आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beed Collector Sunil Kendrekar And Maharashrtra Politics

बीडच्या राजकारणात दुष्काळाचा ‘दबंग’ महिना!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडचा बिहार झालाय, ही प्रशासकीय यंत्रणेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचलेली ख्याती बीडकरांची सातत्याने बदनामीच करत गेली. यातच राज्याचं राजकारण केंद्रित होत असलेल्या बीड जिल्ह्याला यंदा निसर्गाच्या दुष्टचक्राचाही सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींची कसोटी पाहणार्‍या आणि शासन, जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा असलेल्या यंत्रणेत महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या जिल्हाधिकार्‍यांभोवतीच दुष्काळात तेरावा महिना म्हणून उभे राहिलेल्या राजकारणाने फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा चांगलाच घेरला. जनतेची नाळ ओळखून त्यांच्या अडचणी सोडवणारा, शासनाच्या योजनांचा खरोखर जनतेलाच लाभ होण्यासाठी पुढार्‍यांशी वैर पत्करणारे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर बीडकरांसाठीच नव्हे तर थेट मुंबईपर्यंत दबंग ठरले !
बीडचं राजकारण देशात सर्वश्रुत आहे. परंतु राजकारणी मंडळींचा प्रशासकीय यंत्रणेला पडलेला घेरा किती अस्तित्वाचा होऊन बसतो, याची प्रचिती यानिमित्ताने आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, आमदारांनी हाती घेतलेली जिल्हाधिकारी हटाव मोहीम शेवटी त्यांच्याच अंगलट आली. दबंग जिल्हाधिकारी अशी अवघ्या आठ महिन्यांत ओळख निर्माण करणारे सुनील केंद्रेकर नेदरलँडला प्रशिक्षण दौर्‍यावर गेले. चार जानेवारीला गेलेले केंद्रेकर बारा जानेवारीला महाराष्ट्रात पोहोचले. वैद्यकीय तपासणी करून ते बीडला रुजू होणार होते. मात्र केंद्रेकर नेदरलँड प्रशिक्षण आटोपून परतण्याआधीच त्यांनी पुन्हा बीडला रुजू होऊ नये आणि अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडेच पदभार राहावा, यासाठी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, आष्टीचे आमदार सुरेश धस, गेवराईचे विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांच्यासह अन्य आमदारांनी नियोजनबद्ध आखणी सुरू केली. सुरुवातीला या नेत्यांसह इतरांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन केंद्रेकरांना दुष्काळी स्थितीचे गांभीर्य नाही, जनतेचे हाल त्यांच्यामुळेच सुरू आहेत, त्यामुळे त्यांना बीडहून हटवा, अशी मागणी केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी बदलीला चक्क नकार देत या नेत्यांना परत पाठवले. यावरही पिच्छा न सोडता पुढार्‍यांनी दिल्ली गाठली, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचून गाºहाणे मांडले, तेथेही उपयोग झाला नाही. अखेर या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेवटचे अस्त्र बाहेर काढले. अजित पवारांना भेटून गळ घातली. पवारांनीही मुख्यमंत्र्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवला आणि जिल्हाधिकारी केंद्रेकरांना बीडला रुजू होऊ नका, असा संदेश मुख्यमंत्र्यांकडून मिळाला. हा संदेश बीडमध्ये पोहोचताच बीडच्या जनतेत उद्रेकाची भावना सुरू झाली. पत्रकार भवनात बैठक झाली. त्यानंतर दुसर्‍या दिवशीपासून पत्रकार, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस सोडून) आणि जनता रस्त्यावर उतरली. जनतेतील कलेक्टर आहे, त्यांना हटवू नका, या मागणीचा रेटा वाढला. जनरेट्यापुढे चार दिवस सरकारही गोंधळून गेले. हा उद्रेक एवढा व्यापक होईल, हे कोणाच्याही सुरुवातीला लक्षात आले नाही. परंतु जेव्हा वृत्तपत्रांसोबतच वाहिन्यांवरही कलेक्टरच्या पाठीशी जनता खंबीर उभी राहिली आहे, दबंग कलेक्टर हटवू नका याविषयी बातम्या सुरू झाल्या, तेव्हा बीडपासून मुंबई, दिल्लीपर्यंत चर्चा सुरू झाली. त्यामुळे बीडच काय, सहा जिल्ह्यांमधील आमदारांनी सुनील केंद्रेकर यांना आमच्या जिल्ह्यात पाठवा, अशी मागणी सुरू केली. जनतेच्या आंदोलनात घुसलेल्या भाजप, काँग्रेस, शिवसेना व मनसे या विरोधी पक्षांमुळे राष्ट्रवादीचे नेतेही हमरीतुमरीवर आले. आमदार सुरेश धस यांनी ‘हो, आम्हीच केंद्रेकरांना हटवण्याची मागणी केली, त्यांना दुष्काळाचे गांभीर्य नाही,’ अशी एकदाची कबुली देऊन टाकली. तत्पूर्वीच आमदार अमरसिंह पंडित यांनी वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कलेक्टरची तक्रारच केली नसल्याचे ठासून सांगितले होते, तेही दुसर्‍याच दिवशी उघडे पडले. आंदोलनाचा रेटा वाढत गेल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठिया यांनी अखेर जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना मुंबईला बोलावून घेतले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दोन तास चर्चा झाली, जिल्हाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अखेर त्यांचा बीडला येण्याचा रस्ता मोकळा झाला. एखाद्या अधिकार्‍यासाठी बीडसारख्या बिहार म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्ह्यातील जनता गावोगावी रस्त्यावर उतरलेली पाहून केंद्रेकरांना मंत्रालयातही लोक निरखून पाहू लागले. यातून बीडची प्रतिमा उजळण्यास मदत झाली, एवढेच नाही तर बीडची जनता सच्चा अधिकार्‍याच्या पाठीशी किती खंबीर उभी राहते, याचा संदेशही प्रशासकीय अधिकार्‍यांत तेवढ्याच ताकदीने पोहोचला. राजपत्रित अधिकारी संघटनाही केंद्रेकरांच्या पाठीशी उभी राहिली.

बीडमध्ये झाले जंगी स्वागत
यानंतर 24 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर सपत्नीक औरंगाबादहून बीडला आले. बीडची जनता केंद्रेकरांच्या भेटीसाठी आतुर झाली होती. जिल्हाधिकारी निवासस्थानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दुपारी एक वाजता जिल्हाधिकार्‍यांचे आगमन होताच एकच गर्दी उसळली. कलेक्टरच्या बंगल्यासमोर देवदर्शनासारख्या रांगा लागल्या. रांगेतच प्रत्येक जण जाऊन कलेक्टरच्या पाया पडून आनंद व्यक्त करू लागला. जनतेच्या डोळ्यांतील आसू पाहून कठोर मनाचे आणि धीरोदात्तपणे कार्यरत असलेल्या सुनील केंद्रेकरांच्या डोळ्यातही
पाणी तरळले ! जनरेट्यापुढे हार पत्करलेले नेते मात्र या वेळी हजर नव्हते. बीडच्या जनतेचे प्रेम पाहून केंद्रेकर दांपत्यही भारावून गेले. जनतेच्या भावनेचा आदर करतानाच त्याला कुठेही राजकारणाची झालर लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत जिल्हाधिकारी केंद्रेकरांनी ‘आता मला दुष्काळ निवारणाचे काम करू द्या ! ’ एवढे सूचक विधान केले आणि दुसर्‍या दिवशीपासून जनतेत मिसळून कामही सुरू केले. तक्रार केल्याचा गवगवा झालेले आमदार
सुरेश धस, अमरसिंह पंडित यांनी स्वतंत्र भेटी घेऊन गेवराई, आष्टी मतदारसंघातील टंचाई निवारणाची कामेही मार्गी लावून घेतली.