आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Work For Maharashtra, News In Marathi

बाळासाहेब म्‍हणजे सर्व सामान्यांचा पांडुरंगच! तळमळ सर्वांना आदर्श ठरणारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष 2004 मध्ये अर्जुन खोतकर प्रथमच जालन्याचे आमदार झाले तेव्हा उपनगराध्यक्ष राजेश राऊत त्यांच्यासोबत शिवसेनाप्रमुखांना मातोश्रीवर भेटण्यासाठी गेले होते. वर्ष 2007 मध्ये कल्पना लाहोटी यांची नगराध्यक्षा, तर माझी उपनगराध्यक्षपदी निवड झाली तेव्हा भेट झाली होती. या वेळी जनतेने दिलेला विश्वास सार्थ करून लोकांना न्याय मिळवून द्या, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. शिवसैनिकांसह सामान्य माणसाबद्दलची त्यांची तळमळ सर्वांना आदर्श ठरणारी आहे.

प्रथम भेट अविस्मरणीय
जालना नगरपालिकेची नगराध्यक्षा म्हणून निवड झाल्यावर कल्पना लाहोटी प्रथमच मातोश्रीवर बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचल्या. त्या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी चोथे, तत्कालीन आमदार अर्जुन खोतकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, सुनील लाहोटी सोबत होते. एक महिला नगराध्यक्षा या नात्याने जालना शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न लवकर सोडवा, असे त्यांनी नगराध्यक्षांना म्हटले होते.

डोळ्यांसमोर शिवसेनाप्रमुख उभे राहिले
प्रथमच लढलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने विश्वास टाकून 22 आॅक्टोबर 2009 रोजी भरघोस मतांनी निवडून दिले आणि मी (संतोष सांबरे) आमदार झाल्याची घोषणा झाली. त्या वेळी डोळ्यांसमोर शिवसेनाप्रमुख उभे राहिले आणि आपण धन्य झाल्याचे शब्द पुटपुटलो. दुस-याच दिवशी सहकुटुंब मुंबई गाठली आणि मातोश्रीवर पोहोचलो. शिवसेनेचा जालना जिल्ह्यातून एकमेव आमदार झाल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांनी जवळ घेतले आणि खांद्यावर हात ठेवून जनतेचा विश्वास सार्थ करा, असे आशीर्वाद दिले.

अर्ध्या तासाची भेट अविस्मरणीय ठरली
1999 मध्ये राज्यातील सत्तेवरून भाजप-शिवसेना युतीला पायउतार व्हावे लागले. पण त्या निवडणुकीत मी (गोविंद केंद्रे, माजी आमदार) उदगीर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार झालो. त्या वेळी युतीच्या सर्व आमदारांना मुंबईत हॉटेल ताजमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत स्नेहभोजनही ठेवण्यात आले होते. जवळपास अर्धा तास आम्ही त्यांच्या सान्निध्यात होतो. बाळासाहेबांविषयी ऐकून होतो, पण प्रत्यक्ष भेटून प्रभावित झालो. माझ्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून मी आजही त्यांना पाहतो. ही भेट अविस्मरणीय ठरली.

कदम यांचा पराभव; इतिहास घडवला
शिवसेनेने मराठवाड्यात पहिल्यांदा 1990 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत नांदेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार डॉ. डी. आर. देशमुख यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचा पराभव करून इतिहास घडवला. त्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेची लाट निर्माण झाली. जिल्हाप्रमुख असलेल्या रोहिदास चव्हाण यांनी जिल्हाभर फिरून 900 शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या. गाव तिथे सेनेची शाखा उघडण्यात आली.

पहिली नगरपालिका शिवसेनेने जिंकली
औरंगाबाद महापालिकेवर भगवा फडकल्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती न करता नांदेड जिल्ह्यातील उमरी नगरपालिका संजय कुलकर्णी या युवकाच्या नेतृत्वाखाली डिसेंबर 1991 मध्ये लढवली. 25 पैकी 17 जागा जिंकून माजी आमदार बाबासाहेब गोरठेकरांना धक्का देत शिवसेनेने मराठवाड्यातील पहिली नगरपालिका स्वबळावर ताब्यात घेतली.

ओजस्वी भाषणाने भारावले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 1990 मध्ये पहिल्यांदाच नांदेड येथील इंदिरा गांधी मैदानावर लाखाची जाहीर सभा झाली. त्यांच्या ओजस्वी भाषणाने भारावून अनेक तरुणांनी गावागावांत जाऊन शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या. ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणेने आसमंत दणाणून जात. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे तुफान काँग्रेसला धडकी भरवणारे होते.

‘मैद्याचं पोतं’
हिंगोलीत रामलीला मैदानावर उमेदवार विलास गुंडेवार यांच्या प्रचारार्थ मे 1991 मध्ये सभा झाली होती. या वेळी त्यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘मैद्याचं पोतं’ असा करून शरद पवारांवर प्रखर व व्यंगात्मक टीका केली याची आठवण आज हिंगोलीतील शिवसैनिकांना होत आहे. हिंगोली जिल्ह्याने शिवसेनेला तीन वेळेस खासदार दिले. याशिवाय कळमनुरी आणि वसमत विधानसभेत प्रत्येकी दोनदा आमदारही निवडून आले. बाळासाहेबांना अपेक्षित असा कडवा शिवसैनिक हिंगोलीत घडला. शिवसेना सोडल्यानंतर हिंगोलीत आलेल्या छगन भुजबळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न कडव्या शिवसैनिकांनी केला होता.
शेतकरी संघटनेच्या बेडकांनो, खबरदार!
1998 मध्ये नांदेड येथे शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा झाला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून मेळावा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे भाषण थांबवून बाळासाहेबांनी ‘शेतकरी संघटनेच्या बेडकांनो, खबरदार! जर धिंगाणा कराल तर घरी वापस जाणार नाही,’ असा दम देताच शिवसैनिक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर तुटून पडले व संघटनेच्या कार्यकर्त्यांना पळवून लावले.