आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघांच्या पावलांसोबत शिकाऱ्यांचे ठसे उमटू देऊ नका...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना ‘व्याघ्रदूत’ म्हणून घोषित केले. त्यांनी मानधन न घेता याला संमती दिली. पाठोपाठ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही व्याघ्रदूत होण्यास संमती दिल्याने वाघांचे ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे म्हणण्यास हरकत नाही.
सिंहांच्या राज्यातले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेले असतानाच महाराष्ट्राच्या मदतीला साक्षात वाघ धावून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सिंहांच्या संरक्षणासाठी गुजरात सरकारने भरपूर प्रयत्न केले. जुनागड जिल्ह्यातील गीर राष्ट्रीय उद्यानात सिंहांची संख्या वाढलीच, पण कालांतराने ती गीर उद्यानाच्या बाहेरही पसरायला लागली. गावानजीकच्या खुरट्या जंगलामध्ये असलेले सिंह अनेकदा गावाच्या वेशीत यायचे. इकडचे मालधारी म्हणजे पशुुपालक समाजाची गुरेही फस्त करायचे. पण मोदीजींनी वन खात्याला गावकऱ्यांचे नुकसानही होणार नाही व सिंहांना संरक्षणही मिळेल अशी योजना तयार करण्यास सांगितले. यातून गावागावांत गावकऱ्यांमधून वनमित्र नेमले गेले. पाहता पाहता गीरच्या सिंहांची ही वाढती संख्या
समुद्रकिनाऱ्यालगतच्या जंगलाच्या आश्रयाने उत्तरेकडे थेट पोरबंदरपर्यंत पोहोचली. नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचलेला आशिया खंडातील सिंह गुजरातने ५००० च्या वर संख्येने पोसला. मोदीजी पंतप्रधान झाल्याने साहजिकच त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाचे मानचिन्हही सिंह झाला.

याच कालखंडात महाराष्ट्रातील वाघांना वाचवण्याचे प्रयत्नही जोरात सुरू होते. मेळघाट, पेंच, ताडोबा व सह्याद्री या चार व्याघ्र प्रकल्पांच्या जोडीला महाराष्ट्र सरकारने विदर्भात वर्धा जिल्ह्यात बोर व गोंदिया-भंडारा या जिल्ह्यांमधे नवेगाव-नागझिरा असे दोन नवे व्याघ्र प्रकल्प घोषित केले. खरे म्हणजे फक्त व्याघ्र प्रकल्पांची घोषणा करून वाघांची संख्या वाढवता येत नाही. त्यासाठी या व्याघ्र प्रकल्पांच्या अतिसंरक्षित क्षेत्रात वसलेल्या व वन्यजीवांच्या उपद्रवाने त्रस्त असणाऱ्या गावांचे पुनर्वसन करून वाघ व माणूस या दोहोंनाही उपद्रवविरहित एकांतवास व सुरक्षितता मिळवून देणे आवश्यक असते. महाराष्ट्र शासनाने या गावांच्या पुनर्वसनासाठी प्रामाणिक प्रयत्न करून जवळपास २४ दुर्गम गावांना बाजारपेठांच्या जवळ पुनर्वसित केले. त्यासोबतच अतिसंरक्षित क्षेत्राबाहेर कवच
क्षेत्रात (बफर क्षेत्र) गावांचा जंगलातील वावर कमी करण्यासाठी गावविकासाच्या अनेक योजना राबवण्यात आल्या.

