@ युईची निशिमुरा, जपानी रेफरी
लहानपणापासूनच फुटबॉलची प्रचंड आवड असलेले युईची निशिमुरा यांनी करिअरची सुरुवात प्रशिक्षक म्हणून केली होती. ते जपानच्या एका युवा संघाला प्रशिक्षण देत होते. एका सामन्यात रेफरीने निर्णय चुकीचे दिल्याने त्यांचा संघ पराभूत झाला. या निर्णयांमुळे आपल्या खेळाडूंचे स्वप्न चक्काचूर झाले, असे त्यांना वाटले. त्यामुळे युईची खूप दु:खी झाले. त्यांनी प्रशिक्षकपदाची कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला. इतर खेळाडूंना चुकीच्या निर्णयाचा फटका बसू नये म्हणून त्यांनी रेफरी होण्याचा निश्चय केला.
युईची यांनी जपान फुटबॉल संघटनेच्या रेफरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी जीवनासाठी आदर्श वाक्य तयार केले ते म्हणजे ‘सर्वात आधी खेळाडूंबाबत विचार करा.’ रेफरी म्हणून त्यांनी नव्या करिअरची सुरुवात 1999 मध्ये जपानच्या सर्वात मोठ्या ‘जे’ लीगद्वारे केली. यादरम्यान त्यांच्यावर मैदानात आदर्शाच्या विरुद्ध वर्तणूक केल्याचे आरोप झाले. लीगच्या एका सामन्यात त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याने ओइटाचा डिफेंडर टकाई उमोरोला ‘मरून जा’ असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यावरून मोठा वाद झाला. ते 2004 मध्ये फिफाचे नोंदणीकृत पंच झाले. थायलंड आणि यूएईतील आंतरराष्ट्रीय सामन्यात ते पहिल्यांदा रेफरी झाले. युईची यांना इंग्रजी येत नाही. फाऊल झाल्यावर ते खेळाडूला इंग्रजीत स्पष्टीकरण देतात आणि जपानी भाषेत आपली बाजू मांडतात. त्यामुळे दोघेही परस्परांची बाजू समजून घेऊ शकत नाहीत.