आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’चा फसलेला जनता दरबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय राजकारणात आम आदमी पार्टी(आप)च्या रूपाने एका नव्या पक्षाचा उदय झाला आहे. प्रचलित राजकीय पक्षांची कार्यशैली जनसंवादापेक्षा जननियंत्रणावर आधारलेली आहे. जनतेला भावनिक आधारावर वश करू शकणारे वा पैसा व मनगटशाहीच्या जोरावर लोकांना वळवू शकणारे लोक या प्रचलित पक्षांचे आधार झाले. यामुळे पक्ष व लोक यांच्यात अविश्वास वाढला. नाक्या-नाक्यांवर हात उगारून शुभेच्छांच्या धमक्या देणारे नेत्यांचे बॅनर्स, खंडण्या वसुलीच्या कामात गुंतलेले कार्यकर्ते, एकेका जिल्ह्यात एकेका कुटुंबाची वसलेली साम्राज्ये यामुळे सर्वच राजकीय पक्ष लोकांपासून तुटलेले दिसतात. ही स्थिती सत्ताधारी व सत्ताकांक्षी अशा दोन्ही पक्षांबाबत खरी आहे. कारण एकतर आता सर्वच पक्ष कुठे ना कुठे सत्तेत आहेत आणि त्या सर्व ठिकाणी भ्रष्टाचार दुथडी भरून वाहतो आहे. ‘स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे बघायचे वाकून’ असा सर्वच राजकीय पक्षांचा स्वभाव झाला आहे. महाराष्‍ट्रात आदर्शच्या मजल्यांमागील भ्रष्टाचार तपासणारे भाजपवाले कर्नाटकात येदियुरप्पांना परत पावन करून घेताना त्यांच्या पापाच्या खाणी सहजपणे नजरेआड करतात. आपच्या यशाचे कारण प्रचलित राजकीय पक्षांची ही कार्यशैली हे आहे.
प्रचलित राजकीय पक्षांपेक्षा आपली वेगळी प्रतिमा तयार करण्यात आप यशस्वी ठरले. सत्तेच्या सोबत येणारा डामडौल त्यांनी नाकारला, लाल दिव्याद्वारा जनतेपासून दर्शवण्यात येणारे अंतर त्यांनी घालवायचे ठरवले, हे सर्व ठीकच आहे; पण सत्ता मिळाल्यावर आता काही व्यवस्थात्मक परिवर्तनाची लोकांना अपेक्षा आहे. राजकारण हे असे गिमिक्सच्या भोवती फार काळ टिकून राहू शकत नाही, हे मात्र आपच्या नेत्यांना अजून उमजलेले दिसत नाही. अरविंद केजरीवाल यांचा फसलेला जनता दरबार हे याचे ठळक उदाहरण आहे.
रस्त्यावर बसून लोकांच्या समस्यांचे निवारण होऊच शकणार नाही. कारण आधुनिक समाज ही एक अत्यंत गुंतागुंतीची रचना आहे. त्याचे संचालन करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा लागणारच आहेत. जुन्या काळात जेव्हा समाज असा गुंतागुंतीचा नव्हता, तेव्हा त्याचे प्रश्न सोडवताना असे सोपे मार्ग यशस्वी ठरत होते. मग जहांगीर बादशहा न्यायाची मागणी करण्यासाठी घंटा टांगून झटपट न्यायनिवाडा करू शकत होता. पण आता हे शक्य नाही. कारण आधुनिक औद्योगिक समाजात माणसाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठीच माँटेस्क्यूने सत्ताविभाजनाचा सिद्धांत मांडला. सुलभीकरणाच्या नादात आपण या यंत्रणाच मोडू लागलो तर माणसाचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. कारण प्रेषित हे सर्वंकष हुकूमशहा होतात, असा इतिहास आहे. आपण आता आहे त्या गुंतागुंतीच्या समाजाचे रूपांतर शेतीपूर्व अवस्थेतील सोप्या सरळ संबंधाच्या समाजात करू शकत नाही. त्यामुळे त्या समाजाला लागू पडणारी सोपी समीकरणेही आपण या आधुनिक समाजाला लावू शकत नाही. नव्या परिस्थितीला नवी उत्तरे शोधावी लागतील. माणूस हा एकूण निसर्ग व्यवस्थेचा भाग झाला असला तरी भाषा व हत्यारे यांच्या आधारे तो स्वत: एका वेगळ्या व्यवस्थेचा निर्माताही बनला आहे. निसर्ग हा त्याच्या नियमांनी बद्ध आहे. निसर्गाचे नियम हे निरपवाद असतात, ते कुणालाच मोडता येत नाहीत. माणसाच्या व्यवस्थेचे नियम मात्र तो स्वत:च बनवतो; पण ते निरपवादपणे अमलात येतील, अशी शाश्वती नसते. कारण त्याची अंमलबजावणी करणाराही तोच असतो. म्हणूनच नियम व यंत्रणा यात सतत सुधारणा करीत राहणे भाग असते. ते व्यक्तिनिरपेक्ष असावे, असा आग्रह धरावा लागतो. त्यावर लक्ष ठेवणा-या यंत्रणाही तयार कराव्या लागतात.
