आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांची खरी गरज आहे ती सवर्णांनाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या मानवी मूल्यांचे महान उपासक होते. या देशातील प्रत्येक समस्येचे मूळ जातीव्यवस्थेत असल्याने जातीअंताची चळवळही त्यांनी मोठ्या निष्ठेंनी चालवली. लोकशाही, धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था हे त्यांचे आदर्श राजकीय मूल्य होते. बाबासाहेबांच्या कार्याचा धांडोळा घेतला तर असे लक्षात येते की, बाबासाहेबांनी माणसाच्या महत्तेस सर्वश्रेष्ठ स्थान दिले. दलितांना ज्या जाती अन धर्मव्यवस्थेने सर्व स्तरीय गुलामगिरीत जखडून ठेवले होते, त्या अमानवी समाजव्यवस्थेतून दलितांना मुक्त करुन बाबासाहेबांना अस्पृश्य समाजाला माणसात आणायचे होते. त्यांच्या सामाजिक समतेच्या झुंजार लढ्यामुळे पूर्वास्पृश्यांना माणुसकीचे हक्कसुद्धा प्राप्त झाले. दलित समाज माणसात आला हे तर खरेच, पण प्रश्न असा की, आपली जातीग्रस्त समाजव्यवस्था नष्ट होऊन जाती धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था अस्तित्वात आली आहे काय? नाही. उलट जातीव्यवस्था अधिकाधिक घट्ट होत चालली आहे. हे आपले खरे समाजवास्तव आहे.
या देशात एकीकडे बाबासाहेबांच्या कार्याचे त्यांनी तयार केलेल्या संविधानाचे गोडवे गायले जातात आणि दुसरीकडे बाबासाहेबांची स्मारके उभारुन त्यांच्या अनुयायांना भावनात्मक राजकारणात अडकविण्याचे षडयंत्र आखतानांचा खेडोपाडी त्यांच्या दलित समाजावर क्रूर अत्याचारही केले जातात. या परस्परविरोधी विसंगतीचा अर्थ काय? तर प्रस्थापित राजकीय नि सामाजिक व्यवस्थेचे बाबासाहेबांवरील प्रेम हा एक दंभाचार जसा असतो तसेच दलित हे मुळात माणूसच नसल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार केलेच पाहिजेत या दलितविरोधी मानसिकतेतून दलित समाजावर अजूनही अत्याचार होत असतात हे उघड आहे. दलित स्वाभिमानाने जगतात, शिक्षण घेतात गावकीची कामे नाकारतात, बाबासाहेबांची जयंती साजरी करतात, चांगले राहतात म्हणजे गुन्हाच करतात, दलित आता माजलेत त्यांचे आरक्षण बंद करुन त्यांना धडा शिकवला पाहिजे, अशा हिंस्त्र, हिणकस नि असंस्कृत मानसिकतेतून सवर्ण आजही देशभर दलित समाजावर जोर- जुलूम अन्याय अत्याचार करीत असतात. असे अत्याचार करताना लाज कोळून प्यायलेल्या समाजव्यवस्थेला शरम वाटणे तर सोडाच सोडा पण साधी खंतही वाटत नाही. हे आपले खरे दलित द्वेष्टे समाजवैशिष्ट्य आहे. बाबासाहेबांची दलिताना गरज आहे हे तर खरेच पण जी अमानुष जातीग्रस्त समाजव्यवस्था नि सवर्ण मानसिकता दलितांचे माणूसपण नाकारुन दलित समाजावर अजूनही अत्याचार करते त्या सवर्ण समाजाला माणुसकी शिकवण्यासाठी व त्यांना माणूस करण्यासाठी बाबासाहेबांच्या प्रगत सामाजिक विचारांची गरज जास्त अाहे, असे वाटते. जग एकीकडे चंद्रावर, मंगळावर, शनीवर जाण्याचे वैज्ञानिक प्रयोग करत असताना स्त्रियांना हीन आणि तुच्छ लेखून काही देवालयातून दर्शन नाकारते त्या मनुग्रस्त मनाच्या समाजाला बाबासाहेबांच्या विचारांची खरी गरज आहे, असे म्हटल्यास गैर ठरु नये.
