आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

क्रीडा हृदयसम्राट, बाळासाहेब ठाकरे..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब मराठी खेळाडूंच्या पाठीशी कायम राहिले. भलेही त्या संघटनेवर शरद पवार असो वा अजित पवार.. त्यांच्या मराठमोळ्या खेळावरचे प्रेम सांगताना माजी राष्ट्रीय खेळाडू विकास पवार, दीपक राणे, महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह मोहन भावसार, कबड्डीचे प्रशिक्षक संदीप पायगुडे आजही सद्गदित होतात.
1992-93 मध्ये महापौर चषक खो-खो स्पर्धा सुरू होती. मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत प्रचंड गर्दी होती. उपांत्य फेरीचा सामना ऐन रंगात आलेला होता आणि मैदानावर अचानक बाळासाहेबांची एंट्री झाली. पांढराशुभ्र वेश परिधान केलेला, पायात त्याच रंगाची चप्पल आणि अंगाभोवती ती भगवी शाल...अशा वेशात बाळासाहेब मैदानावर आले. त्यांचे खो-खोप्रेम तर वादातीत होते. महापौर चषक स्पर्धा सुरू होती त्या वेळी महापौर काँग्रेसचा (चंद्रकांत हंडोरे) होता. ‘मातोश्री’कडे जात असताना त्यांना ‘खो’चा आवाज आला आणि तडक ड्रायव्हरला सांगितले, गाडी थांबवा. बाळासाहेब गणपती मंदिरापासून शिवाजी पार्कपर्यंत 500 मीटर पायी आले. सोबत दोन बॉडीगार्ड. सगळे प्रेक्षक अवाक् होत रांगेत उभे राहिले. मात्र, कोणत्याही मानमरातबाची अपेक्षा न करता बाळासाहेब थेट प्रेक्षकांत जाऊन बसले. महापौर कोणत्या पक्षाचा याला त्यांच्या लेखी काहीएक महत्त्व नव्हते. होते ते फक्त क्रीडाप्रेम. इकडे चंद्रकांत हंडोरेंना समजले, तसे ते सगळी कामे टाकून धावत मैदानावर बाळासाहेबांकडे आले. त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली; पण बाळासाहेबांनी स्पष्ट नकार दिला. ‘मी प्रेक्षक म्हणून आलेलो आहे, पाहुणा म्हणून नाही,’ असे आपल्या खास शैलीत सांगत त्यांनी तेथेच बसून सामना पाहिला. माजी राष्ट्रीय खेळाडू दीपक राणे (नारायण राणे यांचे चुलत बंधू) यांनी अनुभवलेले बाळासाहेबांचे हे खो-खोप्रेम अविस्मरणीय होते. कारण दीपक राणेंचाच युवक संघ त्या वेळी सेमीफायनल खेळत होता.

दातृत्वशील, करारी बाळासाहेब
मुंबईचा पहिल्या महापौरपदाचा मान मनोहर जोशी यांना मिळाला. महापौर चषक कबड्डी स्पर्धा बाळासाहेबांच्याच पाठींब्याने जोमाने सुरू झाली. त्या वेळी महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह कबड्डीमहर्षी बुवा साळवी होते. बुवा साळवींचेच बंधू दत्ताजी साळवी शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक होते. खेळाडूंसाठी क्रीडांगणे-होस्टेल्स हवीत, असे बाळासाहेबांनी आपल्या भाषणात ठासून सांगितले होते. त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्र कबड्डी संघटनेला 5 लाख रुपयांची देणगीही जाहीर केली. बाळासाहेबांच्या पाठींब्यानेच 1997 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या सरकारच्या कार्यकाळात शिवशाही चषक कबड्डी स्पर्धा सुरू झाली. आज या स्पर्धेला 14 वर्षे पूर्ण झाली. जिथे जिथे शिवसेना तिथे तिथे कबड्डीचे खेळाडू हमखास शिवसेनेत असायचे, असे महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह मोहन भावसार यांनी सांगितले.

महाराष्ट्रकन्या कोट्यधीश!
मराठमोळ्या खेळाडूंवरील अन्याय त्यांनी कधीही खपवून घेतला नाही याचा अनुभव अलीकडेच महिला कबड्डी संघाच्या खेळाडूंना आला. यंदाच्या जागतिक कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावणा-या भारतीय संघातील महाराष्ट्रकन्या दीपिका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे यांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली असली तरी ती घोषणा करण्यास भाग पाडणारे बाळासाहेब होते. ‘पुरे झाले क्रिकेटचे लाड, इतर खेळांकडेही लक्ष द्या आणि आमच्या कबड्डीपटूंना कोट्यधीश करा,’ असे खडे बोल बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले होते. मराठमोळ्या खेळात एवढी घसघशीत रक्कम मिळवणा-या या पहिल्या तीन महिला खेळाडू ठरल्या.

‘प्रबोधन’चे मैदान जिवंत केले
गोरेगावात प्रबोधन संस्थेच्या क्रीडा भवनाचे उद्घाटन 21 नोव्हेंबर 1991 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच हस्ते झाले. मुंबईचे माजी राष्ट्रीय खेळाडू विकास पवार यांना बाळासाहेबांची एक आठवण अजूनही स्मरणात आहे. ‘गोरेगावचा खो-खो बाळासाहेबांनीच जिवंत ठेवला. आजही हे मैदान उत्तम आहे ते केवळ बाळासाहेबांमुळेच.’

बाळासाहेबांची गोरेगावातच एक सभा होती. 1997-98 चा काळ असेल. तसा संस्थेचा आणि बाळासाहेबांचा घरोबा जुनाच. सभेच्या निमित्ताने बाळासाहेब आवर्जून मैदानाला भेट द्यायला आले. त्या वेळी खो-खोचा सराव सुरूच होता. ‘काय, कसं चाललंय? सराव चालू आहे ना...?’ या शब्दांनी बाळासाहेबांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्या वेळी विकास पवारच नव्हे, तर संपूर्ण खो-खोचे मैदान भरून पावले. बाळासाहेब निघून गेले; पण मैदान अजूनही त्यांच्या या खुशालीच्या शब्दांवर जिवंत राहिले.

या मराठमोळ्या खेळातून चांगले निष्ठावान शिवसैनिकही बाळासाहेबांना लाभले, ज्यात राष्ट्रीय खेळाडू शशांक कामत यांचाही समावेश आहे.
शब्दांकन- महेश पठाडे