आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jakhade Article About Marathi Bhasha Din, Divya Marathi

भाषा : विस्मरणाच्या सीमेवरील...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत: ची मूळ भाषा टिकवून, किंवा वेळप्रसंगी टाकून परभाषेचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती आज वाढत आहे. प्रत्येक भाषेकडे असणारी लवचिकता बोलणार्‍यास उपयोगी पडते. या घटना वरकरणी सहज घडत असल्या तरी याचा परिणाम म्हणून काही भाषा क्वचितच सबल बनतात, खरंतर बहुतांशवेळी भाषा दुर्बल बनत जातात. भाषेतील शब्दसंख्या कमी होत जाते आणि भाषेचा परिणाम क्षीण होऊ लागतो. कालपरत्वे अशा भाषा विस्मरणाच्या सीमारेषेवर पोहोचतात. या सर्वेक्षणाच्या निमित्ताने हे निरीक्षण अधिक स्पष्ट झाले. अनेक समाजघटकांनी घरात बोलायची एक भाषा आणि घराबाहेर पडल्यावर बाहेर बोलायची भाषा, हे दोन स्वतंत्र कप्पे केले आहेत. मुख्य प्रवाहात येण्याची ऊर्मी, समाजातला वावर आणि आपली मूळ भाषा न बोलण्यामुळे फारसे न होणारे नुकसान, यामुळे मूळ परंपरागत भाषांकडे दुर्लक्ष होत गेले.

भाषांची आजची स्थिती व त्यांचे अस्तित्व दर्शविणारे हे सर्वेक्षण दीर्घ काळानंतर झालेले आहे. समकालीन भाषांची नोंद या निमित्ताने अधोरेखित होत आहे. लुप्त होत जाणार्‍या किंवा मरणप्राय भाषांना यातून फार बळ मिळेल असे म्हणता येणार नाही. परंतु, त्यांचे दस्तऐवजीकरण या निमित्ताने झाले आहे. भाषिक विविधतेचा अभ्यास, भाषांचे संचयन, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करणे, या भाषाविषयक महत्त्वाच्या कामात या सर्वेक्षणाचे योगदान उपयुक्त ठरेल, असे मला वाटते. संकटग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या भाषांचा यातून गौरव होत आहे, हे फार महत्त्वाचे वाटते. नागपुरी, नगरी, कोल्हापुरी, सातारी, वैदर्भी अशा बोलींचा स्वतंत्र बोली म्हणून येथे समावेश हेतुपूर्वक केलेला नाही. या भाषा भौगोलिक क्षेत्र स्पष्ट करणार्‍या आहेत व त्यामध्ये फरक फक्त ‘हेला’चा आहे. एकच बोलीसुद्धा विविध भागात विविध प्रकारे प्रकट होते. पश्चिम महाराष्ट्रातील पारधी समाजाची भाषा व नांदेड जिल्ह्यातील पारधी समाजाची भाषा यात फरक आहे.

नागपूर जिल्ह्यात मध्य प्रदेशाच्या सीमेवर कोसरी बोली आहे. ती यात समाविष्ट करता आली नाही. कारण हा कोसरी समाज जवळजवळ आता मराठी भाषाच बोलतो, तर गोंदिया जिल्ह्यात बुरड-लोधी बोलीही काही लोक बोलतात. गोंदिया जिल्ह्यातील बोरा, सरांडी, गांगला, सुकडी, मुंढरी अशा पाच गावांतच बोलली जाते. त्यात सुकडी या गावी चक्रधरांची यात्रा भरते. ही पाच गावे एखाद्या बेटासारखी स्वतंत्र राहात असून, त्यांचा रोटी-बेटी व्यवहार तेवढ्या पाच गावांतच ते करतात. लोधी बोली ही मराठी प्रभावाची हिंदी असलेली बोली आहे. भंडारा जिल्ह्यातील पोवार भाषाही हिंदीमिश्र मराठी आहे.

सतनामी हीसुद्धा अशीच मराठी प्रभावाची भाषा आहे. अशा अनेक छोट्या-छोट्या भाषा मराठी व हिंदी किंवा सीमाभागातील शेजारच्या राज्यातील भाषांच्या प्रभावातील आहेत व त्यांची स्वतंत्र नोंद सर्वेक्षणाच्या चौकटीत बसवून घेणे अवघड आहे. भाषिक पर्यावरणही महत्त्वाचे ठरते. विशेषत: भटक्या-विमुक्तांच्या भाषांवर तेलुगू, कन्नड अशा भाषांचा प्रभाव आहे, तर समुद्रकिनार्‍यावरील भाषांवर पोर्तुगीज, इंग्लिश भाषांचा प्रभाव आहे. भाषांची वर्गवारी आकारविल्हेनुसार अथवा भौगोलिकदृष्ट्या न करता मराठीची रूपे, आदिवासींच्या भाषा, भटक्या-विमुक्तांच्या भाषा आणि इतर भाषा अशा पद्धतीने केली आहे. बोलीचे अल्प असे व्याकरण दिले आहे. बोलीचा इतिहास त्या समाजाच्या इतिहासाशी निगडित असल्याने तो सामाजिक व काही ठिकाणी पौराणिक संदर्भातून दिला आहे. काही भाषा प्रत्येक जिल्ह्यात त्या समाजाच्या अल्प संख्येनुसार असतात. त्या केवळ एखाद्या भूप्रदेशातच नसतात. अशा वेळी बोलींचा प्रदेश नकाशात दाखवणे अवघड होते. समूह लहान पण संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला असणे ही गोष्ट विशेषत: भटक्या-विमुक्तांच्या संदर्भात जाणवली.

महाराष्ट्रात पंथ, जाती, धर्म, संप्रदाय यांची विविधता आहे, यामुळे मराठीची प्रादेशिक रूपे साहजिकच अनेक आहेत. अभिजन, बहुजन, भटके, विमुक्त, आदिवासी, दलित अशा विविध समाजांच्या विविध भाषिक रूपांनी महाराष्ट्र ध्वनीत होत असतो. मूळ भाषिक व इतर परंपरा आणि तिच्यात वेळोवेळी होत असलेले बदल व त्यातून संक्रमित झालेली आजच्या पिढीची बोली किंवा तिची रूपे येथे आढळतात. तिचा हा भाषिक नकाशा आणि फोटो आपल्याजवळ असावा, असे वाटत असेल तर सर्वांनी हा ग्रंथ आपल्या संग्रही ठेवावा.

अरुण जाखडे, पुणे
लेखक व प्रकाशक,
संचालक पद्मगंधा प्रकाशन, पुणे
संपर्क- ९८५००८६४२३