आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Astrological And Religious Relation Of Makarsankranti

संक्रांत : खगाेलीय संक्रमण सामाजिक बांधिलकीपर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकर संक्रांत एक खगोलीय संक्रमण, किरणाेत्सव... याला वैज्ञानिक अाधार तर आहेच, याचे पाैराणिक महत्त्वदेखील लाेकमानसात बिंबवण्यासाठी धर्माशी सांगड घातली गेली; वैज्ञानिकतेपासून सुरू झालेला संक्रांतीचा प्रवास कालांतराने धार्मिक आणि पुढे सामाजिक बांधिलकीपर्यंत पाेहाेचला. त्यास पाच हजारपेक्षाही अधिक वर्षांची परंपरा आहे.
संक्रांत का साजरी करतात? त्याचे महत्त्व काय? याच दिवशी पतंग का उडवतात? गंगास्नान का करतात? तिळगूळ का वाटतात? असे प्रश्न नव्या पिढीला पडले नाही तरच नवल... पुराणग्रंथांत संक्रांतीचे शास्त्रीय, धार्मिक व सामाजिक महत्त्व सांगितलेले आहे. अगदी महाभारत काळापासून संक्रांतीचे दाखले आढळतात. महाभारतातील युद्धात शरपंजरी झालेले भीष्म पितामह यांनी संक्रांतीलाच देहत्याग केला. राधेने भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी याच दिवसापासूनच व्रतारंभ केला हाेता. भगीरथ ऋषींच्या अथक प्रयत्नाने गंगा नदी पृथ्वीवर याच दिवशी अवतरली, ऋषी पुढे-पुढे चालत गंगेला मार्ग दाखवत निघाले आणि पाटरूपी गंगा त्यांच्या मागे चालत राहिली अशीही अाख्यायिका अाहे. सूर्यदेव याच दिवशी शनिदेवांना भेटायला निघतात अशीही पौराणिक कथा आहे. त्यामुळे संक्रांतीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सर्व आठवणींचे स्मरण म्हणूनही संक्रांत साजरी करण्याची प्रथा आहे.

पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार सृष्टीच्या उत्पत्तीपासून संक्रांतीचा उत्सव सुरू झाला. पृथ्वी ही साडेतेवीस अंशात कलली आहे. सूर्य हा बाराही राशीतून फिरतो, पण तो जेव्हा मकर राशीत येतो तेव्हा त्याचा आपल्या शरीरासह संपूर्ण सृष्टीवर परिणाम होत असतो. मकर राशीत सूर्य आल्यामुळे आपल्याला पर्जन्य मिळण्याची तयारी सुरू होते. सूर्य हा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. दक्षिणायनात भारतातला दिवस छोटा असतो तो आता मोठा व्हायला सुरुवात होते. कारण, सूर्याचा प्रवास विषुववृत्तीय पट्ट्यावरून सुरू होतो. पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे कलते. हा खगोलशास्त्रीय सोहळा सर्वांनीच साजरा करावा यासाठी याला धर्म, संस्कृती आणि पुढे समाजकारणाची जोड दिली गेली. भारत हा देश उत्तरगोलार्धात असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उल्लेखनीय म्हणजे हा संक्रमण दिन पर्वकाळ म्हणूनही मानला जाताे, त्यास पाच हजारपेक्षाही जास्त वर्षांची परंपरा आहे. गंगास्नान, दानधर्म, तिळगुळाची देवाण असा मोठा सोहळा या दिवसापासून सुरू होतो तो रथसप्तमीपर्यंत चालताे. स्नानाची परंपरा अगदी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहते. कडाक्याची थंडी जाता-जाता फटका मारू नये म्हणून या काळातील तिळगूळ सेवनाचे महत्त्व आयुर्वेदाने विशद केले आहे. हे दोन्ही पदार्थ उष्णता अाणि बलवर्धक तसेच कफनाशक आहेत त्यांच्या सेवनाने शरीर कफादी आजारांपासून दूर राहते; म्हणूनच घराघरांत तिळगूळ तयार करण्याची, तो इतरांनाही देण्याची परंपरा रूढ झाली. विज्ञानाला धर्माचे अधिष्ठान मिळाल्याने भारतात ही परंपरा पाच हजार वर्षांनंतरही घराघरांत टिकून आहे.