तब्बल दहा वर्षांमधील या प्रयत्नांनी, विशेषत: व्याघ्र प्रकल्पांच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील व अलीकडच्या काळात त्यांच्या कवच क्षेत्रात वाघांची संख्या वाढायला लागली. वाघ व त्यांचा वावर जसा वाढू लागला तसे देशभरातील निष्णात शिकारीही महाराष्ट्रातील व्याघ्रभूमीत दबक्या पावलांनी त्यांच्या विशेष बनावटीच्या लोखंडी सापळ्यानिशी दाखल झाले. महाराष्ट्र शासनाने मग या शिकारी व वन्यजीव तस्करांविरुद्ध मोहीम उघडली. अगदी या आरोपींच्या तपासापासून तर त्यांना जामीनच मिळणार नाही असे सज्जड पुरावे गोळा करून व न्यायालयीन पाठपुरावा करत या आरोपींना पळता भुई थोडी केली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. साहजिकच आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनाही महाराष्ट्रातील व विशेषत: विदर्भातील दर्शनीय वाघांची दखल घ्यावी लागली. देशी व परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर विदर्भाच्या व्याघ्रभूमीत येऊ लागले. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला ऊर्जितावस्था आली. दुर्लक्षित, अविकसित विदर्भ वाघांमुळे आज जगाच्या नकाशावर येऊ पाहतोय. शिकारीच्या कॅन्सरप्रमाणेच वाघांच्या महत्त्वपूर्ण संचारमार्गात महामार्गांचे विस्तारीकरण, कोळसा खाणींचा
विस्तार व काही इतरत्र हलवू शकता येणारे प्रकल्प प्रस्तावित आहेत. बिग बी अमिताभ यावर कँपेन करून या उद्योगधुरीणांना संदेश देईल असे अजिबात वाटत नाही. यापेक्षा व्याघ्र संरक्षणामुळे नद्या बारमाही वाहण्यास कशी मदत होते, वीज प्रकल्प-उद्याेगधंद्यांना पाणी कसे मिळते व व्याघ्र संरक्षणातून राज्याचा कृषी-औद्योगिक व पर्यटन विकास कसा होतो हे अमिताभच्या तोंडून ऐकायला मिळेल. कदाचित परप्रांतांतून येणाऱ्या शिकाऱ्यांनाही शिकारीपासून परावृत्त करण्याचे तो प्रयत्न करील. राज्यातील आम जनतेस या शिकाऱ्यांची व त्यांच्या क्रूर कृत्याची जाणीवही अमिताभ करून देईल. कदाचित त्यातून राज्यातील सर्वसामान्य माणूस व्याघ्र संरक्षणाच्या कार्यात सहभागी होताना दिसेल.

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे खरे म्हणजे संपूर्ण देशातील वन्यजीवप्रेमी, निसर्गमित्र व पर्यटन व्यवसायी सुखावले आहेत. कारण अमिताभच्या या ‘वाघ बचाओ’ मोहिमेतील सहभागामुळे देशभरातील तसेच विदेशातील प्रसिद्धिमाध्यमे आता यामध्ये लक्ष घालतील. देशात ज्या ज्या व्याघ्र प्रदेशांमध्ये वाघांचे संरक्षण होऊन संख्यावाढ झाली आहे त्या सर्वच ठिकाणचे घटक या बातमीने सुखावले आहेत. दुसरीकडे जंगलांमध्ये लावलेले कॅमेरे प्रत्येक वाघाच्या हालचाली टिपत आहेत. संपूर्ण देशातील व्याघ्र अधिवासांमध्ये आता ही कॅमेरा प्रणाली लावण्यात आली आहे. त्यासाठी अनेक तरुण वन्यजीवप्रेमी संस्थांच्या मार्फत हे छायाचित्र संकलनाचे काम करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरही वाघांच्या संख्येत झालेली वाढ कॅमेऱ्यांनी टिपली आहे. चंद्रपूर जिल्हा संपूर्ण देशात १०८ वाघांसह सर्वाधिक वाघांचा जिल्हा ठरला आहे. व्याघ्र प्रकल्पांचे अतिसंरक्षित क्षेत्र व कवच क्षेत्रामध्ये १३८, तर याबाहेरील जंगल क्षेत्रात वाघांची नोंद स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील वाघांच्या अधिवासात टिपलेल्या अशा वाघांच्या छायाचित्रांवरून २०२ वाघांची संख्या
दर्शवणारा ‘टायगर मॅटर्स’ हा अहवाल नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसिद्ध केला.
अमिताभच्या प्रचारामुळे वाढत्या पर्यटकांना व त्याद्वारे होणाऱ्या पर्यटनाला सांभाळण्याचे आव्हान आता विदर्भाला पेलावे लागणार आहे. वन्यजीव अधिवासांना व वन्यजीवांना त्रास होऊ न देता हे सांभाळणे अत्यंत कठीण काम असणार आहे. तसेच कॅमेरा ट्रॅप प्रणालीद्वारे घेतलेले छायाचित्र व तंतोतंत माहितीचे अहवाल देशभरातल्या शिकाऱ्यांना आमंत्रण देणारे ठरू शकते. या दोन्ही गोष्टी पंचपक्वान्नात खडे दाखवण्यासारख्या असल्या तरी काही माध्यमांनी या दोन्ही धोक्यांची जाणीव करून दिली आहे. राज्याच्या वन्यजीव विभागाला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. ‘मेक इन इंडिया’च्या मानचिन्हात स्थान नसले तरी वाघांनी जगभरातल्या निसर्गप्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले आहे.