दलित हे माणूसच नाहीत ही वर्णवर्चस्ववादी भावना समाजात इतकी काही खोलवर घट्ट रुजली आहे की, दलित समाजाला आज कोणी मित्रच राहिलेला नाही. दलित समाज सामाजिक हक्कांची भाषा बोलतो म्हणून त्याला चिरडलेच पाहिजे अशा दलित विरोधी मानसिकतेतून दुष्टाव्याचे वर्तन येथील बहुसंख्याक समाज दलिताशी करतो . तीस चाळीस वर्षापूर्वी दित समाजावर अत्याचार झाले तर समाजवादी, गांधीवादी मंडळी दलितांचे अश्रू पुसण्यासाठी खेडोपाडी धावत येत असत.
यशवंतराव चव्हाण आणि समाजवादी मंडळींनी सामाजिक अभिसरणासाठी सामाजिक समता परिषदांचे आयोजन केले होते. पु. ल. देशपांडे, कवी कुसुमाग्रज, शरद पवार, एस. एम. जोशी, भाई माधवराव बागल, बाबा आढाव कॉॅ. शरद पाटील, बापू काळदाते, निळू फुले, डॉ. कुमार सप्तर्षी यासारखी मंडळी दलितांच्या बाजूने उभी राहिलेली महाराष्ट्राने पाहिली. नामांतर आंदोलनात दलितेतरांचाही सहभाग होता. पण दलित-दलितेतर संवादाची परंपराच आता खंडीत झालेली असल्यामुळे दलित समाज एकाकी पडला असून तो अन्याय अत्याचारांचा शिकार ठरत आहे. बाबासाहेबांचे समता, स्वातंत्र्य नि बंधुभावाचे विचार खेडोपाडी तळागाळातील सवर्ण समाजता रुजविण्याची खरी जबाबदारी म्हणूनच दलितेतर पुरोगामी वर्गाची आहे. दलितांनी बाबासाहेब सांगून काय उपयोग नाही. तर दलितेतर लेखक, कलावंत, विचारवंतांनी बाबासाहेब सवर्ण मानसिकतेतत रुजविणे व दलितांचा मित्र म्हणून स्वीकार केला तरच सामाजिक परिवर्तनाला गती येऊ शकेल हे उघड आहे.
दलित समाजाला सामाजिक न्याय देणे ही बहुसंख्याक हिंदू समाजाची जशी नैतिक जबाबदारी आहे त्याचप्रमाणे दलितांनीही दलितेतर पुरोगामी मंडळीवर विश्वास टाकणे हेही त्यांचे कर्तव्य आहे. दलितांच्या बाजूने जही सुधारणावादी मंडळी उभी राहात आली त्यांच्या हेतूवरच संशय घेतला गेला. दलित पुढाऱ्यांनी दलितेतरांच्या सहभागाविषयी खरे-खोटे आक्षेप घेणे समजू शकते. कारण त्यांना आपल्या राजकीय दुकानदाऱ्या सांभाळायच्या असतात. पण दलित समाजातील सुजाण वर्गही जेव्हा दलिततेरांच्या सहभागाकडे काकदृष्टीने पाहतो तेव्हा दलित-दलितेतर संवाद साधण्यात अडथळेच येतात.
बाबासाहेबांना दलित-शोषितांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व्यापक राजकारण करणारा रिपब्लिकन पक्ष हवा होता. पण तसे झाले नाही. ओबीसी, अल्पसंख्याक आणि अन्य दलित जातींना निळ्या झेंड्याखाली आणण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. आता तर काहींनी दलित शब्दाला विरोध करुन बौद्ध म्हणा अशी टूम काढली आहे. खरे तर दलित म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या दडपला गेलेला वर्ग. दलित शब्दाला विरोध करणे याचा अर्थ इतर मागास वर्गांना दूर लोटणे होय. अशा संकुचित वृत्तीमुळे बौद्ध समाज एकाकी पडला आहे. बाबासाहेबांची लोकशाही धर्मनिरपेक्षता आज धोक्यात आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे.

रोहित वेमुलाचा यातूनच बळी गेला आहे. दलितांच्या जीवन-मरणाचे प्रश्न उग्र होत आहेत. अशा स्थितीत बाबासाहेबांचा देव करुन त्यांच्या विचारांकडे आम्ही दुर्लक्ष करीत आहोत. तात्पर्य, समग्र सामाजिक परिवर्तनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची दलित समाजाला जशी गरज आहे तशीच ती सवर्ण समाजालासुद्धा आहे. बाबासाहेबांच्या जयंतीचा हाच खरा अर्थ आहे. बाबासाहेबांच्या स्मृतीस प्रणाम!
बातम्या आणखी आहेत...