डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाने मराठवाड्याच्या विकासासाठी आधुनिक विचारांची पेरणी केली. मराठवाड्यातील पहिली पिढी केवळ या महाविद्यालयामुळे उच्चशिक्षित झाली आहे. निजाम संस्थानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांना १९५० पर्यंत बंदिस्त केले होते. त्यामुळे महिलांची सामाजिक स्थिती अत्यंत हलाखीची बनली होती. व्यक्तिस्वातंत्र्य या संकल्पनेपासून त्या कमालीच्या दूर होत्या. केवळ उपभोग्य वस्तू यापलीकडे त्यांना फारसे स्थान नव्हते. सामाजिकदृष्ट्या मराठवाडा हा अत्यंत कर्मठ, अंधश्रद्धाळू असा होता. त्यामुळे येथील स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न कधीही अग्रभागी येऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी ‘मिलिंद’च्या विद्यार्थिनींसाठी कॉलेजला येण्या-जाण्यासाठी खास स्टेशन वॅगन विकत घेऊन विद्यार्थिनींची सोय केली होती. ही गोष्ट या भागातील स्त्री शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली.
‘मिलिंद’चे बहुतांश प्राध्यापक ब्रिटिश इंडियातून आलेले होते. प्राचार्य एम. बी. चिटणीस, डॉ. पिंगे, डॉ. रमेश गुप्ते, डॉ. भालचंद्र फडके, डॉ. अग्नी, प्राचार्य मोहगावकर, प्रा. ठकार, प्रा. नरवडे पती-पत्नी, डॉ. चिखलीकर यांसारखी प्राध्यापक मंडळी ब्रिटिश इंडियातून आलेली असल्यामुळे ते उदारमतवादी होते. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व त्यानुसार आचरण स्वातंत्र्याला प्राधान्य देणारी ही मंडळी होती. त्यामुळे महाविद्यालयात या मूल्यांची जोपासना जाणीवपूर्वक केली गेली. ‘मिलिंद’मुळे लिंगभेद, जातिभेद, वर्णभेद, वंशभेद, भाषाभेद या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन सर्व समान आहेत ही शिकवण त्यांच्या आचरणातून या मंडळींनी करून घेतली. कॉलेज पार्लमेंटमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी केलेली चर्चा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्याने, परिसंवाद, सेमिनार प्रश्नोत्तरे व गॅदरिंगमध्ये सादर झालेल्या कलांचा अंतर्भाव या संस्कार प्रक्रियेत होतो. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात प्राचार्य चिटणीसांनी जाणीवपूर्वक हे उपक्रम राबविले होते. म्हणून न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. एकबोटे, जरीवाला, डॉ. त्र्यंबक महाजन आदी विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात यशस्वीपणे वाटचाल केली. लोकशाहीपूरक विचार व आचरणासाठी या महाविद्यालयातील उपक्रमांचा व वातावरणाचा प्रभाव त्या काळामध्ये संपूर्ण मराठवाड्यात पडलेला होता.महाविद्यालय स्थापनेच्या वेळी स्थानिक पुढाऱ्यांनी त्यांची भेट घेतली व जेथे शाळा चांगली चालत नाही, तेथे तुमचे महाविद्यालय कसे चालेल, असे सवाल उपस्थित केले होते. पण बाबासाहेबांनी त्यांना येथे स्वतंत्र विद्यापीठाची गरज असून लवकरच तशी मागणी करावी लागणार असल्याचे सांगितले. ‘मिलिंद’ साठी बाबासाहेबांनी २१६ एकर जमीन विकत घेतली. प्रसंगी कॉलेज उभारणीसाठी हैदराबाद सरकारकडून कर्ज घेतले व २१६ एकरमध्ये जागेत हा शैक्षणिक एल्गार त्यांनी सुरू केला. विकत घेतलेल्या जमिनीत मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा मिळणार नाही, यासाठी
आपण आमच्या स्मशानभूमीचा विचार करावा, अशी विनंती मुस्लिमांनी बाबासाहेबांना केली होती. बाबासाहेबांनी आंबेडकर कॉलेजजवळील मुस्लिम स्मशानभूमीची जागा मोफत देऊन हा प्रश्न मिटविला. आपण विकत घेतलेल्या जमिनीत मुस्लिमांच्या दफनभूमीचा विचार करणाऱ्या बाबासाहेबांच्या औदार्याची प्रचिती येते. येथील माजी विद्यार्थ्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या मूल्यांची रुजवण व्हावी व त्यावर आधारित समाजरचना निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण मराठवाडा आणि भारतभर व्याख्याने देऊन उपक्रम उभे केले. बाबासाहेबांचा विचार पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यातून १९६० नंतर मराठवाड्यात ठिकठिकाणी जे सामाजिक संघर्ष उभे राहिले त्यापाठीमागे या मूल्यांची रुजवण करणे हा एक महत्त्वाचा भाग होता. जातिव्यवस्थेविरुद्ध विद्रोह करणे, भेदाभेदांची संकल्पना नाकारणे व समताधिष्ठित आचरणासाठी आग्रही राहणे हा "मिलिंद'च्या विद्यार्थ्यांचा स्थायीभाव राहिलेला दिसतो. नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या विद्यार्थी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी भीमजयंतीचे कार्यक्रम सुरू केले. ठिकठिकाणी गावातून मिरवणुका काढल्या. गावातील भेदाभेदावर आधारित असलेली परंपरा तोडली व समतेवर आधारलेले विचार व कृतीसाठी वादविवाद केले. त्यातून पारंपरिक समाजव्यवस्था मांडणारे व लोकशाहीपूरक समाजरचना निमार्ण करणारे समाजघटक असे दोन समाज निर्माण झाले व त्यातील संघर्ष या ना त्या कारणाने गावागावात उभा राहिलेला दिसतो. त्यातून नामांतर आंदोलन व नामांतरविरोधी आंदोलन असे दोन गट पडलेले आपल्याला आढळते.
मिलिंद महाविद्यालयातून बाबासाहेब व भगवान बुद्धांच्या शिकवणुकीतून तयार झालेला हा विद्यार्थी सतत जागरूक राहिला. अन्याय-अत्याचाराच्या विरोधात तो जसा भांडत होता तसाच तो या मूल्यांच्या विरोधी असलेल्या परंपरा व मूल्यांच्या विरोधात उभा राहिला. डॉ. म. ना. वानखेडे यांनी या भावभावनेची अभिव्यक्ती साहित्य, कला या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. त्यातून विद्रोही साहित्य व पुढे त्यालाच दलित साहित्य म्हणून ओळखले गेले. याची सुरुवात मिलिंदच्या भित्तीपत्रकातून व "मिलिंद'च्या मॅगझिनमधून झालेली दिसते. प्राचार्य चिटणीसांनी स्वत: दलित बौद्धांच्या जीवनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून नाटक लिहिले. त्यातून युगयात्रेचा जन्म झाला. ही युगयात्रा प्रत्यक्ष बाबासाहेबांनी "मिलिंद'मध्ये पाहिली व तीच युगयात्रा नागपूरच्या धम्मदीक्षेला उपस्थित असलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांनी पाहिली. हा "मिलिंद'च्या इतिहासामध्ये गौरव करावा असा क्षण आहे. पुढे याच महाविद्यालयातून दलित साहित्याची चळवळ जन्मली व ती पुढे पूर्ण भारतात पसरली. त्याचे श्रेय मिलिंद महाविद्यालयालाच जाते.
>लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव आहेत