आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोसला’ची जन्मकथा, या कादंबरीने मराठी कादंबरीला एक नवीन वळण दिले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असा २४ ऑगस्ट १९६३ रोजी मी लिहायला बसलो आणि रात्रंदिवस लिहीत १० सप्टेंबर १९६३ रोजी पहिला खर्डा संपवला. मागे दुर्गाताई भागवत यांना आमच्याकडच्या महार भगत गोसावी लोकांची लोकगीतं मी जमा करून पाठवीन म्हणून कबूल केलं होतं, ते लोक नेमके मध्येच दोनतीनदा आल्यानं तीनेक दिवस वाया गेले - अर्थात याचाही उपयोग कोसलाच्या शेवटच्या भागात झालाच, कादंबरीकाराचं काहीच वाया जात नाही -

तर हा पहिला खर्डा फक्त मलाच कळेल असा शाॅर्टहँडसारखा होता. तो अजूनपर्यंत तिकडे नीट बांधून ठेवला होता. माझे एक कट्टर वाचक रा. सुनील चव्हाण यांना तो कसातरी बांधलेला खर्डा पाहून उचंबळून आलं आणि त्यांनी ताबडतोब चंदनाची पेटी आणून त्यात तो ठेवायला सांगितलं. असो. लिहिण्याच्या दिवसांत रा. ज. देशमुखांचा तगादा चालूच होता, त्यामुळे सलग नऊ दिवस-रात्री तो खर्डा घाईघाईतच पक्का केला आणि १९ सप्टेंबर रोजी गावातल्या एका जुन्या वर्गबंधूच्या ट्रकवर हा पक्का खर्डा घेऊन पुण्यात आलो. रा. अशोक, काका आणि मावशी इतके उत्साहात होते की, मी काय लिहिलं हे कुतूहल पाहण्यासारखं होतं. लगेच वीस आणि एकवीस सप्टेंबर रोजी पूर्णवेळ मी या तिघांमध्ये बसून संपूर्ण कादंबरी वाचून दाखवली - हे कोसलाचे पहिले वाचक.
(संदर्भ : पॉप्युलर प्रकाशन, कोसला, गौरवशाली पन्नास वर्षे)

भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या कादंबरीने मराठी कादंबरीला एक नवीन वळण दिले. आशय, आविष्कार, भाषाशैली, मांडणी या सर्वच बाबतीत वेगळ्या ठरणार्‍या या कादंबरीला आता पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कोसलाची विशेष आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. हिंदी, गुजराती, कन्नड, आसामी, पंजाबी, बंगाली, उर्दू, ओडिया अशा भारतीय भाषांमधून या कादंबरीचा अनुवाद झाला आहे. इंग्रजीतही या कादंबरीचा अनुवाद लोकप्रिय ठरला.

सुधाकर मराठे यांनी कोसलाचा इंग्रजीत अनुवाद केला आणि तो Cacoon या नावाने प्रकाशित झाला. या अनुवादाची नवीन आवृत्ती लवकरच पॉप्युलरतर्फे प्रकाशित होत आहे. कोसलाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्येच इंग्रजी भाषेतील आवृत्तीही वाचकांना उपलब्ध होत आहे याचा नक्कीच आनंद वाटतो. मराठी साहित्यात कोसलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सुधाकर मराठे यांनी हे भान ठेवून इंग्रजीतही ही कादंबरी अतिशय ओघवत्या शैलीत आणली आहे. मूळचे पुण्याचे असलेले सुधाकर मराठे यांनी साहित्यात पीएच. डी. पदवी मिळवली. त्यांनी मराठी साहित्यातील लघुकथा, कविता व इतर ललित साहित्याचा अनुवाद विविध प्रकल्पांतर्गत केला आहे. सध्या ते हैदराबाद विद्यापीठात अध्यापनाचे काम करीत असून, रंगभूमी, पक्षिनिरीक्षण आणि निसर्ग हे त्यांचे विशेष आवडीचे विषय आहेत.
(संदर्भ : पॉप्युलर प्रकाशन, प्रिय रसिक)