आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi , Read On Divyamarathi.com

परभणीने दिली होती शिव सेनेला राजमान्यता...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - 1998 मध्ये नांदेड येथील विमानतळ मैदानावर शेतकरी मेळाव्यास शिवसेनाप्रमुखांनी मार्गदर्शन केले. )
मुंबईनंतर शिवसेना ख-या अर्थाने रुजली ती मराठवाड्यात. विद्यापीठ नामविस्तारानंतर 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची लाटच आली. या लाटेत सामान्य कुटुंबातील अनेक जण आमदार झाले. कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचा राज्यकारभार चालवण्याची संधी दिली.
प्रवीण देशपांडे, परभणी

30 वर्षांपासून मराठवाड्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवत परभणीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा मराठवाड्यातील पहिला खासदार निवडून देत राजमान्यता मिळवली होती.

बाळासाहेबांच्या सभेला लोटणारा अलोट जनसमुदाय साहेबांच्या आवाहनाला मतदानरूपी साद देत गेला. जिवाभावाचे कार्यकर्ते बाळासाहेबांच्या प्रेरणेतून तयार झाले. कोणतीही साधने हाती नसताना राजकारणात नव्याने दाखल झालेल्या युवक कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. परिणामी 1988 मध्ये पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत 15 वर्षांपासून ठाण मांडणा-या काँग्रेसच्या विद्यमान खासदारास शिवसेनेच्या एका नव्या प्राध्यापकाने म्हणजेच प्रा.(कै.) अशोक देशमुख यांनी पराभूत केले. पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात भगवा झेंडा लागताना त्याचीही नोंद परभणीपासूनच झाली. लोकसभेचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत झाली. अ‍ॅड. कै. हनुमंत बोबडे पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. साहजिकच बाळासाहेबांचे या जिल्ह्यावर प्रेम राहिले. मराठवाड्यात पहिली सभा परभणीतच व्हायची, तीही गर्दीचे विक्रम मोडीत काढणारी ठरली. त्यांचा हा ऋणानुबंध परभणीकरांशी अधिकच घट्ट वीण जुळणारा होता...

सन 1985 पूर्वी परभणी जिल्हा हा शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस याच दोन पक्षांच्या ताब्यात होता. 85 नंतर शिवसेनेने येथे मुळे रुजवण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्यासारखी काही त्या वेळची कार्यकर्ते मंडळी मुंबईतून प्रथमच येथे दाखल होत असे. त्यांच्या संपर्कातून दामुअण्णा शेटे, अनंतराव लोहकरे, सखाराम लोहगावकर, देविचंद अंबुरे, जयंत पोकर्णा यांच्यासारख्या त्या वेळच्या मंडळींनी संघटनेचे काम सुरू केले. प्रत्यक्ष बाळासाहेबांची भेट झाल्यानंतर ही मंडळी अधिकच प्रभावित झाली. गाड्या-घोडे नसताना मोटारसायकली, सायकली, बससारख्या माध्यमांतून चार वर्षे खेड्यापाड्यांचे दौरे करीत शिवसेनेचा विचार जनतेपर्यंत त्यांनी पोहोचवला. यातूनच शिवसेनाप्रमुखांची स्टेडियमवर झालेली पहिली सभा विक्रम मोडीत काढणारी ठरली. त्या वेळी दोन लाखांवरील जनसमुदाय पाहताना बाळासाहेबांचा परभणीवरील विश्वास अधिकच दृढ होत गेला. साहेबांच्या भाषणासाठी आतुर झालेले कान मिळेल ती जागा शोधत होते. त्यातूनच पहिल्या निवडणुकीत लोकसभेत प्रा. (कै.) अशोक देशमुख व विधानसभेत अ‍ॅड.(कै.) हनुमंत बोबडे, हरिभाऊ लहाने (सेलू) हे निवडून आले. लोकसभेच्या निवडणुकीत तेव्हापासून मिळालेले यश फक्त 13 महिन्यांच्या 1997 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता आजवर कायम राहिले आहे. विधानसभेतही परभणीची जागा 25 वर्षांपासून कायम राखली गेली आहे. पाथरी, सिंगणापूर या दोन विधानसभेच्या जागाही 15 व 10 वर्षे कायम राखल्या गेल्या. त्यामुळे पक्षाचे संघटन हे या ठिकाणी मजबूत राहिले. काँग्रेस व त्यानंतर अलीकडच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कितीही मजल मारली तरी शिवसेनेने हा गड कायम राखला. बाळासाहेबांच्याच विचारांनी प्रेरित झालेला युवक 25 वर्षांत सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी राहिला. जिल्ह्याचा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी मोठा आधार ठरला. साहेबांच्या पहिल्या सभेने निर्माण केलेले वलय त्यानंतरही सातत्याने टिकून राहिले. साधारणत: पाच सभा या वाटचालीत झाल्या. प्रत्येक सभेने गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला. राजकारणाची परंपरा नसलेल्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी केवळ विचारच दिला नाही तर सच्चा कार्यकर्त्याला मानसन्मानाची पदे दिली. ज्यांच्यासाठी राजकारणातील पदे ही स्वप्नातही शक्य न वाटणारी बाब होती. ती पदे बाळासाहेबांच्या शिवसेनेने त्यांना दिली. साहेबांनी परभणीकरांच्या प्रेमाची पावती वेळोवेळी दिली. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आसुसलेल्या जनतेला त्यांनीही वेळोवेळी वेळ देऊन विचारांची तृष्णा भागवली. शिवसेनेच्या इतिहासात बाळासाहेबांच्या येथील सभा व पक्षाला जनतेने दिलेले बळ याची नोंद निश्चितच होईल.

वेळोवेळी दिली प्रेमाची पावती
साहेबांनी परभणीकरांच्या प्रेमाची पावती वेळोवेळी दिली. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आसुसलेल्या जनतेला त्यांनीही वेळोवेळी वेळ देऊन विचारांची तृष्णा भागवली. शिवसेनेच्या इतिहासात बाळासाहेबांच्या परभणीतील सभा व पक्षाला जनतेने दिलेले बळ याची नोंद निश्चितच सुवर्णाक्षरात होईल यात शंका नाही.