संक्रांतीपासूनच देवांची रात्र संपून दिवस सुरू होतो. स्वर्गाचे दरवाजे याच दिवशी उघडतात असेही म्हटले जाते. वैज्ञानिक भाषेत सांगावयाचे झाल्यास येथूनच दिवस मोठा अन् रात्र लहान होऊ लागते. जणू तिमिराकडून तेजाकडे पृथ्वीची वाटचाल सुरू होते. अर्थातच शास्त्रकारांच्या मते हा तिमिर म्हणजे नकारात्मक ऊर्जा तर तेज म्हणजे सकारात्मक ऊर्जा. ही सकारात्मक ऊर्जा संक्रांतीपासून अासमंत व्यापून टाकायला लागते. भरपूर सूर्यप्रकाश मिळू लागतो, तो सर्वांगावर घेता यावा म्हणून गंगास्नान सांगितले आहे. सूर्याच्या तेजाने ऊन झालेले नदीतील पाणी अधिक आरोग्यदायी असते. हेच अधाेरेखित करण्यासाठी त्याची धार्मिकतेशी सांगड घातली गेली. मुलेही सूर्यप्रकाशात अधिक काळ असावीत म्हणूनच पतंगबाजीचा उत्सव पुढे सुरू झाला. तात्पर्य असे की, सदृढ अाणि निरामय आरोग्यदायी असा हा किरणोत्सव सोहळा साजरा करावा तसेच प्रत्येकाने तिळगूळ खाल्ला तर शरीरात ऊब निर्माण होऊन सर्दी-कफविकार टाळता येताे, प्रकृती सदृढ राहते.
पुराणग्रंथांचे अभ्यासक प्राध्यापक वसंत कुंभोजकर यांच्या मते, संक्रांत हा खगोलशास्त्रीय संक्रमण काळ आहे. त्याला वैज्ञानिक, पाैराणिक अाधार तर अाहेच, शिवाय पुढे संक्रांतीला सामाजिक सणाचे स्वरूप अाले. कारण समाजात एकोपा टिकवण्यासाठी या दिवसाचा चांगला उपयोग हाेऊ शकताे हे समाजशास्त्रज्ञांनी हेरले अाणि ‘तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला’ हा संदेशही दिला. जुनी भांडणे विसरून नव्याने मैत्री करावी, ती टिकवावी असाही यामागचा हेतू असावा, जेणेकरून सामाजिक शांतता, सलोखा राखण्याच्या दृष्टीने केलेला हा एक प्रयत्न हाेता, ताे बहुतांशी यशस्वीदेखील झाला. भारताच्या विविध प्रांतांत वेगवेगळ्या नावाने उदा. महाराष्ट्रात संक्रांत, दक्षिण भारतात पोंगल तर उत्तर भारतात लोहाडी अशा नावाने हा सण साजरा होतो. पंजाब, हरियाणात लोहाडी हा उत्सव १३ जानेवारीला साजरा करतात तेथे अग्नी पेटवून नृत्य करीत शेंगदाणे, गुळाचे पदार्थ सेवन करीत शेतकरी बांधवांसह सामान्य नागरिकही एकत्रितरीत्या लाेहाडी साजरी करतात. अन्य प्रांतांत मात्र संक्रांत १४ किंवा १५ जानेवारीलाच साजरी होते. कारण पंचांगातील गणितशास्त्राचा अाधार घेता सूर्य याच दिवशी मकर राशीत प्रवेश करतो. भारतासह नेपाळमध्येही संक्रांत राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा हाेताे. या दिवशी देशभर सार्वजनिक सुटी असते.