आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८० वर्षांच्या डॉक्टरचा गायीच्या तस्करांशी लढा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. साधना राव, शल्यचिकित्सक
वय- - जवळपास ८० वर्षे
शिक्षण - एमबीबीएस, एमएस
चर्चेत का? - कत्तलखान्यांच्या धमक्यांना न जुमानता गायींची सुटका करून त्यांचे रक्षण करतात.

चेन्नईमध्ये काही लोक दिवसभर रस्त्यावर भटकणाऱ्या गायींवर पाळत ठेवतात आणि रात्र होताच त्यांना पकडून एका वाहनात घालून कत्तलखान्यात नेतात. डॉ. साधना यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सहा महिने या लोकांचा पिच्छा केला. त्यासाठी वेशांतर केले, बुरखा घातला आणि पोलिसांची मदतही घेतली. त्यांच्या या प्रयत्नातून एके दिवशी अनेक गायी तस्करांच्या तावडीतून सोडवल्या. कत्तलखान्यांकडून त्यांना धमक्याही मिळाल्या. मात्र, ८० वर्षांच्या या महिलेने हार मानली नाही. गेल्या ४२ वर्षांपासून त्या हेच काम करतात. त्या ब्रिटनमध्ये शल्यचिकित्सक होत्या, गायींसाठी नोकरी सोडून भारतात आल्या. इथे नीलंगरायमध्ये गोशाळा सुरू केली. सहा गायींपासून गोशाळेची सुरुवात केली. आता तिथे ५८३ गायी आहेत. त्यापैकी ५५ कमकुवत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल वेल्फेअर नावाने त्यांनी आपली संस्था सुरू केली तेव्हा त्यांना स्थानिक नागरिकांनी गायीच्या शेणामुळे आजार होईल, अशी भीती दाखवली. मात्र, डॉक्टर असल्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवले.

पुद्दुचेरीच्या अरविंदो आश्रमातील मदरपासून त्यांना खूप प्रेरणा मिळाली. आंब्याचे एक झाड सुकू लागले होते. ते कापले जाणार होते. ही माहिती त्यंानी मदरला दिली. त्या झाडाखाली आल्या आणि डोळे बंद करून म्हटले की, झाड तोडले जाणार नाही, काही दिवसांनंतर फळ लागेल. झालेही तसेच. वठलेल्या झाडाला पालवी फुटली आणि पुढे फळे लगडली. यातूनच साधना यांना प्रेरणा मिळाली. त्यांना काश्मिरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. मात्र, कुटुंबाचे अनेक वर्षांपूर्वी तामिळनाडूत स्थलांतर झाले होते. त्यांचे आजोबा महात्मा गांधींचे सचिव होते आणि त्यांच्या कुटुंबाने विनोबांच्या भूदान चळवळीत ४० गावांतील जमीन दान केली होती. त्यांनी गोशाळेच्या खर्चासाठी आपले दागिनेही विकले. काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या तक्रारीमुळे चेन्नई महापालिकेने त्यांची गोशाळा थिरुवल्लूर जिल्ह्याच्या उथुकोट्टाईमध्ये हलवण्यास सांगितले. यामुळे गोशाळेचा खर्च वाढला. पशुखाद्य देणाऱ्यांची ११ लाख रुपये बाकी राहिली. मात्र, डाॅ. साधना याही स्थितीत डगमगल्या नाहीत. त्यानंतरही त्या कर्जाशिवाय गोशाळा चालवत आहेत.
बातम्या आणखी आहेत...