासाठी भारताकडे आणखी बरीच कारणं असतील.