आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Author Asghar Wajahat Article On Freedom Of Expression

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विचारांवरील हल्ला धोकादायक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विचार हीच माणसाची खरी शक्ती आहे. ही शक्तीच त्याला इतर प्राण्यांपासून वेगळे अस्तित्व निर्माण करून देते. विचारांच्या बळावरच माणसाने जगावर राज्य सुरू केले. त्याच्याशिवायच्या प्राणिमात्रांवर प्रभुत्व मिळवण्याची, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची आणि त्यांना आपल्या मनाप्रमाणे वाकवण्याची, फिरवण्याची ताकद माणसात विचारांमधून आली आहे. मनुष्य जसजसा विकसित होत गेला तसतसे त्याला विचारांचे सामर्थ्य कळत गेले. त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडत गेल्या. काही वाईट प्रथा, परंपराही निर्माण झाल्या. युद्धेही झडली आणि तहदेखील विचारांच्या बळावरच झाले. एवढे सगळे असले तरीही विचार करणे आणि तो विशिष्ट, सुसंस्कृत शैलीत मांडणे, आपल्या विचाराशी बांधिलकी ठेवणे, बांधिलकीत समाजाला बांधून घेणे किंवा नवा विचार करण्यास भाग पाडणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. किमान काही वर्षांपूर्वी आपल्याकडे अशी स्थिती होती. ती झपाट्याने बदलत आहे. प्रत्येक जण प्रत्येक घटनेवर स्वत:चे मत तयार करत आहे. त्याला जमेल त्या माध्यमातून व्यक्त होत आहे. आपल्या राज्य घटनेने त्यासाठीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहेच. एका सुजाण, संवेदनशील समाजासाठी ते अत्यावश्यकच आहे. परंतु, असे करताना एखाद्याने कादंबरी, कथा, नाटकाच्या माध्यमातून मांडलेला मूळ विचारच सादरीकरणात बदलून टाकायचा असे स्वातंत्र्य निश्चितच नाही. तो त्या लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि त्याने त्याचा मुद्दा मांडण्यासाठी केलेल्या विचार प्रक्रियेवरच प्रहार आहे, असे मी मानतो. ही सारी काही प्रस्तावना यासाठीच मांडली आहे की, मी लिहिलेल्या ‘गोडसे@ गांधी डॉट कॉम’ नाटकाचा शेवट बदलण्यात आला आहे, तोही विनापरवानगी. माझ्याशी कोणतीही सल्ला मसलत न करता.

एकीकडे विचारांचे स्वातंत्र्य मानायचे आणि दुसरीकडे आपल्याला मान्य नसलेला विचार नाट्यकृतीतून मुळापासूनच उपटून टाकायचा हे भयंकर अस्वस्थ करणारे आहे. आपण आजकाल अनेक ठिकाणी पाहतो, चर्चांमध्ये ऐकतो की एखाद्या पक्षाच्या, संघटनेच्या प्रवक्त्याला वेगळे काही सांगायचे असते; पण टीव्हीवरील अँकर स्वत:च्या मनाने त्याचा वेगळाच अर्थ काढून मोकळा होतो. एवढेच नव्हे, तर तर त्या प्रवक्त्याला असेच म्हणायचे आहे, असा शिक्का मारून त्याचे तोंड बंदही करून टाकतो. तसेच काहीसे ‘गोडसे@ गांधी डॉट कॉम’मध्ये झाले आहे. २०१२ मध्ये मी ते लिहिले असले तरी त्याविषयीची विचार प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. हे नाट्य अवतरित करण्यामागे माझी स्पष्ट भूमिका अशी होती की, कोणताही व्यक्ती आपले विचार दुसऱ्यावर लादू शकत नाही. त्याला तो अधिकार नाहीच. विकसित होत जाणाऱ्या समाजात जर खरेच आपण दुसऱ्याचे अस्तित्व मान्य करत असू किंवा तसा दावा करत असू तर एकमेकांचे विचार जाणून घ्यावेच लागतील. आणि त्यासाठी अगदी विरुद्ध टोकाच्या मतप्रवाहांमध्ये मोठा संवाद होणे गरजेचे आहे, असे मला सातत्याने वाटू लागले होते.