आम आदमी पार्टीसमोर आव्हान आहे ते या सडलेल्या यंत्रणेला दुरुस्त करण्याचे. त्याची कार्यक्षमता वाढवण्याचे. त्याला अधिक लोकसन्मुख करण्याचे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर बसण्याची गरज नाही. उलट ते मंत्रालयात बसले तर सरकारी यंत्रणेवर त्याचा अधिक वचक बसेल. एका सरकारी कार्यालयात नोकरभरतीच्या वेळी कार्यालयाच्या प्रमुखांनी ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करायचा निश्चय केला. मुलाखतीची पत्रे पाठवण्यापासून परीक्षेपर्यंत सर्व टप्प्यांवर त्यांनी तपासणीच्या यंत्रणा तयार केल्या, मुलाखतीला आलेल्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी कर्मचा-यांची पथके तयार केली व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपला मोबाइल नंबर ठळक अक्षरात सर्वत्र लावून काही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. आश्चर्य म्हणजे त्यांना दिवसभरात असा एकही फोन आला नाही. कारण केवळ त्या धाकानेच सर्व यंत्रणा नीट कामाला लागली. एरवी मुलाखतीला आलेल्यांना छळणारे लोक त्या दिवशी त्यांना स्वत:हून सहकार्य करत होते. मंत्र्याच्याही दबावाला बळी न पडता सदर भरती पार पडली.
आज शासन यंत्रणा दलालांच्या अधीन झालेली आहे. कारण त्यात अनावश्यक व निरर्थक नियमांची भरताड झाली आहे. या नियमांचे परीक्षण करण्याची आवश्यकता आहे. त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. असे न झाल्याने ही यंत्रणा अतिशय अवजड बनली आहे. त्याहीपेक्षा धोकादायक म्हणजे ती कुठल्याही कार्यपूर्तीच्या उद्दिष्टाचे साधन न राहता स्वत:चे पोषण करण्यात गुंतलेली स्वयंपूर्ण प्राणी बनली आहे. माणसाने आपल्या व्यवस्थेच्या सोयीसाठी अशाच काही संकल्पना व यंत्रणा तयार केल्या आहेत. देव, धर्म, पैसा, नोकरशाही, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था वगैरे. यांना काही नियमांनी त्याने आपल्या नियंत्रणात ठेवण्याचीही व्यवस्था केली. पण हळूहळू या यंत्रणा स्वायत्त व नंतर स्वतंत्र झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. देव, धर्म या यंत्रणा व संकल्पना तर इतक्या स्वतंत्र झाल्या की, त्याच माणसावर राज्य करू लागल्या आहेत! त्यांचे काय करायचे ते नंतर पाहू; पण सध्या नोकरशाही, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था याबाबत बदल करायला वाव आहे. आम आदमी पार्टीने या कामाला हात घातला तर त्यांची विश्वासार्हता वाढेल. त्यांनी हा दरबारी कानडा परत न आळवता मंत्रालयात ठोकून बसावे व राज्य करावे हे बरे. असे जर केले नाही तर या गिमिक्सची नवलाई संपल्यावर जनतेच्या मनात निर्माण होणारे नैराश्य भीषण परिणाम घडवणारे असेल. ही संधी आपने गमावू नये, हीच सदिच्छा!!