आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगळं करा, असामान्य व्हा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच मला चेन्नई येथील लीला पॅलेसमध्ये मुक्कामाची संधी मिळाली. हॉटेलचे संस्थापक कॅप्टन सी. पी. कृष्णन नायर यांच्याविषयी ऐकून होतो. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी हॉटेल सुरू केले. कुतूहलापोटी त्यांच्याविषयी वाचण्याचा विचार मनात आला. जे वाचले ते थक्क करणारे होते. कॅप्टन नायर यांचा जन्म 1923 मध्ये केरळ येथील अतिशय सामान्य, अभावग्रस्त कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील ब्रिटिश राजवटीत बिल कलेक्टर होते. अत्यंत कमी पगार. आईच्या नावे दोन एकर जमिनीचा तुकडा होता. नायर यांना आठ भाऊ-बहिणी. उच्च माध्यमिक शिक्षण घेताना एकदा चिराक्कलचे राजे वलिया 700 शाळकरी मुलांना संबोधित करण्यासाठी आले होते. शाळा महाराजांचीच होती. त्यांच्या रूपाने नायर यांनी पहिल्यांदा इतके नीटनेटके कपडे घातलेला माणूस पाहिला. ज्या पद्धतीने त्यांनी मुलांशी संवाद साधला, त्याचा नायर यांचावर मोठा प्रभाव पडला. त्यांनी भाषण ऐकतानाच माणसाच्या अफाट शक्यतेविषयी मनातल्या मनात कविता रचली.

वलिया यांचे भाषण संपताच नायर मंचावर पोहोचले व कविता ऐकवली. कवितेचा अर्थ असा होता- हजारो सूर्य आणि चंद्र एकत्र येण्याने ब्रह्मांडावर जो प्रभाव पडेल, तो आमच्यावर तुमच्यामुळे पडला आहे. आम्ही तुमची पूजा बांधतो. तुम्ही आम्हाला विद्या दिली, ती सर्वांत समृद्ध आहे. याचे दान जो देतो, तो जगात सगळ्यात मोठा असतो. राजा किंवा व्यापारी मोठा नसतो.

कविता संपल्यानंतर नायर म्हणाले, शिकून-सवरून आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढू. महाराजा वलिया यांनी या मुलाचे नाव विचारले आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नायर ब्रिटिश सेनेत दाखल झाले. स्वातंत्र्यानंतरही सेनेतच राहिले. 1952मध्ये त्यांनी सेवा सोडली. त्यानंतर सास-यांना कापड गिरणीच्या कामात मदत करू लागले. त्या वेळी गिरणी तोट्यात होती. नायर यांनी आव्हानांचा मुकाबला केला. गिरणी तोट्यातून बाहेर काढले. इतकेच नव्हे, तर यशाच्या मोठ्या उंचीवरही नेले.