आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातील (योगा) आसन प्रयाेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसनाशी आमचा संबंध आईने जेवणासाठी आवाज दिल्यावर ती घेऊन येण्यापुरताच होता. आजकाल विविध प्रकारची आसने क्लासेसमध्ये करायला बाजारात विकत मिळतात. आणि याेगासनांचा तक्ता मिळतो. त्यात विविध योगासने आणि त्याची माहिती दिलेली असते. सामान्य माणसांचा संबंध आसनांशी फारसा येत नाही. पण राजकारण्यांचे तसे नसते. विविध योग आणि त्याच्याशी संबंधित आसने केल्याशिवाय राजकारण करताच येत नाही. किंबहुना योगासने येणे राजकारणाची पहिली पायरीच असते. योगायोगाने अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यालाच योगासने म्हणतात. पत्रकार नावाची विघ्नसंतोषी मंडळी काही कारण नसताना योगायोगातील परस्पर संबंध जोडून राजकारण्यांना नाहक बदनाम करतात. खरे तर योगासने तब्येतीने करणे तब्येतीसाठी खूप चांगले असते. करायची म्हणून केल्यास त्याचा अजिबात परिणाम होत नाही. आणि काही फळही मिळत नाही...

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपासह िवविध पक्षांनी आपापले नेते व कार्यकर्त्यांसाठी योगासने अनिवार्य केली आहेत. त्यामुळे कात टाकून नवे होता येते आणि शरीरात नवी ऊर्जा प्रवाहित होऊन एकदम च्यवनप्राश घेतल्यासारखे फ्रेश वाटते म्हणे. खरे म्हणजे द्राक्षासव असताना आणखी कोणती करणे गरजेचे नाही, असे बहुतांश सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे म्हणणेे आहे. द्राक्षासव घेतल्याने जडत्व नाहीसे होऊन शरीर हलके होते. आणि माणसाच्या मेंदूवर तरंग उठायला लागतात. सर्व भेदाभेद नाहीसे होऊन माणूस समान पातळीवर येतो. समता, बंधुता व समरसता केवळ आणि केवळ द्राक्षासवामुळे साधल्या जाते. वाटल्यास द्राक्षासवही आम्ही आसनावर बसून घेऊ, असे सांगूनही कोणी ऐकले नाही. सबब त्याचा विचार रात्री केव्हातरी करायचे ठरवून कार्यकर्ते योगासन वर्गात यायला लागले. अशा काही वर्गात आम्ही सदेह जाऊन आलो. त्याचा आँखो देखा हाल खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी.

१ काँग्रेसी शवासन : काँग्रेसच्या कार्यालयात माजी प्रदेशाध्यक्ष आणि शंभर नंबरी झाकले माणिक जे की माणिकराव ठाकरे यांच्यासह कार्यकर्ते शवासन करीत होते. काँग्रेसी कार्यकर्त्यांना सहज करता येण्यासारखे हे एकच आसन आहे. पहिल्यांदा कार्यकर्ते लाेळत आहेत की काय असे वाटले. पण ते शवासन करीत असल्याचे माणिकरावांनी दीर्घ श्वसन करीत सांगितले. या आसनाने मानसिक अस्थिरता व अशांती सहजतेने दूर करता येते तसेच नकाे असलेल्या नेत्यांनाही दूर ठेवता येते. मानसिक ताण, उच्च रक्तदाब व हृदयरोगावर उपयोगी असल्याने काँग्रेसचे आवडते आसन आहे.

२ सेनेचे धनुरासन : शिवसेनेच्या कार्यालयात सर्व नेते धनुरासन करीत होते. उद्धव ठाकरे आणि बाळ आदित्य यांची आसने सर्वात समोर होती. या आसनामुळे मणक्याचे हाड लवचिक होण्यास मदत होते. पाेट कधीच निघत नाही. आणि पोटाचे वायू विकार कधीच होत नाही. यामुळे लठ्ठपणा येत नाही. खास करून दिवाकर रावते आणि रामदास कदम यांच्यासाठी हे आसन खूपच उपयुक्त असल्याची कुजबूज होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे आधीच कमालीचे लवचिक असल्याने त्यांना आसनाची सक्ती नव्हती...

राष्ट्रवादीचे शीर्षासन
शीर्षासन हे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अत्यंत आवडते आसन आहे. खाली डोके आणि वरती पाय या अवस्थेत मिळणारा आनंद काही औरच असतो. शिवाय खालचे अगदी स्पष्ट दिसते. शरद पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचे हे आवडते आसन आहे. यामुळे डोक्याला ताप राहत नाही. डोळे, नाक, कानाची शक्ती वाढून स्मरणशक्तीत वाढ होते. काहीही पचवण्याची शक्तीही खूप वाढते. शिवाय अवेळी झाडाझडती, चाैकशांचा ससेमिरा मागे लागला तरी मानसिक संतुलन कायम राहते. राष्ट्रवादीचे नेते आणि परमनंट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मात्र हलासन करतात. यात पाय शरीराच्या मागे ९० डिग्रीत नेऊन टेकवायचे असतात. या आसनातही मणक्याची हड्डी लवचिक होण्याबरोबरच पृष्ठभागाच्या मांसपेशी मजबूत होतात. त्यामुळे कुठेही, केव्हाही, कोणत्याही वेळी काहीही बेताल बोलून मुजोरीवर कायम राहता येते...

४ भाजपचे सर्वांगासन : भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांचे हे सध्या खूपच आवडते योगासन आहे. यामुळे शरीराच्या सर्व अंगांना व्यायाम होतो. शीर्षासनात खाली डोके आणि वरती पाय असतात. या आसनात भिंतीचा आधार न घेता कमरेपासून शरीराचा वरचा भाग हाताने तोलून धरायचा असतो. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे यांचेही हे आवडते आसन आहे. लठ्ठपणा, अशक्तपणा व थकवा दूर करून उंची वाढते. नाथाभाऊंना मात्र हे आसन मुळीच आवडत नाही. त्यांना फक्त वज्रासन जमते. दोन्ही पाय दुमडून बसले की चांगले वाटते. यात पाचन शक्ती वाढते. आणि आसन केल्याचे समाधानही मिळते...

केजरीवालांचे उष्ट्रासन : आम आदमी पार्टीची कोणतीच गोष्ट सरळ, साधी नसते. इतरांनी केले तेच त्यांनी केले तर काही अर्थच राहत नाही. आमचे अरविंद केजरीवाल सहकार्‍यांसह रोज उष्ट्रासन करतात. या मुळे गळ्यातील ग्रंथी मजबूत होतात. तसेच कंबर आणि पोटाचा लठ्ठपणा कमी होऊन लवचिकता येते. गळ्याच्या ग्रंथी मजबूत झाल्यामुळेच केजरीवालांचा खोकला गेला.

६ तावडेंचे शलभासन : राज्याचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोदवीर तावडे हे सर्वांपेक्षा वेगळे असे शलभासन करतात. मणक्याच्या हाडाखालील भागात होणार्‍या सर्वच रोगांपासून यामुळे मुक्ती मिळते. कंबरेच्या दुखण्यासाठी िवशेष लाभप्रद आहे.
अतुल पेठकर, नागपूर
बातम्या आणखी आहेत...