आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्तारांची दुहेरी शिकार अन् दर्डांचे एकेरी गणित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपक्ष आणि राष्ट्रवादी-भाजपच्या मदतीने विधिमंडळाचा सोपान चढण्यात दोन वेळा अपयशी ठरलेले सुभाष झांबड अखेर काँग्रेसच्या पायरीवरून आमदार झाले. त्यांनी शिवसेनेच्या किशनचंद तनवाणींना खडे चारत शिवसेना-भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ हिसकावून घेतला. वरवर पाहता ही दोन धनिक मित्रांमधील आणि पक्षनिष्ठा, मूल्य, तत्त्वे बाजूला ठेवून लढली गेलेली निवडणूक असली तरी त्यातून औरंगाबाद जिल्ह्यात युतीला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा, लोकसभेत शिवसेनेसाठी झांबड यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. गेल्या विधानसभेत कन्नड, गंगापूर, पैठण, सिल्लोड, फुलंब्री मतदारसंघ युतीने गमावले. जिल्हा परिषदही गमवावी लागली. त्यापाठोपाठ पदवीधरमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले. भाजपच्या श्रीकांत जोशींविरुद्ध शिवसेनेचे राजू वैद्य उभे ठाकले. दोघेही पडले. त्यामुळे युतीचा हक्काचा मतदारसंघ ताब्यातून गेला. आता त्यात औरंगाबाद-जालनाची भर पडली आहे. एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व गाजवणा-या शिवसेना-भाजपची घसरण सुरूच आहे. नेत्यांमधील हेव्यादाव्यांनी दोन्ही पक्ष पोखरले जात आहेतच, शिवाय युतीतील नेत्यांमध्येही ताळमेळ राहिलेला नाही. शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिल्याचे दाखवून भाजपची काही मंडळी आतून काँग्रेस-आघाडीला अनुकूल पावले टाकत आहेत, तर भाजपच्या विरोधात शिवसेनेचे अनेक जण आक्रमक होत आहेत.


* परतफेड : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेत युतीकडे बहुमत नाही, हे स्पष्ट दिसत असूनही तनवाणी यांनी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी ते स्वत:देखील विजयाबद्दल साशंक होते. युती आणि आघाडीमध्ये असलेले सुमारे 100 मतांचे अंतर कसे कापले जाणार, याची त्यांना चिंता होती. तिरंगी लढत झाली तरच विजयाची माळ गळ्यात पडेल, हेही त्यांना कळले होते तसेच झांबडांच्याही लक्षात आले होते. म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या मनमोहनसिंग ओबेरॉय, अभिजित देशमुख यांच्या शिडातील हवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून काढून घातली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पसंतीचे मानले गेलेले अंबडचे नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांचे तिकीट अखेरच्या क्षणाला कापण्यात यश मिळवले.


* पराभव विसरून : गेल्या महिनाभरात या निवडणुकीत झालेल्या घडामोडीत झांबडांना सर्वाधिक मदत माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचीच झाली. जुने कार्यकर्ते एवढ्या एकाच निकषावर झांबडांना तोलू नये. काँग्रेस-राष्ट्रवादीकडील बहुमत पाहता त्यांची सहज विजयी होण्याची क्षमताही लक्षात घ्यावी, असा हट्ट त्यांनी धरला. स्थानिक पातळीवरही शेवटच्या क्षणाला सूत्रे हलवली. तेथेच झांबड यांचा 90 टक्के विजय निश्चित झाला होता. 2007 मध्ये याच निवडणुकीत झांबडांच्या उमेदवारीमुळे सत्तारांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, राजकारणात हे चालणारच असे म्हणत सत्तारांनी झांबडांच्या पाठीशी ताकद उभी केली. औरंगाबाद शहरात शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे महत्त्व कमी करणारा एक आमदार त्यांना हवा होता. त्यासोबतच तनवाणींकडून झालेल्या पराभवाची परतफेडही करायची होती. ती त्यांनी करत दुहेरी शिकार साधली.


* दर्डांचे गणितही जमले : राजेंद्र दर्डा यांच्यासाठीही झांबड यांचा विजय महत्त्वाचा होता. काँग्रेसची औरंगाबादेतील शक्ती वाढवणे, एवढे एकमेव ध्येय ठेवून दर्डा झांबडांसाठी मोर्चेबांधणी करत होते, असे म्हटले तर ते हास्यास्पद ठरेल. कारण 2009च्या विधानसभा निवडणुकीत झांबड यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दर्डांच्या विरोधात शड्डू ठोकले होते. मते कमी मिळाली असली तरी झांबडांनी दर्डांना घाम फोडला होता. स्थानिक स्वराज्यमध्ये झांबड आमदार झाले नाहीत तर ते पुन्हा आपल्याविरुद्ध उभे ठाकतील, याची पूर्वकल्पना असल्यानेच दर्डांनी एक प्रतिस्पर्धी कमी करण्याचे एकेरी गणित मांडले होते आणि त्यात ते यशस्वी ठरले. आता झांबड खरोखरच त्यांच्या मदतीला येतात की नाही, याचे उत्तर काळच देईल.


* तनवाणींचे भवितव्य : अर्थपूर्ण वाटाघाटीतून काहीही विकत घेता येते, हा तनवाणींचा भ्रम या निवडणुकीत फुटला. शिवाय कन्नड, पैठण, गंगापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतील अपयशही त्यांना भोवले. आमदारपद गेलेल्या तनवाणींचा डोळा आता येत्या विधानसभा निवडणुकीवर राहणार आहे. मध्य मतदारसंघातून ते उमेदवारीचा दावा करू शकतात. त्यामुळे प्रदीप जैस्वाल अडचणीत येऊ शकतात. हा दावा शक्य झाला नाही तर तनवाणी जिल्हाप्रमुखपदासाठी प्रयत्न करतील. त्यात ते यशस्वी झाले, तर खासदार चंद्रकांत खैरे, विद्यमान जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्यापुढील डोकेदुखी वाढणार आहे. (सध्या जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंशी सूत जुळले असल्याने तनवाणी त्रिवेदी यांच्याच पदावर दावा करू शकतात. या सा-याचा विचार शिवसेनेच्या श्रेष्ठींना करावा लागणार आहे. नेत्यांमधील भाऊबंदकी थांबवण्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचलली नाहीत तर शिवसेनेची घसरण रोखता येणार नाही.


फक्त श्रीमंतांसाठी
सगळ्याच लोकांना राजकारणात येण्याची संधी मिळावी आणि त्यांनीही देशाचा कारभार हाकण्यासाठी योगदान द्यावे, यासाठी सर्व प्रकारच्या निवडणुकांत मतदारसंघ राखीव ठेवलेले आहेत. त्यात आता ‘फक्त श्रीमंतां’साठी असे अनेक मतदारसंघ अस्तित्वात आले आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदारसंघ त्यापैकीच आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यापासून ते मतदारांची मर्जी राखत फोडाफोडी करण्यापर्यंत जे प्रकार झाले, त्यावरून हा मतदारसंघ केवळ आणि केवळ नवकोट नारायणांसाठीच असल्याचे सतरंज्या उचलण्यात, आंदोलने करण्यात आयुष्य घालवणा-या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे.