आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक घोटाळ्यातील फरार पुढा-यांचे दुर्गेला साकडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँक घोटाळ्यातील फरार पुढा-यांचे दुर्गेला साकडे!
मुकुंद कुलकर्णी, बीड
निवडणूक जिंकण्यापूर्वी सर्वच पक्षांतील गोतावळा एकत्र आणून जिल्हा बँक ताब्यात घेणा-या पुढा-यांमध्येच नंतरच्या काहीच वर्षांत पक्षीय राजकारणातील फाटाफुटीनंतर बेबनाव निर्माण झाला. पराकोटीला पोहोचलेल्या मतभेदानंतर मागील वर्षी एकदमच सुखद स्थितीत असलेल्या बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या ठेवींची लावलेली विल्हेवाट आणि आर्थिक घोटाळ चव्हाट्यावर आला. जिल्ह्याचे राजकारणच जिल्हा बँकेभोवती केंद्रित झाले आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत गेल्या. एक-दुस-याला आरोपींच्या पिंज-यात उभे करणा-या भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांविरुद्धच व्यक्तिगत आणि सामुदायिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होताच राज्यभर खळबळ उडाली आणि नवरात्रीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी फरार होत माता दुर्गादेवीला साकडे घालत फिरू लागले !


बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मागील तीन वर्षांपूर्वी अमरसिंह पंडित, मंगलताई मोरे, राजाभाऊ मुंडे, सुभाष सारडा आणि त्यापाठोपाठ तत्कालीन भाजपचे अमरसिंह पंडित यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा आली. पाच वर्षांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र होऊन महायुती केली आणि निवडणूक जिंकलीदेखील. संचालक झाल्यानंतर सहकारच्या नियमानुसार प्रत्येक संचालकाने बँकेतील ब-या-वाईट निर्णयास मी व्यक्तिगत, सामुदायिक जबाबदार असेल, असे शपथपत्र सादरही केले. मात्र, ‘जिसके हाथ में लाठी उसकी भैस !’ या नीतीने वागण्याला सुरुवात झाली. महायुतीने बँक ताब्यात घेतली, तेव्हा बँकेत 695 कोटींच्या ठेवी होत्या. यात सुमारे अडीचशे कोटींच्या ठेवी सर्वसामान्यांच्या होत्या. सुरुवातीला अमरसिंह पंडित यांच्या काळात बँकेची स्थिती सुधारलीदेखील. बँकेच्या ठेवी बाराशे कोटींपर्यंत पोहोचल्या. यातील सुमारे 950 कोटींच्या ठेवी सामान्यांच्या होत्या. शेतक-यांची बँक अशी ओळख असलेल्या या बँकेमार्फत शेतक-यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी कर्ज योजना सुरू झाली. याचदरम्यान रिझर्व्ह बँकेकडून जिल्हा बँकेला परवानादेखील प्राप्त झाला. परवाना मिळविणारी बीड जिल्हा बँक मराठवाड्यातील एकमेव ठरली. नांदेड, उस्मानाबाद जिल्हा बँकांची अधोगतीकडे वाटचाल सुरू असताना बीडची बँक सुस्थितीत होती.


पुढील दोन वर्षातच 2009 पासून असे काही उलटे फासे टाकण्यास तत्कालीन अध्यक्ष, संचालकांनी सुरुवात केली की ठेवींचा आकडा झपाट्याने खालावत गेला. जिल्ह्यात औद्योगिक, सिंचनाची स्थिती दयनीय असताना शंभर टक्के औद्योगिकीकरण, सिंचन झाल्याचे भासवून कोट्यवधींची खिरापत संचालक पुढा-यांनी स्वत:च्या व बगलबच्च्यांच्या संस्थांना वाटली. शेतीसाठी कर्ज न वाटता सुमारे शंभर कोटींहून अधिक रुपये अकृषी कर्जासाठी वाटले. सुमारे 350 युनिटला 130 कोटींचे वाटप झाले. गंमत म्हणजे यापोटी काहीही तारण म्हणून बँकेकडे ठेवण्यात आले नाही. ही संधी ओळखून शिक्षकांनी जिथे बदलून जायचे, तेथून पतसंस्था सभासद म्हणून कर्ज उचलण्याचा सपाटा लावला. यात साठ कोटींचे वाटप झाले. मार्च ते आॅगस्ट 2011 या सहा महिन्यांतच तीनशे कोटींच्या ठेवी काढल्या. यात सत्तेतील पुढा-यांच्या ताब्यातील नागरी बँकांनी 160 कोटींच्या ठेवी काढून घेतल्या.


या घोटाळ्याची बाब चव्हाट्यावर येण्यास सुरुवात होताच लेखा परीक्षकांच्या तपासणीतही अनेक बाबी समोर आल्या आणि तत्कालीन अध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या काळात पहिल्यांदा तेलगाव, पिंपळनेर शाखेतील भ्रष्टाचार उघड होऊन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर पंडित यांनी राजीनामा दिला, बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले आणि 11 नोव्हेंबर 2011 पासून अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार बँकेच्या प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली. तेथून एकेक करत शेकडो गुन्हे दाखल होत गेले. पुढा-यांच्या या दुष्कृत्याला साथ देणा-या बँकेच्या अधिकारी, कर्मचा-यांचेही पितळ उघडे पडले. सुमारे पन्नास अधिकारी-कर्मचा-यांवर गुन्हे दाखल होऊन बडतर्फ झाले माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे, सुभाष सारडा, आमदार अमरसिंह पंडित, आमदार धनंजय मुंडे, पंडितअण्णा मुंडे, काँग्रेसचे अशोक पाटील, दशरथ वनवे, मंगलताई मोरे, रमेश पोकळे यांच्यासह साठ ते पासष्ट जणांविरुद्ध नुकतेच गुन्हे दाखल झाले आहेत. खासदार मुंडेंच्या विरोधात रणशिंग फुंकणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध तसेच भाजपच्याही काही नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करतानाच पोलिसांपासून बचावासाठी ही मंडळी नवरात्राची संधी सांधून देशभरातील देवीदेवतांच्या दर्शनवारीला गेल्याचे समजते.