आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घायुषी व्हा, पण निर्भय होऊन जगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीर्घायुषी व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते. ‘शतायुषी हो, दीर्घायुषी हो, चिरायू हो’ अशा शुभेच्छा आपण परस्परांना देतो. दीर्घायुष्य किंवा अमरत्व मिळेल, असे औषध आयुर्वेदाचार्य शतकानुशतकांपासून शोधत आहेत. खरोखरच जर शंभरी गाठली, तर त्या वेळी गती काय असेल, याची कधी कल्पना केली का? पंचेंद्रियांनी काम करणे थांबवले असेल, शरीरातील इतर अवयवांनी काम कमी केले असेल. सोबतच्या सर्वांनी कधीचाच इहलोकीचा निरोप घेतला असेल आणि शंभरी पार केलेली ही व्यक्ती नव्या पिढीत एकटीच उरेल.


मानवाच्या इच्छा कधीच पूर्ण होत नसल्याने दीर्घायुषी होण्याचा त्याचा प्रयत्न सतत सुरू असतो. इच्छा पूर्ण होणारच नाहीत, वयाच्या शंभरीनंतरही नाहीत. कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांनी माणसाचे आयुष्य वाढवू शकेल, असे एक नवे गुणसूत्र नुकतेच शोधून काढले आहे. फक्त दीर्घायुष्यच नव्हे तर हे गुणसूत्र तारुण्यही प्रदान करेल. या गुणसूत्राला त्यांनी ‘डोरियन ग्रे’ असे नाव दिले आहे. ही बातमी वाचून अनेकांच्या इच्छांना धुमारे फुटले असतील. काहीही करून हे गुणसूत्र आपल्या शरीरात टोचून घ्यावे असे त्यांना वाटत असेल. समजा, या गुणसूत्राचे इंजेक्शन तयार झाले आणि ते टोचून घेणा-यांना प्रदीर्घ आयुष्य मिळाले, तरी कधी ना कधी तर मरण येणारच!


म्हणून, किती वर्षे जगायचे हा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्न असा आहे की, कसे जगायचे. आपल्या जगण्याचा दर्जा काय आहे. आत्मसुख मिळवून शांत आणि आनंदी जीवन हवे. जोपर्यंत मृत्यूच्या भयावर विजय मिळवत नाही तोेपर्यंत जीवनाचा खरा अर्थच गवसत नाही. याउलट आयुष्य जेवढे दीर्घ असते, तेवढे जास्त दिवस मृत्यूची तलवार डोक्यावर लटकत असते. जोपर्यंत मृत्यूचा खरा अर्थ समजणार नाही, तोपर्यंत हे लक्षातच येत नाही की, मृत्यू हा फक्त शरीराचा होत असतो, आत्म्याचा नव्हे. आयुष्य हे प्रत्यक्षात आयुष्य नसून, ती मृत्यूची प्रदीर्घ प्रतीक्षा आहे. असे आयुष्य प्रदीर्घ असले तरी त्याचा काय फायदा? प्रदीर्घ आयुष्याचा एकच उपयोग आहे, ध्यानसाधना करा. स्वत:चा शोध घ्या. मृत्यूच्या भयातून कायमस्वरूपी मुक्त व्हा. म्हणून दीर्घायुष्यासाठी नव्हे तर निर्भय आयुष्यासाठी प्रार्थना करा.