तोच मध्यबिंदू गृहीत धरल्यावर इतिहासातील मला दोन व्यक्ती आणि त्या व्यक्तींच्या विचारांविषयी अजूनपर्यंत सुरू असलेले अनेक प्रवाह महत्त्वाचे वाटले. या दोन व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे. भारतीय स्वातंत्र्यलढा हा एक स्वतंत्र कालखंड, तर त्यानंतरचा कालखंड गांधीजी आणि गांधीजी विरोधक असाच दिसतो. आणि विरोधकांच्या अग्रणी नथुराम आहेच. या दोघांमध्ये संवाद घडला तर काय काय होऊ शकते, या दिशेने मी विचार करून नाटकाची मांडणी केली. त्यात मुख्य म्हणजे दोघांमध्ये संवाद होतो, हेच महत्त्वाचे आहे. दोघेही आपापल्या बाजू मांडतात. हिंसावादी गोडसे आणि अहिंसावादी गांधींमध्ये बोलणे होऊ शकत नाही, हेच मला योग्य वाटत नाही. माझ्या नाटकात मी गांधींजींना अभिप्रेत असलेली हिंदू धर्माची तत्त्वे काय आहेत. गोडसेला समजलेला, उमजलेला हिंदू धर्म काय होता आणि गांधीजी त्याला धर्माची शक्तिस्थळे कशी उलगडून सांगतात. अखेरीस गोडसेलाही गांधींचे विचार पटतात. तो त्यांच्या मार्गाने चालण्यास तयार होतो, अशी माझी मांडणी होती. भारत देश हा जसा गांधींसाठी चिंतेचा तसाच गोडसेसाठीही चिंतेचाच विषय होता. फक्त त्यांचे मार्ग वेगळे होते, हे मला सांगायचे होते.

एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे गोडसे गांधींना मारत नाही, अशा पद्धतीची रचना ‘गोडसे@ गांधी डॉट कॉम’मध्ये मी केली आहे. तशी प्रसंग रचना, त्याला अनुरूप संवाद आहेत. ज्यामुळे नाटकाचा शेवट परिणामकारक आणि माझ्या विचारानुसार व्हावा. मात्र, औरंगाबादचे डॉ. गणेश शिंदे यांनी हा शेवटच बदलून टाकला आहे. गोडसे गांधींची हत्या करतो, असे दाखवताना गोडसे प्रवृत्तीतच नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गींच्या हत्येचे मूळ दडले आहे. किंबहुना ही प्रवृत्तीच या समाजसुधारकांच्या हत्येस कारणीभूत असल्याचा शेवट डॉ. शिंदे यांनी केला आहे. हा सरळसरळ लेखकाच्या विचारस्वातंत्र्यावरील हल्ला आहे. माझे नाटक कुठल्याही संघाने करावे. त्यासाठी त्यांना माझ्या परवानगीची गरज नाही, अशी माझी प्रारंभापासूनच भूमिका राहिली आहे. कारण आपला विचार कलावंत मंडळी समाजाच्या विविध स्तरांत पोहोचवत असतील तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. त्यासाठी फार परवानगी प्रक्रिया करू नये, असे माझे मत होते. मात्र, त्याचा अर्थ नाटकाचा शेवट बदलण्याची आणि माझा मूळ विचारच मोडून तोडून टाकण्याची परवानगी दिली, असा होत नाही. आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मला वाटेल तेच, असा आग्रह सुरू झालेला दिसतो. दुसऱ्याचा विचार दडपून टाकायचा. त्याला भलतेच वळण द्यायचे. समाजात भेदाभेद निर्माण करणाऱ्यांनाच डोक्यावर उचलून घ्यायचे म्हणजेच पुढारलेपणा, असा एक प्रकार जोर धरत आहे. ‘गोडसे@ गांधी डॉट कॉम’पुरतेच बोलायचे झाले तर दिग्दर्शकावर लेखकाचे म्हणणे अचूक पद्धतीने, टोकदारपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असते. लेखकाच्या विचारांनाच दिग्दर्शक नख लावत असेल तर आणि त्याचे समर्थनही करत असेल तर ती धोक्याची घंटा आहे.

शब्दाकंन : रवी गाडेकर